पुणे – ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनचे उद्या “रॅन्डमायझेशन’

उमेदवार, राजकीय पक्ष प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

पुणे – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचे “रॅन्डमायझेशन’ अर्थात उघड पडताळणी करण्यात येणार आहे. येत्या सोमवारी (दि.25) सकाळी 10 वाजल्यापासून भोसरी येथील वखार महामंडळाचे गोडाऊन येथे रॅन्डमायझेशनची प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी इच्छुक उमेदवार, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी केले आहे.

पुणे जिल्हयातील चारही लोकसभा (पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर) मतदारसंघातील सी-व्हीजील, टपाली मतदान, ईव्हीएम हाताळणी, एक खिडकी योजना, खर्च व्यवस्थापन, पोलिंग स्टेशन आदी सर्वच विषयांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आवश्‍यक ते सर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणुकीमधील उमेदवारांकडून करण्यात येणाऱ्या खर्चाच्या तपासणीकरीता जिल्हा दर सूची अंतिम करण्यात आली आहे.

या सूचीमधील साहित्याचे दर निश्‍चित करताना टेंडरच्या माध्यमातून तसेच मान्यताप्राप्त असोसिएशनच्या माध्यमातून दर निश्‍चित करण्यात आले होते. या दराबाबत बैठकीचे आयोजनाच्या माध्यमातून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना अवगत करण्यात आले होते. यावेळी काही राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी यातील काही साहित्यांच्या दरांबाबत सुधारणा करण्याचे कळविले होते. यावर पडताळणी करुन जिल्हा दर सूची अंतिम करण्यात आली आहे. ही दर सूची नामनिर्देशनाच्या वेळी उमेदवारांना देण्यात येणार असल्याचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी सिंह यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)