पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावावे – प्रा.राम शिंदे

पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते भूईकोट किल्ला परिसरात वृक्षारोपण

अहमदनगर : तेहतीस कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत आज येथील भूईकोट किल्ला परिसरात पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. एक जुलैपासून या मोहिमेला जिल्ह्यात सुरुवात झाली असून विविध शासकीय कार्यालये, विविध संस्था-संघटना, शाळा-महाविद्यालयांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून या मोहिमेने आता वेग घेतला आहे. आतापर्यंत गेल्या ६ दिवसांत पावणेदोन लाख वृक्षलागवड करण्यात आली आहे.

सकाळी ११ वाजता पालकमंत्री प्रा.शिंदे यांच्यासह आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय अधिकारी किर्ती जमदाडे-कोकाटे, सहायक उपवनसंरक्षक एस. आर. पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के, एलअॅन्डटीचे सरव्यवस्थापक अरविंद पारगावकर, आदेश चंगेडिया, डॉ. सुधा कांकरिया यांच्यासह फेथ फाऊंडेशनचे कार्यकर्ते, केंद्रीय विद्यालय आणि सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंन्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

भूईकोट किल्ला परिसरात साडेसातशेहून अधिक वृक्षलागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. पालकमंत्री प्रा.शिंदे यांनीही आवर्जून विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले.

पर्यावरण संवर्धन ही आज काळाची गरज झाली आहे. त्यामुळे शासन-प्रशासन यांच्या प्रयत्नाला लोकसहभागाची जोड आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढे आले पाहिजे. स्वच्छ हवा सर्वांना हवी असेल, तर पर्यावरणाची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. केवळ वृक्षारोपण करुन चालणार नाही, तर ती झाडे जगविणे आवश्यक आहे, असे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री प्रा.शिंदे आणि विविध मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

तेहतीस कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्याला १ कोटी १८ लाख ८६ हजार उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात जिल्हापरिषदेला ४१ लाख ९८ हजार, वनविभागास ४० लाख १३ हजार, सामाजिक वनीकरण विभागास २२ लाख ६६ हजार आणि इतर यंत्रणांनी १४ लाख ८ हजार असे वृक्षलागवडीचे नियोजन केले आहे. ही मोहीम ३० सप्टेंबर पर्यंत सुरु राहणार असून प्रत्येक नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)