दरवर्षी तीव्र होत जाणार पाणी टंचाई

पावसाने साथ न दिल्यास बिकट स्थिती ः पाणीपुरवठा योजनांसमोर अडथळ्यांची शर्यत

मागणीत चढ-उतार

शहरात गेल्या पाच वर्षांमध्ये पाणीपुरवठ्याच्या मागणीत चढ-उतार राहिला आहे. 2013-14 या वर्षात दररोज 441 दशलक्ष लिटर इतके पाणी पवना धरणातून उचलले जात होते. 2014-15 मध्ये 428, 2015-16 मध्ये 437, 2016-17 मध्ये 421 तर, 2017-18 मध्ये दररोज 480 दशलक्ष लिटर इतके पाणी शहरासाठी सोडण्यात येत होते.

पिंपरी  – पवना धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी उचलण्याची योजना सध्या बंद स्थितीत आहे. इंद्रायणी नदीवरील देहू बंधारा येथून आंद्रा धरणाचे 100 दशलक्ष लिटर पाणी महापालिका उचलणार आहे. त्यामध्ये अडचण नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, हे काम पूर्ण होण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागणार आहे. भामा आसखेड धरणातून 167 दशलक्ष लिटर इतके पाणी उचलण्याच्या योजनांमध्ये मोठे अडथळे आहेत. त्यामुळे पुढील पाच ते दहा वर्षांतील लोकसंख्या वाढ लक्षात घेता शहराची पाण्याची गरज भागणार का, हा प्रश्‍न कायम आहे. अधिकाऱ्यांचे मत आहे की संबंधित योजना मार्गी लागल्यास पुढील पाच वर्षे अडचण येणार नाही. परंतु नाही लागल्यास काय? किंवा पाच वर्षानंतरच्या वाढलेल्या लोकसंख्येचे काय? हे प्रश्‍न भविष्यातील संकटांचे संकेत आहेत.

शहरामध्ये सध्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. पवना धरणातून त्यासाठी दररोज 410 ते 420 दशलक्ष लिटर इतके पाणी उचलले जात आहे. पाणी कपात लागू नसताना शहरासाठी दररोज 480 दशलक्ष लिटर इतके पाणी उचलले जात होते. लोकसंख्या वाढीच्या अंदाजानुसार 2021 पर्यंत शहराची लोकसंख्या 29 लाख 92 हजार 628 इतकी गृहीत धरली जात आहे. या लोकसंख्येसाठी सध्या होणारा पाणीपुरवठा पुरेसा आहे. परंतु लोकसंख्येत वाढ झाल्यास पाणी टंचाईची समस्या अधिकच बिकट होऊ शकते. परंतु 2019 पासून पुढील पाच वर्षांचा म्हणजे 2024 पर्यंतच्या लोकसंख्या वाढीचा विचार करता हे पाणी
अपुरे पडणार आहे.

दोन्ही पद्धतीने मांडलेत अंदाज
शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्यासाठी आवश्‍यक पाण्याची मागणी याचा विचार करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने इनक्रिमेंटल इनक्रिज पद्धत आणि जिओमेट्रीक प्रोग्रेशन पद्धत या दोन्ही पद्धतीची सरासरी लोकसंख्या विचारात घेऊन 2021, 2031 आणि 2041 या वर्षांपर्यंतची अंदाजे लोकसंख्या निश्‍चित केली आहे. तसेच, त्यासाठी लागणाऱ्या अपेक्षित पाणीपुरवठ्याची मागणी देखील मांडलेली आहे. सध्या तरी हे पाणी पुरेसे वाटत असले तरी पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी नियोजित असलेल्या परंतु स्थानिकांच्या विरोधामुळे अडकून पडलेल्या योजना वेळेत मार्गी लागल्या नाहीत, तर मात्र शहराला मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

दहा वर्षांनी दुप्पट होणार मागणी
शहराची 2031 पर्यंतची 52 लाख 74 हजार इतकी लोकसंख्या गृहीत धरली तरी दररोज 844 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करणे आवश्‍यक ठरणार आहे. महापालिकेचा पवना धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी उचलण्याचा प्रकल्प अद्याप मार्गी लागलेला नाही. या प्रकल्पाचे काम 10 ऑगस्ट 2011 पासून बंद आहे. प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास महापालिकेला पाणी गळती न होता दररोज 508 दशलक्ष लिटर इतके पाणी मिळणार आहे.

देहू बंधारा येथून महापालिका आंद्रा धरणाचे दररोज 100 दशलक्ष लिटर इतके पाणी उचलणार आहे. त्यासाठी देहू बंधारा ते नियोजित चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्राचे काम करावे लागणार आहे. या सर्व कामांसाठी अडीच वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे किमान अडीच वर्ष तरी धरणाचे पाणी महापालिकेला उपलब्ध होणार नाही. भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्याच्या पुणे महापालिकेच्या योजनेलाच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरासाठी 167 दशलक्ष लिटर पाणी मिळणार का, हा प्रश्‍न कायम आहे. या योजनेचा सध्या विस्तृत प्रकल्प अहवाल आणि प्रकल्प खर्चाचा अंदाज पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केला आहे. तिन्ही योजना मार्गी लागल्या तरच शहराचा पुढील पाच वर्षांचा पाणी प्रश्‍न सुटणार आहे. पुढील दहा वर्षांच्या पाणी प्रश्‍नाचे नियोजन तर अद्याप दूरच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)