बंडोबांचे झेंडे सर्वच पक्षात (अग्रलेख)

भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर होताच ज्याप्रमाणे आयाराम गयाराम संस्कृतीला चालना मिळते त्याचप्रमाणे बंडखोरी वृत्तीलाही चालना मिळते आणि या बंडखोरीच्या लागणीपासून कोणताही पक्ष सुटत नाही. उमेदवारीचे वाटप हा कोणत्याही निवडणुकीचा अविभाज्य भाग असतो आणि त्यातूनच या बंडखोरीला प्रारंभ होतो.निवडणुकीची उमेदवारी मिळण्याची आशा असलेल्यांना निवडणुकीच्या भाषेतील तिकीट म्हणजेच उमेदवारी मिळाली नाही तर ते नाराज होतात आणि दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढवतात किंवा अपक्ष म्हणून मैदानात उतरतात.गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही प्रक्रिया यावेळीही पाहायला मिळत आहे. गेल्या काही तासांत त्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळाली.

महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे राजीनाम्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा एका व्हायरल झालेल्या ऑडिओ क्‍लिपमुळे राजकीय वर्तुळात रंगली. त्याला कारणही पक्षांतर्गत बंडखोरी आणि उमेदवारीवरून नाराजी हेच आहे. एका कार्यकर्त्याशी अशोक चव्हाण चंद्रपुरातल्या जागेबाबत बोलत असताना अशोक चव्हाण त्याला सांगत आहेत की, पक्षात माझे कोणीही ऐकत नाही. त्यामुळे मी राजीनामा देण्याच्या विचारात आहे, या आशयाची ही क्‍लिप व्हायरल झाल्यानेच अशोक चव्हाण यांच्या नाराजीची चर्चा रंगू लागली आहे. चंद्रपुरात विनायक बांगडे यांना भाजपचे हंसराज अहिर यांच्याविरोधात कॉंग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. बांगडे यांच्या उमेदवारीमुळे तेथील कार्यकर्ते नाराज आहेत. त्यातूनच हा वाद सुरू झाला.

दुसरीकडे औरंगाबादमध्येही कॉंग्रेसला असाच झटका मिळाला आहे. कॉंग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी कॉंग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांच्या उमेदवारीला विरोध करत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. झांबड यांच्या उमेदवारीबाबत आपल्याला विश्‍वासात घेतले नसल्याचा सत्तार यांचा दावा आहे. अब्दुल सत्तार हे औरंगाबाद कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांची बंडखोरी मिटवण्यात कॉंग्रेसला यश आले नाही, तर त्याचा निवडणूक निकालावर परिणाम होणे अपरिहार्य आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरू झालेले नाराजीचे शुक्‍लकाष्ठ कॉंग्रेसच्या मागे कायम आहे. सत्ताधारी भाजपने यावेळी अनेक ठिकाणी उमेदवार बदलले आहेत. पण एक अपवाद वगळता त्यांना बंडखोरीचा त्रास अद्यापपर्यंत झालेला दिसत नाही. हा एक अपवाद बिहारमधील आहे.

भारतीय जनता पक्षाने बिहारमधील उमेदवारांची घोषणा करताना अपेक्षेप्रमाणे केंद्र सरकारवर सतत टीकेची झोड उठवणारे भाजपचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा यांचे तिकीट कापले आहे. तिकीट कापल्यानंतर दुखावलेले शत्रुघ्न सिन्हा लवकरच कॉंग्रेसचा हात पकडतील अशी शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. विरोधी पक्षात गेल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा अधिकच आक्रमकपणे सरकारविरोधात बोलतील हे आता भाजपने गृहीत धरायला हवे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही बंडखोरीचा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेचे माजी खासदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी लोकसभेत अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. शिवसेनेकडून तिकीट मिळण्याची अपेक्षा त्यांना होती. पण शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनाच तिकीट दिले. त्यामुळे वाकचौरे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

वाकचौरे यांनी 2004च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून रामदास आठवलेंचा पराभव केला होता. 2014च्या लोकसभा निवडणुकीत ते कॉंग्रेसमध्ये गेले होते. त्यांनी शिर्डी लोकसभा कॉंग्रेसकडून लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भाजपच्या तिकिटावर 2014ची श्रीरामपूर विधानसभा निवडणूक लढवली होती. इतके पक्ष बदलल्यावरही त्यांना आता पुन्हा एकदा बंडखोरी करून अपक्षाचा झेंडा हाती घ्यावा लागला आहे. बहुतेक सर्वच राजकीय पक्षांमध्ये अशी स्थिती असताना निवडणूक काळातील सर्वपक्षीय बंडखोरीला युती आणि आघाडीच्या राजकारणाचीही एक वेगळी किनार आहे.

आघाडी आणि युतीच्या या राजकारणात काही मित्रपक्षांना उचित मान न मिळाल्याने या कारणावरूनही बंडखोरीची भाषा बोलली जात आहे. शिवसेना-भाजपा युतीत डावलल्याने महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. आम्ही तुमच्यासोबत; पण रासपच्या चिन्हावरच निवडणूक लढणार असल्याचे महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट केले आहे. महायुतीतील इतर घटक पक्षांमध्येही कमी-अधिक प्रमाणात हीच भावना आहे. विनायक मेटे यांनी स्पष्टपणे काही ठिकाणी भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात काम करण्याची भूमिका घेतली आहे. रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवलेही नाराज आहेत. शिवसेनेची युती झाल्यावर भाजपने इतर मित्रपक्षांना बाजूलाच टाकल्यासारखे केले.

लोकसभा निवडणुकीत या मित्रपक्षांना जागा द्यावयाच्या नाहीत हे भाजपने ठरवूनच टाकल्याने मित्रपक्ष नाराज आहेत. त्यातूनच या बंडखोरीच्या ठिणग्या उडू लागल्या आहेत. भाजपला आतापर्यंत साथ देणाऱ्या या सर्वच मित्रपक्षांची स्वत:ची अशी मतांची बॅंक असल्याने त्यांची नाराजी त्रासदायक ठरू शकते हे भाजपला लक्षात घ्यावे लागणार आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीलाही प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या नाराजीचा फटका बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. एकूणच लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया सुरू असतानाच विविध पक्षांमध्ये बंडोबांचे झेंडे उंचावलेले दिसून येत आहेत. निवडणुकीची एकूण प्रक्रिया दीर्घकाळ चालणार असल्याने अजून बरेच काही घडायचे संकेतच त्यातून मिळत आहेत.लोकशाही राजकारणात नाराजी आणि बंडखोरी अपरिहार्य असली तरी या स्थितीतून व्यवस्थित मार्ग काढणारा पक्षच निवडणुकीच्या राजकारणात यशस्वी होऊ शकतो. विद्यमान राजकारणात म्हणूनच निवडणूक व्यवस्थापन महत्त्वाचे ठरू पाहात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)