अवकाळीची हजेरी

कराडला झोडपले तर इतरत्रही जोरदार पाऊस

सातारा/कराड/वाई – गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पारा 40 अंशावर पोहोचला होता. मात्र, शनिवारी दुपारपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले होते. काही वेळात मेघगर्जनेसह पावसालाही सुरुवात झाली. विशेषत: कराडला अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. तर वाई, कोरेगावसह सातारा तालुक्‍याच्या विविध भागात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

उन्हाच्या तडाक्‍याने हैराण झालेल्या सातारकरांना शनिवारी थोडा दिलासा मिळाला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. साहजिकच त्यामुळे वातावरणात थोडासा गारवा निर्माण झाला मात्र, काही वेळातच सुर्याने दर्शन दिल्यामुळे वातावरण पुर्ववत झाल्याचे जाणवून आले. दरम्यान, शनिवारी दुपारी 2 वाजल्यापासूनच वादळी वाऱ्याला सुरूवात झाली. तीन वाजण्याच्या सुमारास वादळाचे प्रमाण वाढले त्याच बरोबर आकाशात काहीसा काळोख ही निर्माण झाला. एक दिड तास वारे अन आकाशाचा खेळ सुरू राहिल्यानंतर अखेर पाच वाजण्याच्या सुमारास पावसाच्या हलक्‍या सरी कोसळण्यास सुरूवात झाल्या. साहजिकच उकाड्याने हैराण झालेल्या सातारकरांना दिलासा मिळाला. परंतु सरी केवळ दहा मिनिटेच कोसळल्या. त्यामुळे वातावरण पुर्ववत झाले अन साताकरांची थोडी निराशा झाल्याचे चित्र दिसून आले.

कराड – वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटात शहरात सायंकाळी वळीव पावसाने हजेरी लावली. अर्धा तास झालेल्या वळीव पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढला होता. मात्र, दमदार वळीव झाला नव्हता. गेल्या पंधरा दिवसांत अनेकदा वातावरण ढगाळ झाले होते. मात्र, वळीवाने हुलकावणीच दिली. शनिवारी दिवसभर कराडकर उकाड्याने हैराण झाले होते. मात्र, सायंकाळी वातावरणात बदल झाला. काळे ढग दाटून आले आणि वादळी वारे वाहू लागले. वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटात वळीव पावसाला सुरूवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरीकांची त्रेधा उडाली. सुमारे अर्धा तास हलक्‍या स्वरूपाच्या सरी कोसळल्या. उकाड्याने हैराण झालेल्या नागरीकांना वळीवाने दिलासा मिळाला. तसेच रात्री वातावरणात गारवा निर्माण झाला.

वाईत मेघगर्जनेसह पावसाची हजेरी
वाई – उन्हाची तीव्रता वाढत असतानाच शनिवारी दुपारी चार वाजता वाई शहर व परिसरात वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. परंतु अचानक आलेल्या वारा व पावसाने आंब्याचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यात सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढली असून वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामध्येच शनिवार, दि. 13 रोजी दुपारी वाई शहरासह तालुक्‍याच्या काही ठिकाणी जोरदार वारा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून थोडाफार दिलासा मिळाला असला तरी पावसाआधी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडांना नुकतेच लागलेले आंबे व मोहर खाली झडून गेला आहे. ढगाळ वातावरण असेच राहिल्यास आंबा उत्पादन अडचणीत येईल अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. तसेच जनावरांसाठी ठेवलेला चारा व थोडाफार भिजला असला तरीही नुकसान मात्र झाले नाही. अचानक आलेल्या पाऊसामुळे बाजारपेठेमध्ये व्यापारी व नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. अवकाळी पावसाच्या सरी शहरात जवळपास अर्धा तास पडत होत्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उन्हाच्या तीव्रतेमधून नागरिकांची थोडी का होईना सुटका झाली आहे.

महाबळेश्‍वरमध्येही मुसळधार
महाबळेश्‍वर – महाबळेश्‍वर शहर व परिसराला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने शनिवारी चांगलेच झोडपून काढले. दुपारी चारच्या सुमारास पावसाचे आगमन झाले. सुमारे अर्धा तास गारांसह पाऊस शहर व परिसरात पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. पर्यटनासाठी महाबळेश्‍वरला आलेल्या पर्यटकांनी या पावसात भिजण्याचा आनंद लुटला. महाबळेश्‍वर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याचे दिसत होते तर सायंकाळी हेच तापमान खाली आल्याचे देखील पहावयास मिळत होते. सकाळी उकाडा तर सायंकाळी थंडी असे वातावरण होते. शनिवार व रविवार या सुट्यांमुळे असंख्य पर्यटक या पर्यटननगरीत दाखल झाले आहेत. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास शहर व परिसरात वादळीवाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. सुमारे अर्धा तास पाऊस कोसळत होता. उकाड्याने हैराण झालेल्या पर्यटकांसह नागरिकांना पावसानंतरच्या थंडीने हायसे वाटले.

अवकाळीचा पर्यटकांनी घेतला आनंद
पाचगणी – शनिवारी पाचगणीसह परिसरात दुपारपासून ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे हवेत मोठ्या प्रमाणात उकाडा निर्माण झाला होता. मात्र, अचानक सुरु झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे पर्यटकांचीही धांदल उडाली. मात्र, अनेक हौशी पर्यटकांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. शनिवारी अवकाळी पावसाने जवळजवळ दीड तास पावसाने आपली हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून या पावसामुळे शेतातील स्ट्रॉबेरी, परसबी या पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच शनिवार असल्याने महाबळेश्‍वर पांचगणी ठिकाणी पर्यटकांची चांगलीच गर्दी होती. अचानक आलेल्या पावसामुळे पर्यटकांची थोडी धावपळ झाली तर काही होशी पर्यटकांनी मात्र या पावसाचा मनमुराद आनंद घेत ओलेचिंब झाले. या पावसात गरम गरम चहा, चणे मकाणीस यावर ताव मारताना दिसत होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)