उमेदवार नसला तरी, भाजपची प्रचाराची तयारी

पहिली प्रचारसभा जावडेकर घेणार

पुणे – लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या तिकिटाची लॉटरी कोणाला लागणार, हे गुलदस्त्यात असले तरी पक्षाची पहिली प्रचार सभा दि.26 मार्च रोजी होण्याची शक्‍यता आहे. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या सभेसाठी सायंकाळची वेळ दिली असून कोथरूड विधानसभा मतदारसंघात ही सभा होणार आहे. दरम्यान, गुरूवारी भाजपचा उमेदवार जाहीर होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत पुण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने भाजपच्या उमेदवाराबाबतचा सस्पेंस अद्याप कायम आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी यावेळी उमेदवार बदलाची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. या जागेसाठी विद्यमान खासदार अनिल शिरोळे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्यात चुरस सुरू आहे. तर बापटसमर्थक तसेच राज्यातील काही नेत्यांकडून बापट यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे खासगीत सांगण्यात येत असून बापटांनी प्रचार यंत्रणाही कामाला लावली आहे. असे असतानाच; मागील लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपला भरभरून मतांची बेगमी देणाऱ्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून पुण्यातील भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. या सभेसाठी खासदार जावडेकर यांनी वेळ दिली असून भुसारी कॉलनी परिसरात ही सभा होण्याची चर्चा आहे. दि.24 मार्च रोजी कोल्हापूर येथून युतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. मात्र, एका बाजूला पक्षाने उमेदवार जाहीर केला नसला, तरी पक्षाकडून प्रचाराचे नियोजन सुरू करण्यात आले असून पुण्यासाठी निश्‍चित करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांची वेळ ठरविण्यात येत आहे. दरम्यान, पुढील एक ते दोन दिवसांत भाजपचा उमेदवार जाहीर होणार असल्याने जावडेकर यांची सभा याच उमेदवारासाठी असेल, असा दावा पक्षातील नेत्यांकडून करण्यात आला आहे.

काकडे यांचे उमेदवारीचे दरवाजे बंद?
अवघ्या काही दिवसांपूर्वी “पुण्यासाठी आपणच भाजपचे उमेदवार अस’ू असा दावा करणाऱ्या भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचे उमेदवारीचे दरवाजे बंद झाले आहेत. तर, बापट यांचे नाव निश्‍चित झाल्याचे पक्षातील पदाधिकारी सांगत असल्याने काकडे काय भूमिकेत राहणार, याबाबत चर्चांना उधान आले आहे. काकडे यांनी भाजपने उमेदवारी न दिल्यास कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, कॉंग्रेसमधूनही त्यांच्या नावाला लक्षणीय विरोध झाल्याने कॉंग्रेसचे दरवाजेही बंद झाल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)