चिमुकल्यांच्या मस्तीसाठी उद्यानेही सज्ज

शहरातील विविध उद्यानांची माहिती खास “प्रभात’च्या वाचकांसाठी

पुणे – उन्हाळ्याची सुट्‌टी म्हणजे लहान मुलांसाठी मजा असते. शाळेचे तास नाही, अभ्यास नाही याउलट मनसोक्तपणे खेळायचे, फिरायचे असाच अनेकांचा दिनक्रम असतो. लहान मुलांना सुट्टीचा मनसोक्तपणे आनंद घेता यावा, यासाठी शहरामध्ये अनेक चांगली उद्याने उपलब्ध आहेत. सुट्‌टयांमधील धमाल वाढविण्यासाठी ही उद्याने देखील सज्ज असून, शहरातील काही प्रमुख उद्यानांची माहिती खास “प्रभात’च्या वाचकांसाठी…

संभाजी बाग : डेक्कन परिसरात जंगली महाराज रस्त्यासारख्या वर्दळीच्या रस्त्यावर असलेली ही बाग म्हणजे शहरातील नागरिकांसाठी आनंदाची पर्वणी आहे. विविध प्रकारच्या वृक्षराजीने संपन्न असलेल्या या बागेत मुलांना खेळण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध आहे. तसेच ओपन जिम, बसण्यासाठी पुरेशे सोयी सुविधा याबरोबरच शहरातील एकुलते एक मत्स्यालयही या बागेत उपलब्ध आहे. त्यामुळे बागेत खेळण्याबरोबरच रंगीबेरंगी मासे पाहण्याचाही आनंद मुलांना लुटता येईल.

स्थळ : जंगली महाराज रस्ता
वेळ : सकाळी 8:30 ते 11:30, सायंकाळी 4 ते 8
मस्त्यालय प्रवेश शुल्क : आहे

सारसबाग : पुण्यातील सर्वात जुन्या बागांपैकी एक असलेल्या या बागेचे पुणेकरांच्या मनात एक विशेष स्थान असते. केवळ शहरातीलच नव्हे तर बाहेरगावाहून आलेले नागरिकही आवर्जून सारसबागेला भेट देतात. प्रसिद्ध अशा तळ्यातल्या गणपतीचे दर्शन घेण्याबरोबरच विस्तीर्ण स्वरूपाची बाग आणि लहान मुलांना खेळण्यासाठी मोठी जागा याठिकाणी उपलब्ध आहे.
स्थळ : स्वारगेट
वेळ : सकाळी 7 ते रात्री 8
प्रवेश शुल्क : नाही

पेशवे उद्यान : सारसबागेल लागूनच असलेले पेशवे उद्यान म्हणजे मुलांसाठी आनंदाची शिदोरीच आहे. विविध प्रकारची खेळणी, फुलराणीसारख्या छोट्या आगगाडीची सफर, ऊर्जेच्या विविध स्वरूपांची माहिती देणारी दालने, पेशवे जलाशय अशा अनेक गंमती-जमती या उद्यानात अनुभवायला मिळतात.
स्थळ : स्वारगेट
वेळ : सकाळी 10 ते दुपारी 1, दुपारी 2 ते सायंकाळी 5:30
प्रवेश शुल्क : आहे

कमला नेहरू पार्क : मोकळी जागा, भरपूर हिरवाई आणि बसण्यासाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा यामुळे ही बाग अनेकांच्या पसंतीस उतरत असते. प्रत्येक दिवशी या बागेत नागरिकांची चांगलीच गर्दी असते. मुलांसाठी फारशी खेळणी उपलब्ध नसली तरी, भरपूर प्रमाणात जागा उपलब्ध असल्याने मैदानी खेळ खेळण्यासाठी ही बाग म्हणजे उत्कृष्ट ठिकाण आहे. या बागेत विमानाची प्रतिकृतीदेखील पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
स्थळ : एरंडवणे
वेळ : सकाळी सात ते 11, सायंकाळी 4 ते 8
प्रवेश शुल्क : नाही

चित्तरंजन वाटिका : गर्द वनराई, पक्ष्यांचा किलकिलाट, रम्य वातावरण अशी या बागेची ओळख आहे. लहान मुलांसाठी मोठ्या प्रमाणात खेळणी उपलब्ध असून, मैदानी खेळ खेळण्यासाठी मुबलक जागादेखील उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी झाडांचा, पक्ष्यांचा अभ्यास करण्याची आवड असणाऱ्यांना चांगली संधी उपलब्ध होते.
स्थळ : एरंडवणे
वेळ : सकाळी सहा ते अकरा, सायंकाळी चार ते आठ
प्रवेश शुल्क : नाही

पु.ल.देशपांडे ओकायामा उद्यान आणि मुघल उद्यान : जपानी पद्धतीने बनविले गार्डन अशी ओळख असलेले पु.ल देशपांडे ओकायामा गार्डन आणि काश्‍मीरमधील मुघल गार्डनची प्रतिकृती असलेले पु.ल.देशपांडे मुघल उद्यान या दोन्ही बागा शहरातील नागरिकांच्या नेहमीच पसंतीस उतरतात. संकल्पनाधारित बागेचे वैशिष्टये, येथील निसर्ग सौंदर्य, उपलब्ध सोयी-सुविधा आणि मुलांसाठी असणारी खेळणी त्यामुळेच ही बाग नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरते.
स्थळ : सिंहगड रस्ता
वेळ : सकाळी 6 ते 11, सायंकाळी 4 ते 8
प्रवेश शुल्क : आहे.

एम्प्रेस गार्डन : ब्रिटिशकालीन बाग म्हनून ओळखले जाणारे एम्प्रेस गार्डन हे आपल्या वेगळ्या वैशिष्टयांसाठी प्रसिद्ध आहे. विस्तीर्ण स्वरूपात असलेल्या या बागेत विविध प्रकारची झाडे, फुले, लहान मुलांसाठी उपलब्ध असणारी खेळणी उपलब्ध आहेत.
स्थळ : रेसकोर्सजवळ
वेळ : सकाळी 10 ते सायंकाळी 6
प्रवेश शुल्क : आहे

स्व. संजय निम्हण संस्कृती उद्यान : ग्रामीण संस्कृती आणि परंपरा यांचे दर्शन घडविणारे हे उद्यान शहराती संकल्पनाधारित उद्यानांपैकी एक उद्यान आहे. ग्रामीण जीवनातील विविध गोष्टी याठिकाणी पाहायला मिळतात. विशेष करून लोकसंस्कृतीची ओळख घडविणारी विविध दृष्ये याठिकाणी उभारण्यात आली आहे. शहरी भागातील मुलांना ग्रामीण्‌ असंस्कृतीची ओळख करून देणारे हे एक उत्कृष्ट उद्यान आहे.
स्थळ : सोमदेव नगर, पाषाण
वेळ : सकाळी 10 ते रात्री 9
प्रवेश शुल्क : आहे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)