असह्य उकाडा : पारा पुन्हा 41 अंशांच्या घरात
बुधवारचे तापमान 40.8 अंश सेल्सिअस : पुढील दोन दिवसही उकाड्याचेच
पुणे – शहरातील कमाल तापमानाने पुन्हा चाळिशी गाठल्यामुळे बुधवारी दिवसभर उन्हाचा चटका चांगलाच जाणवत होता. त्यातच ढगाळ वातावरणामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. बुधवारी शहरातील कमाल तापमान 40.8 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
सातारा, सांगली, सोलापूर या भागात पूर्वमौसमी पाऊस झाल्यामुळे वातावरणात बदल झाला आणि कमाल तापमानात घट झाली. पुणे शहरातील कमाल तापमानातही तीन ते चार अंशाने घट झाल्यामुळे मागील आठ दिवसांपासून कमाल तापमान 35 अंशापर्यंत खाली आले होते. परंतू, गेल्या 24 तासात पुन्हा कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. किमान तापमानही दोन अंशांनी वाढले आहे. दुपारी उन्हाचा चटका आणि मध्येच ढगाळ वातावरण येत असल्यामुळे रात्रीचा हवेतील गारवाही कमी झाला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस कमाल आणि किमान तापमानात एक अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे.