टॅंकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात त्रुटी

प्रांताधिकाऱ्यांचे ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचे संकेत
संगमनेर – संगमनेर तालुक्‍यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सेवा खरच संबंधितांना मिळतात का, याची प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी अचानक तपासणी केली. या पाहणीत यंत्रणेतील अनेक त्रुटी त्यांच्या समोर आल्या. मंगरुळे यांना टॅंकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात त्रुटी आढळल्याने ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचे संकेत दिले.

संगमनेरमध्ये जवळपास 60 टॅंकरने विविध गावांत पाणीपुरवठा सुरू आहे. टॅंकरद्वारे दूषित पाणी मिळत असल्याच्या तक्रारी अनेक गावांतील ग्रामस्थांनी केल्या होत्या. तसेच आचारसंहितेचा बाऊ करत येणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात होते. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संगमनेर गाठत टंचाई आढावा बैठक घेतली आणि प्रशासनाला दुष्काळा बाबत सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर देखील काहीच बदल होत नसल्याचे चित्र होते.

त्यामुळे सोमवारी प्रांताधिकारी मंगरुळे यांनी पठारभागाची पाहणी कारत वास्तव समजून घेतले. या पाहणीत त्यांना काही धक्कादायक बाबी आढळल्या असल्याने त्यांनी टॅंकर ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचे संकेत दिले. प्रांताधिकारी यांनी केलेल्या या दौऱ्यावेळी त्यांच्या सोबत डोळसणे येथील मंडल अधिकारी किसन लोहरे होते. प्रांताधिकाऱ्यांनी वनकुटे, भोजदरी या गावांना भेटी देत तेथील ग्रामस्थांशी संवाद सादला. यावेळी टॅंकरच्या मंजूर खेपा आणि प्रत्यक्ष झालेला खेपा याबद्दल त्यांनी गावकऱ्यांनकडे चौकशी केली. त्यांच्या तपासणीत टॅंकरच्या खेपांमध्ये अनियमितता आढळून आली. याशिवाय कौठे बुद्रुक येथील जलस्रोताची त्यांनी पाहणी केली.

टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असलेल्या गावांमध्ये मंजूर असलेल्या फेऱ्या आणि प्रत्यक्षातील फेरा याची पडताळणी करण्यासाठी दौरा सुरु केला. या दौऱ्यात टॅंकरद्वारे होत असलेल्या पाणीपुरवठ्यामध्ये बऱ्याच अडचणी आढळून आल्या. त्यासंदर्भात शंभर टक्के समाधानकारक परस्थिती नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

शशिकांत मंगरुळे प्रांताधिकारी, संगमनेर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)