पर्यावरण – एव्हरेस्टवर ‘कोंडी’ कशामुळे? (भाग २)

प्रा. विजया पंडित 

1953 मध्ये जिथे मानवाने पहिले पाऊल ठेवले, त्या एव्हरेस्टवर कधी “ट्रॅफिक जॅम’ अनुभवावा लागेल, असे कुणाला त्यावेळी वाटलेही नसेल. परंतु आज तीन-चार लोक उभे राहू शकतील एवढ्या जागेत दोन डझन 
माणसे उभी राहून गिर्यारोहक सेल्फी काढताना दिसतात. दर्शनबारीप्रमाणे जाणाऱ्यांची आणि येणाऱ्यांची स्वतंत्र रांग पाहायला मिळते. त्यातूनच बर्फाळ थंडीत अधिक काळ राहणे आणि ऑक्‍सिजनची कमतरता यामुळे अनेक गिर्यारोहक नजीकच्या काळात मृत्युमुखी पडले आहेत. महसूलप्राप्तीसाठी नियम डावलले जात असले, तरी निसर्गनियम कसे टाळणार? 

लांबलचक रांगांच्या या नव्या समस्येमुळे या मार्गातील अडथळ्यांमध्ये वाढ झाली आहे. परंतु या अडथळ्यांना न जुमानता गिर्यारोहकांची संख्या वाढतानाच दिसते आहे. वाढत्या गर्दीमुळे तेथे कचरा व्यवस्थापनाची एक नवीच समस्या निर्माण झाली आहे. वर्षातील ज्या काळात गिर्यारोहकांची संख्या सर्वाधिक असते, त्यावेळी एव्हरेस्टच्या परिसरात ऑक्‍सिजनचे रिकामे सिलिंडर, अन्नाची रिकामी पाकिटे, तुटलेले तंबू, बॅटऱ्या अशा घातक वस्तूंचा खच पडलेला दिसतो. हा कचरा निसर्गासाठी तर धोकादायक आहेच; परंतु सातत्याने होत असलेल्या मोहिमांमध्ये हा नवा अडथळा आहे.

काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने नेपाळ सरकारने कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी काही पावले उचललीही आहेत. परंतु एव्हरेस्टसारख्या अतिदुर्गम भागातून या संस्थांमार्फत तब्बल दीड टन निरुपयोगी वस्तू गोळा केल्या जाव्यात, हे अत्यंत दुर्दैवी आहे. शहरातील रस्त्यांवर दिसणारी “ट्रॅफिक जॅम’ची समस्या चक्क एव्हरेस्टसारख्या सर्वांत मोठ्या गिरीशिखरावर पाहायला मिळेल, असे कुणालाही वाटले नसेल. परंतु एव्हरेस्टवर चढाई करताना किंवा उतरताना नुकतेच झालेले गिर्यारोहकांचे मृत्यू या समस्येचे गांभीर्य अधोरेखित करणारे आहेत.

नेपाळच्या अधिकाऱ्याने यावर्षीच्या हंगामात आतापर्यंत 11 गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याच्या वास्तवाला पुष्टी दिली आहे. यात भारतीय गिर्यारोहकांचाही समावेश असल्यामुळे आपल्यासाठी ही समस्या चिंताजनक आहे. ऑक्‍सिजनच्या कमतरतेची समस्या शेवटचा टप्पा ओलांडताना ऑक्‍सिजनची कमतरता आणि प्रशिक्षणाचा अभाव या प्रमुख कारणांनी ही समस्या उद्‌भवली असल्याचे सांगितले जाते. तज्ज्ञांच्या मते, एव्हरेस्टवर वाढलेली गर्दी हेच या समस्येचे मुख्य कारण आहे. दोन भारतीय गिर्यारोहकांचा ज्या दिवशी मृत्यू झाला, तेव्हा खरे तर ते 25198 फूट या सुरक्षित उंचीपर्यंत पोहोचले होते. परंतु नंतर काय झाले हे कळलेच नाही असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ऑस्ट्रेलियातील एका गिर्यारोहकाचा मृत्यू झाल्याचे एका कुटुंबाने मान्य केले आहे. अर्न्स्ट लॅंडग्राफ असे या गिर्यारोहकाचे नाव असून, एव्हरेस्टवर चढाई करण्याचे स्वप्न पूर्ण केल्यानंतर थोड्याच वेळात 23 मे रोजी त्याचा मृत्यू झाला. प्रत्येक नैसर्गिक ठिकाणाची एक धारणक्षमता (कॅरिंग कपॅसिटी) असते. त्याहून अधिक लोकांचे येणेजाणे तेथे वाढले की पर्यावरणाचे प्रश्‍न बिकट होतातच; शिवाय तेथे जाणाऱ्यांना असणारा धोकाही वाढतो.

एव्हरेस्टसारख्या ठिकाणाची धारणक्षमता निश्‍चित करताना तेथील ऑक्‍सिजनची पातळी आणि बर्फाळ थंडी याचा प्रामुख्याने विचार करायला हवा आणि क्षमतेच्या प्रमाणातच तेथे मोहिमांची परवानगी द्यायला हवी. अन्यथा अशा घटना वारंवार घडत राहतील आणि त्या हताशपणे पाहण्याव्यतिरिक्त कुणीच काही करू शकणार नाही. निसर्गाला आव्हान देणे प्रत्येक वेळी सुरक्षित असेलच असे नाही. निसर्ग, पर्यावरण हे एक “शास्त्र’ आहे हे आधी मान्य करून त्यानुसारच निर्णय घ्यायला हवेत. एव्हरेस्टवरील “ट्रॅफिक जॅम’ धोकादायक आहे, हे नुकत्याच झालेल्या 11 मृत्यूंवरून सिद्ध झाले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)