पुणे शहरात उत्साह; तर ग्रामीण भागात संथ

पुणे – खडकवासला विधानसभा मतदार संघात मतदानाचा उत्साह दिसत होता. शहरी आणि ग्रामीण भागात विभागलेल्या या मतदारसंघात शहरी परिसरात मतदानाचा जोर अधिक दिसत होता. त्यामानाने ग्रामीण भागात मात्र संथ गतीने मतदान सुरू होते. मतदार यादीमध्ये नाव नसल्याने काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले असले तरी एकंदरीत या मतदार संघात शांततेत मतदान झाले. या मतदार संघात संध्याकाळपर्यंत 52.67 टक्के मतदान झाले.

बारामती लोकसभा मतदार संघात येणाऱ्या खडकवासला विधानसभा मतदार संघात यंदा सर्वच पक्षांनी जोर लावला होता. या मतदार संघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि भाजपच्या कांचन कुल यांच्यातच प्रमुख लढत पाहायला मिळत आहे. गेल्या निवडणुकीत खडकवासला मतदार संघातून राष्ट्रवादीला फटका बसला होता, यंदा तसा दगाफटका होऊ नये याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती.

या मतदार संघात कात्रज, धनकवडी, धायरी, सिंहगड रोड हा शहरी भाग येत असल्याने या भागात सकाळपासून मतदानाला उत्साह दिसत होता. धनकवडी, बालाजीनगर परिसरातील काही मतदान केंद्रावर सकाळी आठ वाजल्यापासून मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सिंहगड रोड परिसरातील धायरी सनसिटी, वडगाव, नांदेड सिटीमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती होती. नऱ्हे येथे नव मतदारांची संख्या अधिक दिसून आली. यावेळी नवले महाविद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर अनेक मतदारांची नावे नसल्याने थोडा गोंधळ झाला होता. ऑनलाइन मतदान यादीमध्ये नाव दिसते पण प्रत्यक्षात मतदान केंद्रावर असलेल्या यादीत नाव नाही, असे प्रकार घडले. त्यामुळे सुमारे दोनशे ते अडीचशे नवमतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले.

या मतदार संघात असणाऱ्या खेड-शिवापूर, खानापूर, पानशेत याठिकाणी मात्र मतदानाचा उत्साह थोडा कमी दिसला. ग्रामीण भाग असल्याने अनेकजण सकाळची कामे उरकून निवांत मतदानाला येताना दिसत होती. त्यामुळे मतदानाचे प्रमाण सुद्धा कमी होते. संध्याकाळी मात्र मतदान केंद्रावर काही प्रमाणात गर्दी दिसत होती; पण दिवसभर मतदान केंद्र शांतच होती. अनेकठिकाणी तर कार्यकर्ते मतदारांना घराघरांमध्ये जावून मतदानाचे आवाहन करताना दिसत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)