बाजारात दीपोत्सवाचा आनंद

पणत्या, आकाशकंदील, रांगोळ्यांनी लखलखाट

पुणे  – दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव… त्यात खरेदी म्हणजे, जणु दुधात साखरच. हल्ली खरेदी करताना “ट्रेंड’प्रमाणे खरेदी करण्याचे प्रमाण दिसून येते. फक्त मार्केटमध्येच नाही, तर ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांचे प्रमाणसुद्धा चांगले आहे. पणत्या, आकाशकंदील, रांगोळी, किल्ल्यावर ठेवली जाणारी चित्रं यासह आकर्षक फर्निचरपर्यंत सगळ्याच ठिकाणी गर्दी दिसत आहे. महिलांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे दागिने. याबाबतीत तर बाजारपेठा चांगल्याच सजल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

– पणती : सध्या “कलरफुल’ पणत्यांची चलती आहे. वेगवेगळे डिझाइन्स आणि आकारांमध्ये असलेल्या पणत्या सध्या “ट्रेंड’मध्ये आहेत. मेण आणि जेलच्या पणत्यासुद्धा बजेटमध्ये बसणाऱ्या आणि जास्त वेळ राहणाऱ्या आहेत. मातीच्या पणत्या 70 ते 150 रुपये डझनपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. तर ऑनलाइनवर त्याचे दर 150 रुपयांपासून सुरू आहेत.

– रांगोळी : सण म्हणजे रांगोळी आलीच. यासाठी लागणारे रंग, वेगवेगळ्या आकारात रांगोळीचे साचे, त्यासाठी लागणारे पेन हे साहित्य साधारण 10 रुपयांपासून ते जास्तीत जास्त 40 रुपयांपर्यंत बाजारामध्ये उपलब्ध आहेत. सध्या रेडिमेड रांगोळीचा “ट्रेंड’सुद्धा जोरात आहे. लाकडी, प्लॅस्टिक साच्यांवर असणारी कुंदन रांगोळी 80 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत बाजारात मिळू शकते. ऑनलाइनवर त्याचे दर 350 रुपयांपासून ते 2 हजार रुपयांपर्यंत आहेत.

– आकाशकंदील : परंपारिक आणि पर्यावरणपूरक आकाशकंदीलांना ग्राहकांची मागणी आहे. साधारण 50 रुपयांपासून छोटे तर 150 रुपयांपासून मोठे आकाशकंदील उपलब्ध आहेत. हॅंडमेड कागदांपासून तयार केलेल्या आकाश कंदिलांची किंमत जास्त असली तरी सर्व सामान्यांच्या बजेटमध्ये बसणारे आहेत. कलात्मक वस्तू घेण्याकडे एकंदरित ग्राहकांचा कल आहे.

–  विविध प्रकारच्या क्रॉकरीचे असंख्य पर्याय बाजारामध्ये व ऑनलाइन साइटसवर उपलब्ध आहेत. साधारण 100 रुपयांपासून ते 5000 पर्यंत वेगवेगळे पर्याय ग्राहकांसाठी खुले आहेत.

–  दागिने : दागिन्यांशिवाय दिवाळी पूर्ण होइलच कशी? महिला वर्गाची हिच इच्छा पूर्ण करण्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. साध्या मोत्याच्या पारंपारिक कानातल्यापासून ते सोन्याच्या हारापर्यंत असंख्य व्हरायटी उपलब्ध आहे. सध्या पारंपारिक दागिन्यांमध्ये बुगडीपासून ते पैंजणापर्यंत सगळ्याच दागिन्यांची चलती आहे. चेंजेबल ज्वेलरीदेखील “ट्रेंड’मध्ये आहे. कानातल्यांमध्ये सध्या झुमक्‍याचा ट्रेंड आहे. त्याची किंमत साधारण 20 रुपयांपासून सुरु आहे.

दिवाळीला भेट देण्यासाठी वेगवेगळ्या ग्रीटिंगचा पर्याय नेहमीप्रमाणे सामान्यांच्या खिशाला परवडण्यासारखा आहे. बाजारात 20 रुपयांपासून ग्रीटिंग उपलब्ध आहेत तर ऑनलाइन बाजारामध्ये त्याचे दर किमान 100 रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत आहेत.

– डेकोरेटिव्ह लाइटस्‌ : डेकोरेटीव्ह लाइटसमध्ये बाजारात छोट्या लाइट्‌च्या माळांपासून ते मोठ्या इलेक्‍ट्रिकल लाइट्‌स पर्यंत 150 रुपयांपासून ते 3000 रुपयांपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहे. ऑनलाइनमध्ये हेच पर्याय 200 रुपयांपासून उपलब्ध आहेत.

वर्षातून दिवाळी हा एकच मोठा सण असल्याने ग्राहकांची संख्या चांगली आहे. आतापर्यंत जरी काही अंशी मंदी होती, तरी आता सगळ्याच व्यवसायांना चांगले दिवस आहेत. त्याचबरोबर ग्राहकांचा जास्त प्रतिसाद पर्यावरकपूरक गोष्टींना असल्याचे व्यापारी सांगतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)