कार्डिफ – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या लढतीत इंग्लंडने क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सामना आपल्या नावे केला. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत त्याज़ंच्या क्षेत्ररक्षणामधील त्रुटींमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असे विधान इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन याने काढले आहे.
सामन्याच्या पहिल्या षटकापासून क्षेत्ररक्षणात गडबड झाल्याचे या सामन्यात दिसले. जेसन रॉयकडून क्षेत्ररक्षणात गफलत होणार नाही, असे म्हटले जाते; पण त्याने मोहम्मद हफीझचा 14 धावांवर सोडलेला झेल त्यांच्या साठी महागात पडला. या हफीझने 84 धावांची खेळी केली. यामुळे इंग्लंडचा कर्णधार मॉर्गननेही पराभवास गचाळ क्षेत्ररक्षण कारणीभूत ठरल्याचे सांगितले.
फलंदाजी, गोलंदाजी सगळे ठीक होते. पराभव झाला तो सुमार क्षेत्ररक्षणामुळे. एकवेळ फलंदाजी, गोलंदाजीतील चुका फारशा महागात पडणार नाहीत; पण क्षेत्ररक्षणातील एखादी चूकही सामना फिरवू शकते’, असे म्हणत मॉर्गनने आपल्या सहकाऱ्यांना सुनावले.