अतिक्रमणधारक – वन कर्मचाऱ्यांत वाद

कोपरगाव तालुक्‍यातील करंजी येथील प्रकार

प्रथमच एवढी मोठी कारवाई

कोपरगाव तालुक्‍यात वन विभागाने प्रथमच मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे वन जमिनीवरील अतिक्रमण करणारांचे धाबे दणाणले आहे. करंजी परिसरात मोठ्या प्रमाणावर वन अधिकारी व कर्मचारी दाखल झाले असून, परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. नगर, जामखेड, श्रीगोंदा, पारनेर, पाथर्डी, तिसगाव, राहुरी, कर्जत व कोपरगाव येथील तब्बल 55 वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा सात वाहनांसह घटनास्थळी हजर होता. त्यात 1 वनक्षेत्रपाल महिला, 1 वनपाल, 10 वनरक्षक महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

कोपरगाव – शासनाच्या वन महोत्सव कार्यक्रमांतर्गत तालुक्‍यातील करंजी शिवारातील वनजमिनीवर लागवड केलेली रोपे उपटून काही व्यक्तीनी बाजरी पेरली. आज याचा जाब विचारण्यास गेलेल्या वन अधिकारी व अतिक्रमणधारकांत बाचाबाची झाली. याप्रकरणी वन कायद्यान्वये 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये सात पुरुषांसह 23 महिलांचा समावेश आहे.

याबाबत माहिती अशी, वन विभागाने करंजी येथील वनजमिनीत वन महोत्सव कार्यक्रमांतर्गत वृक्ष लागवड केली होती. हे काम सुरू असताना या भागातील स्थानिक आदिवासी महिला व पुरुषांनी रोपटे उपटून फेकून देत सदर जमिनीवर बाजरीसह इतर पिकांची पेरणी करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. गत दोन दिवसांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समवेत वन अधिकारी व कर्मचारी या परिसरात वृक्ष लागवड करीत असताना त्यांची व स्थानिक रहिवाशांत बाचाबाची झाली. आज कोपरगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांनी या व्यक्तींना समजाविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशीही हुज्जत घालत ही जमीन आमच्या नावावर करून घेऊ. त्यासाठी कायदा बदलू, असा दम देण्यात आला. त्यामुळे जाधव यांनी जिल्ह्यातील सात ठिकाणच्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा बोलावला.

यावेळी रायभान विठ्ठल आहेर (वय45), पूजा रतन आहेर (वय56), भानुदास कारभारी आहेर (वय43), ज्ञानदेव दगडू आहेर (वय40), शिवाजी भिवा मोरे (वय40), राजू काशिनाथ आहेर (वय40), वाल्मीक रतन निकम (वय32), बबबाई शिवाजी मोरे (वय45), लक्ष्मीबाई दत्तू आहेर (वय40), अलका सोपान पवार (वय40), भारती पांडुरंग निकम (वय25), कडूबाई अंबादास पवार (वय40), लताबाई रतन निकम (वय55), हिराबाई शिवाजी आहेर (वय50), मंदाबाई सुभाष आहेर (वय55), सखूबाई बबन बर्डे (वय55), मुक्ताबाई रामदास मोरे (वय50), मीराबाई सुरेश आहेर (वय52), मीराबाई लक्ष्मण आहेर (वय45), उषा धर्मा मोरे (वय32), विठाबाई निवृत्ती आहेर (वय60), शोभा बाबासाहेब गायकवाड (वय25), अलका भाऊराव आहेर (वय32), लता ज्ञानदेव आहेर (वय50), मंदा भास्कर आहेर (वय24), गिरजाबाई संपत आहेर (वय55), मीराबाई भिका आहेर (वय57), गंगूबाई यादव मोरे (वय48), सत्यभामा भीमा गायकवाड (वय20) व मोनिका ज्ञानदेव आहेर (वय30) अशा 30 जणांविरुद्ध वन व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून सर्वांना अटक केली. त्यांना कोपरगाव न्यायालयात हजर केले असता, त्यांना 7 दिवसांची वन कोठडी देण्यात आली. महिला आरोपींना पुण्यातील येरवडा व पुरुषांना नगरच्या कारागृहात पाठविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)