मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची रिकामीच करा

जेजुरी नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांची मागणी; आंदोलनाचा इशारा

जेजुरी – जेजुरी नगरपालिकेत अकार्यक्षम मुख्याधिकाऱ्यामुळे संपूर्ण जेजुरी शहराचा विकास थांबला आहे. त्यांची बदली करून ही खुर्ची रिकामीच करावी, अन्यथा सत्ताधारी व विरोधी नगरसेवक येत्या काळात तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले असल्याचे सर्व नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत सांगितले,

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जेजुरी नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. 8) आयोजित करण्यात आली होती. या सभेत शहरातील विविध विकासकामांना मंजुरी व स्वच्छ सर्वेक्षण 2019-20 करिता आवश्‍यक बाबींवर चर्चा करण्यात येणार होती. परंतु, मुख्याधिकारी हे नेहमीप्रमाणे सभेला गैरहजर असल्याने सभा तहकूब करावी लागली.

शहरातील विकास कामांकरिता सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत दोन कोटींच्या कामांची दिनांक 21/12/2018 मध्ये मंजुरी मिळाली तसेच दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत दिड कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली. सर्व कामे पावसाळ्यापूर्वी व्हावीत, असे असताना मुख्याधिकारी यांनी जाणून-बुजून विकासकामे न होण्याच्या हेतूने जुलैच्या पहिल्या आठवड्यात टेंडर फोडल्याचे तसेच आडमुठ्या धोरणामुळे विकास कामे खोळंबली असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.

मुख्याधिकारी सर्वसाधारण व विशेष सभेस गेली अनेक वेळा उपस्थित राहीलेले नाहीत. यामुळे सभागृहाच्या कामात अडथळे येत आहेत. मुख्याधिकारी हे मुख्यालयात वारंवार गैरहजर राहतात. टेंडर उशिरा फोडणे, वर्कऑर्डर उशिरा देणे तसेच लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यां बरोबर सदैव गैरवर्तणूक करणे, लोकप्रतिनिधींचे फोन न उचलने, असे वर्तन करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांची ताबडतोब बदली करावी अन्यथा सत्ताधारी व विरोधी नगरसेवक मिळून मुख्याधिकारी यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करतील, असे निवेदन सर्व नगरसेवक, नगराध्यक्षांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

जेजुरी पालिकेची सभा इन कॅमेरा घ्यावी, अशी मागणी लिखित स्वरूपात केलेली होती. काही सदस्य शिवराळ भाषा वापरून अपमानित करतात, मागील काळात असे प्रकार घडले आहेत. तसेच, ऐनवेळी नियमबाह्य विषय घ्यायला लावून ठराव घ्यायला लावण्याचे प्रकार होत असल्याने मी सभेला हजर राहिलो नाही.
– संजय केदार, मुख्याधिकारी, जेजुरी नगर परिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)