वीज कंपन्यांच्या कंत्राटी कामगारांना मिळणार बोनस

पुणे – राज्यभरातील कंत्राटी कामगारांना दिलासा देण्यासाठी दिवाळीचा बोनस देण्याचे आदेश वीजकंपन्या प्रशासनाच्या वतीने सर्व खासगी ठेकेदारांना देण्यात आले आहेत. त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यामुळे तीनही वीजकंपन्यातील तब्बल 32 हजार कामगारांना दिलासा मिळणार आहे.

सरकारी, निमसरकारी, कंपन्या आणि सर्वच खासगी संस्थांमधील कामगारांच्या भरतीवर राज्य शासनाने गेल्या काही वर्षांच्या कालावधीत निर्बंध आणले आहेत. त्यामुळे कामाचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. त्यातच सेवेतून निवृत होणाऱ्या कामगारांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे कामाचा ताण कमी करण्यासाठी शासकीय आणि निमशासकीय संस्थांसह सर्वच कंपन्यांनी कंत्राटी पद्धतीवर कामगारांची भरती केली आहे. त्यांना किमान वेतनासह अन्य सर्व सुविधांचा लाभ मिळालाच पाहिजे, असे बंधनकारक आहे. मात्र, बहुतांशी ठिकाणी या नियमांचे पालनच होत नसल्याचे आतापर्यंत निदर्शनास आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महावितरणसह महापारेषण आणि महानिर्मिती या तीन वीजकंपन्यांमध्येही तब्बल 32 हजार कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. मात्र, काही अपवाद वगळता बहुतांशी ठेकेदार या कामगारांना बोनसचा लाभच देत नव्हते. यासंदर्भात गेल्या वर्षीच या कामगारांनी आणि त्यांच्या संघटनांनी यासंदर्भात राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीची दखल घेऊन या निर्णयाची तत्काळ आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व परिमंडलांना आणि खासगी ठेकेदारांना दिले होते. मात्र, हे वास्तव असतानाही त्याची दखलच घेतली नाही. त्यामुळे या कामगारांना बोनसपासून वंचित राहावे लागले होते, ही बाब संघटनांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यामुळे यावर्षी या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व परिमंडलाच्या प्रमुखांना देण्यात आल्या आहेत, त्याची पडताळणीही प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)