साताऱ्यात प्राथमिक सुविधांचा बोजवारा

रस्ते उखडल्याने वाहन चालकांची कसरत

सातारा – सातारा शहरात गेल्या तीन दिवसांत पावसाने जोर धरल्याने पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. उखडलेले रस्ते, शहराच्या पूर्व भागात घरात शिरलेले पाणी, तुंबलेली गटारे आणि पावसामुळे बनलेल्या धोकादायक इमारती यामुळे सातारा पालिकेने राबवलेल्या उपाययोजना तकलादू असल्याचे स्पष्ट झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांना “द्राविडी प्राणायाम’ करावा लागतोय हे सांगणारे रोजचे दृश्‍य सध्या साताऱ्यात पहायला मिळत आहे. सातारा हे जिल्ह्याचे हेडक्वार्टर आहे. पुण्यापासून बेंगलोरपर्यंत जाण्यासाठी सातारा मार्गेच जावे लागते. जिल्ह्यात 11 तालुके येतात. तालुक्‍यातील लोकांना न्यायालयीन व कार्यालयीन कामकाजासाठी सातारा शहरात यावे लागते. मात्र, या पावसाळ्यात सातारा शहराची दैना झाली असून उखडलेले रस्ते आणि खचलेल्या पुलामुळे स्थानिक नागरिकांसह बाहेरुन आलेल्या लोकांनाही द्राविडी प्राणायाम घालावा लागत असल्यामुळे साताऱ्यात जायलाच नको रे बाबा, अशी लोकांची मानसिकता झालेली आहे.
सातारा शहरात बारा महिने तेरा काळ उखडलेल्या रस्त्यांमुळे नागरिक हैराण झालेले असतात. नवीन तयार झालेला रस्ता काही दिवसांतच पूर्वपदावर येतो.

साताऱ्यातील एकही रस्ता विनाखड्ड्याचा नसतो. त्यात प्राधिकरणाच्या खुदाईमुळे रस्त्यांची पूर्णत: वाताहत झालेली आहे. उदा- शाहू चौकात चार भिंती रस्त्याचे पाणी सतत रस्त्यावर येऊन या चौकात डांबरीकरणाची खडी वर आली आहे. बाबर कॉलनी ते करंजेचा आंदेकर चौक, समर्थ मंदिर ते सोनीची गिरणी, पंताचा गोट, चांदणी चौक ते मंगळवार तळे मार्ग, कर्मवीर पथावर 501 पाटी ते लोणार गल्ली, शाहूपुरी ते कोटेश्‍वर मंदिर, राजवाडा ते देवी चौक या मार्गावर पावसाने खड्डे पडले असून मुख्यमंत्री निधीचे तब्बल तीन कोटी रुपये पाण्यात गेले आहे.

सातारा पालिकेतील रस्ते कंत्राटदार रस्ता तयार करतात, मात्र रस्ता खराब झाल्यानंतर ते याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. वास्तविक पाहता रस्ता तयार झाल्यानंतर दोन वर्षे त्या रस्त्याची डागडुजी करणे त्या ठेकेदाराला बंधनकारक आहे. मात्र, एकदा “बिल’ निघाल्यानंतर व कमिशन घशात घातल्यानंतर संबंधित ठेकेदार नामानिराळा होतो. गेल्या वर्षापासून पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटरचे काम सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण साताऱ्याचीच नाकाबंदी झालेली आहे. नक्की जायचे कुठून हा प्रश्‍न स्थानिक नागरिकांनाच पडत असल्याने बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची तर परिस्थिती बिकट होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)