एल्गार परिषदप्रकरण : राऊत याला जामीन देण्याचा युक्तीवाद

पुणे – एल्गार परिषदप्रकरणी दाखल एफआयआरमध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाली असा उल्लेख आहे. मात्र, पोलिसांनी दाखल केलेल्या तपासात आणि दोषारोपत्रात ते दोन समाज कोणते हे स्पष्ट होत नाही. पोलिसांनी दाखल केलेल्या इलेक्‍ट्रॉनिक पुराव्यांच्या क्‍लोन कॉपी त्यांना फॉरेन्सिक लॅबकडून मिळालेल्या आहेत. मात्र, त्यांनी त्या दोषारोपपत्रात जोडलेल्या नाहीत. अशा प्रकारचे पुरावे न्यायालयातील सुनावणीत बेकायदा प्रतिबंधक हालचाली कायद्यात लागू होत नाहीत, त्यामुळे महेश राऊतला जामीन देण्यात यावा, असा युक्तीवाद त्याच्या वकिलांनी शुक्रवारी कोर्टात केला.

विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांच्या कोर्टात ही सुनावणी सुरू आहे. एल्गार परिषदेशी संबंध असल्याच्या कारणावरून महेश राऊतला अटक केली आहे. त्याला जामीन देण्यात यावा, या मागणीसाठी त्याच्यातर्फे ऍड. शाहीद अख्तर यांनी युक्तीवाद केला.

याप्रकरणात सरकार पक्षातर्फे दाखल केलेल्या म्हणण्यात, पोलिसांनी जप्त केलेले इलेक्‍ट्रॉनिक पुरावे हे फॉरेन्सिक लॅबला देण्यात आले असून त्यांच्याकडून तपास अधिकाऱ्यांना त्याच्या क्‍लोन कॉपी (इलेक्‍ट्रॉनिक प्रति) देण्यात आलेल्या आहेत. मात्र, या प्रति दाखल दोषारोपपत्रात जोडण्यात आलेल्या नाहीत. अशा प्रकारच्या प्रति तयार करताना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी असलेले पत्र घेणे आवश्‍यक असते. ते पत्र आणि क्‍लोन कॉपी जोडण्यात आलेल्या नाहीत. बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायदा (युएपीए)च्या कलम 46 नुसार अशा प्रकारचे पुरावे न्यायालयातील सुनावणीत ग्राह्य धरले जात नाहीत. या मुद्द्याच्या आधारे महेश राऊतला जामीन देण्यात यावा, अशी मागणी ऍड. अख्तर यांनी केली.

एल्गार परिषदप्रकरणी दाखल एफआयआरमध्ये दोन समाजात तेढ निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, हे समाज कोणते हे दोषारोपपत्रात नमूद केलेले नाही. एल्गार परिषदप्रकरणी अटक आरोपींवर दाखल दोषारोपपत्रात शस्त्रास्त्र गोळा करणे, अशा कारवायांसाठी निधी उभा करणे याचा उल्लेख आहे. मात्र, हे ज्या भागातून करण्यात आले त्या भागातील न्यायिक अधिकार क्षेत्रात याप्रकरणी गुन्हा दाखल करणे आवश्‍यक आहे. मात्र, अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. एल्गार परिषदेचा कार्यक्रम कायदेशीर होता. त्याला महापालिकेची परवानगी होती. त्याच्या आयोजनासाठी पुण्यातील पुरोगामी संघटनांना बोलावून त्यासाठी वर्गणी उभी करण्यात आली, असे दोषारोपपत्रातील जबाबावरून निदर्शनास येते. एल्गार परिषदेत सूत्रसंचालन करणारा सागर गोरखे हा आरोपी कोर्टापुढे आलेला नाही. एल्गार परिषदेला राऊत नव्हता. त्याचा याप्रकरणात प्रथमदर्शनी संबंध नाही, त्याला जामीन देण्यात यावा, असा युक्तीवाद ऍड. अख्तर यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)