अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया उद्यापासून; जागा वाढविण्याचा निर्णय

मुंबई, पुणे व नागपूर महाविद्यालयांमध्ये जागा वाढविण्याचा निर्णय- शिक्षणमंत्र्यांची विधानसभेत माहिती

मुंबई : सर्वांना समान न्याय व प्रवेशासाठी समान संधी या तत्वावर अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अधिकच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूर या शहरातील ऑनलाईन प्रवेशाकरिता निश्चित केलेल्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचा कल असलेल्या महाविद्यालयामध्ये जागा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत विद्यार्थ्यांचा भाग दोन भरून घेणे व पुढील प्रक्रिया उद्या दि. १९ जूनपासून सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

श्री. शेलार म्हणाले, मुंबई क्षेत्रातील निवडक प्राचार्यांसोबत झालेल्या चर्चेप्रमाणे मुंबईकरिता निश्चित ऑनलाईन प्रवेश क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचा कल असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेकरिता 5 टक्के आणि कला व वाणिज्य शाखेकरिता 8 टक्के अधिक जागा वाढवून देण्यात येत आहे.

तसेच पुणे व नागपूर करिता निश्चित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रवेश क्षेत्रामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान या शाखेकरिता 10 टक्के जागा विद्यार्थ्यांचा कल असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये वाढवून देण्यात येत आहेत.

ही वाढ या क्षेत्रातील इयत्ता अकरावी प्रवेशाकरिता नोंदणी केलेले राज्यमंडळ आणि सीबीएसई (CBSE) व आसीएसई (ICSE) च्या विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांचा कल असलेल्या कनिष्ठ महाविद्यालया व्यतिरिक्त अन्य कनिष्ठ महाविद्यालयांमध्येही जागा वाढवून देण्यास मंजुरी देण्यात येत आहे. या महाविद्यालयांच्या मागणीनुसार व त्यांची गरज तपासून वाढीव जागा विभागिय शिक्षण उपसंचालक स्तरावर मंजूर करण्यात येतील.

जुलै 2019 मध्ये पुरवणी परीक्षा व यानंतर इयत्ता अकरावीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सदर वाढीव जागेची टप्प्याटप्प्याने तरतूद करण्यात येईल. सन 2019-20 या वर्षाकरिताच इयत्ता अकरावी करिता कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये या वाढीव जागा मंजूर करण्यात येत आहेत.

शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून राज्य मंडळाची संलग्नित असलेल्या शाळांतील इयत्ता  दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी व विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन व्हावे, या हेतूने भाषा व समाजशास्त्र या विषयातील अंतर्गत मुल्यमापन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे राज्यातील इयत्ता दहावीच्या निकालात लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले.

मार्च 2019 मध्ये इयत्ता दहावीच्या राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेकरिता 16 लाख 77 हजार 267 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. व त्यापैकी 12 लाख 66 हजार 861 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 75.53 टक्के इतकी आहे, असेही श्री. शेलार यांनी सांगितले. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)