निवडणुका झाल्या, आता तरी “एचए’ला मिळावा दिलासा

22 महिन्यांचा पगार, 500 कामगारांच्या स्वेच्छानिवृत्तीची रक्‍कम थकित
पिंपरी  –
पिंपरीतील हिंदुस्थान ऍण्टीबायोटिक्‍स कंपनीतील (एच.ए.) कामगारांच्या 22 महिन्यांचा पगार, 500 कामगारांच्या स्वेच्छानिवृत्तीची रक्कम आदींसाठी 450 कोटी रुपयांचा मागणी प्रस्ताव केंद्राकडे लोकसभा निवडणुकांपूर्वी पाठविण्यात आलेला आहे. आता निवडणुका झाल्यानंतर तरी किमान या प्रस्तावाबाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. हा निर्णय झाल्यास तसेच कंपनी चालविण्यासाठी भांडवल उपलब्ध झाल्यास कंपनीला नवसंजीवनी मिळू शकते. त्यामुळे अनेक कामगारांचे लक्ष या प्रस्तावाकडे आहे.

एच.ए. कंपनी तोट्यात आहे. कंपनीला तोट्यातून बाहेर काढून पूर्वपदावर आणण्यासाठी 821 कोटी 17 लाख रुपयांचा पुनर्वसन प्रस्ताव डिसेंबर 2016 मंजूर करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार 500 कामगारांना स्वेच्छानिवृत्ती, कामगारांचा थकित पगार आणि बॅकांचे कर्ज देण्याचे नियोजन होते.

कंपनीची जमीन विक्री करून त्यासाठी आवश्‍यक रक्कम उभारण्याचे नियोजन होते. त्यासाठी दोन वेळा निविदा काढण्यात आल्या. मात्र, त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आत्तापर्यंत जमीन विक्री होऊ शकलेली नाही. दरम्यान, जमीन विक्री होत नसल्याने 450 कोटी रुपये कर्ज रूपाने मिळावे, असा प्रस्ताव केमिकल ऍण्ड फर्टिलायझर मिनिस्ट्रीतर्फे कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर यांच्याकडे पाठविण्यात आला. अद्याप हा प्रस्ताव प्रलंबित आहे. कंपनीची जमीन विक्री झाल्यानंतर संबंधित 450 कोटी रुपयांची रक्कम परत केली जाणार आहे.

एच. ए. कंपनीची जमीन विक्री होत नसल्याने केंद्र सरकारकडून 450 कोटी रुपयांची रक्कम कर्ज रूपाने मिळावी. केंद्राने हा प्रस्ताव मंजूर केल्यास कामगारांचा प्रश्‍न सुटू शकेल.

– एस. आर. पाटसकर, सरचिटणीस, हिंदुस्थान ऍण्टीबायोटिक्‍स मजदूर संघ

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)