इलेक्शन टुरिझम

देशात निवडणुकीचा ज्वर वाढत चाललेला असताना गुजरातमधील टूर ऑपरेटर्सनी हा “इव्हेंट’ कॅश करण्याचे ठरवले आहे. लोकसभा निवडणुकीशी संबंधित विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी या टूर ऑपरेटर्सनी विशेष पॅकेजेस आणली आहेत. गुजरातमधील 20 टूर ऑपरेटर्सनी राजकीय पक्षांच्या रॅलींमध्ये सहभागी होण्यापासून ते उमेदवारांसोबतच्या बैठकांपर्यंत अनेक “पर्याय’ या पॅकेजमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या क्‍लृप्तीला “इलेक्‍शन टुरिझम’ असे नावही देण्यात आले आहे. पर्यटन उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील जवळपास 1800 पर्यटकांनी या विशेष पॅकेजअंतर्गत गुजरातेत 2014 च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान सहभाग घेतला होता. यंदाच्या वर्षी ही संख्या 2500 हून अधिक होईल असा अंदाज आहे.

टूर ऑपरेटर्सची एक संघटना असणाऱ्या गुजरात टुरिझम डेव्हलपमेंट सोसायटीचे अध्यक्ष मनीष शर्मा सांगतात की, 2014 मध्ये राज्यात येणाऱ्या पर्यटकांमध्ये प्रामुख्याने विद्यार्थी, अभ्यासक, माध्यमकर्मी, राजकीय विश्‍लेषक आणि भारतात इतक्‍या मोठ्या प्रमाणावर निवडणुका कशा पार पडतात हे जाणून घेण्यास इच्छुक असणाऱ्यांचा समावेश होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान 1800 विदेशी पर्यटक गुजरातेत आले होते. हे पर्यटक प्रामुख्याने जपान, संयुक्‍त अरब आमिराती, अमेरिका आणि युरोपिय देशांमधील होते. टूर ऑपरेटर्सनी त्यांना बाईक रॅली, नेत्यांच्या सभा यांसारखे निवडणुकांशी संबंधित कार्यक्रम पाहण्यासाठी आणि त्यामध्ये सहभागी होण्यास नेले होते. गुजरातमध्ये पर्यटनाचा हा अनोखा फंडा 2012 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वप्रथम वापरण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)