निवडणूक यंत्रणा 100% सज्ज

जिल्हा प्रशासनाचा दावा : जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन
बिघाड झाल्यास फक्‍त 20 मिनिटांत बदलले जाणार ईव्हीएम

पुणे – पुरेशा संख्येने ईव्हीएम (ईलेक्‍ट्रॉनिक वोटिंग मशीन), व्हीव्हीपॅट (वोटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) मतयंत्रांची उपलब्धता, निवडणूक कर्मचारी व पोलीस बंदोबस्ताचे नियोजन, संवेदनशील केंद्रांवर वेबकास्टिंग, टपाली मतदानाची सोय, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा आणि भरारी पथकांची नियुक्ती, अशी चोख तयारी करत पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी 100 टक्के सज्ज असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने शनिवारी केला.

निष्पक्ष आणि भयमुक्त वातावरणात यंदा निवडणुका पार पडणार असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. राज्यासह देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघासाठी दि.23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत मांडला. एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने प्रयत्न केल्याचे नमूद करत जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्ह्यातील चारही मतदारसंघांच्या यादीतून 60 हजार मृत मतदारांची नावे शिवाय अर्जांच्या आधारे पाच ते सहा हजार स्थलांतरितांची नावे वगळली आहेत.

टपाली मतदानाच्या सुविधेमुळे 22 हजार निवडणूक कर्मचारी, तर लष्करासह पोलीस प्रशासनातील 25 हजार अधिकाऱ्यांना मतदान करता येणार आहे. मतदान यंत्रात बिघाड झाल्यास शहरी भागात 20 मिनिटांत, तर ग्रामीण भागात 30 मिनिटांत पर्यायी मतयंत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. संवेदनशील केंद्रांवर वेबकास्टिंग केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

…तर संबंधितांविरुद्ध गुन्हा
पुणे आणि बारामती लोकसभेसाठी रविवारी सायंकाळी 6 वाजता प्रचाराची सांगता होणार आहे. त्यानंतर प्रचार करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले जातील, तसेच मतदानादिवशी सर्व आस्थापनांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतरही मतदानापासून वंचित ठेवल्याची तक्रार केल्यास संबंधित आस्थापनेविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)