निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोग मुंबईत दाखल

मुंबई: आगामी लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा  यांचे आज येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आगमन झाले.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोगाचे स्वागत केले. भारत निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त सुदीप जैन, उपनिवडणूक आयुक्त चंद्रभूषण, महासंचालक (व्यय) दिलीप शर्मा आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आज आयोगाने पोलीस विभाग आणि केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा घेतला. राज्यात निवडणुकीसाठी नियुक्त केलेले पोलीस दलाचे मनुष्यबळ, मनुष्यबळाची वाहतूक आदी आढावा घेतला. त्यानंतर निवडणुकीत होणाऱ्या उमेदवार आणि राजकीय पक्षांचा खर्चाचे संनियंत्रण, निवडणूक काळात अवैधरित्या होणारी पैशाची हाताळणी, वाहतूक, बेनामी रकमेचे व्यवहार, मद्य आणि अंमली पदार्थांची वाहतूक, समुद्रमार्गे व विमानाने पैसे तसेच अन्य स्वरूपात निवडणुकीत वापरासाठी येणाऱ्या पैशावर लक्ष ठेवण्याबाबत आणि गैरव्यवहार आढळल्यास कारवाई करणे आदी सूचना दिल्या. रेल्वे विभागाने निवडणुकीसाठी नेमलेल्या सुरक्षा दलाची गतीने वाहतूक होईल आणि त्यासाठीच्या विशेष रेल्वे गाड्यांना प्रवासासाठी प्राधान्यक्रम द्यावा असे आयोगाने सांगितले.

राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाने समन्वयाने अवैध मद्याविरोधात कारवाई करावी. अमली पदार्थ विरोधी विभागाच्या तयारीचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

राज्य परिवहन विभागाकडून निवडणूक यंत्रणेसाठी वाहने कमी पडणार नाहीत,याची दक्षता घेण्यात यावी. भारतीय विमानतळ प्राधिकरण (एअरपोर्ट ॲथोरिटी ऑफ इंडिया) यांच्याकडून विमानतळावर केलेल्या तपासणी व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. भारतीय पोस्ट विभागाने केलेल्या टपाली तिकिटे तसेच इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टिम (आयटीपीबीएस) बाबतच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. बीएसएनएल कडून करण्यात आलेल्या संदेशवहन व्यवस्थेबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला.

निवडणूक आयोगाने मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष तसेच राज्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेतही चर्चा करून त्यांच्या सूचना जाणून घेतल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)