प्रचाराद्वारे झाडल्या जाताहेत आरोपांच्या फैरी

प्रातिनिधिक छायाचित्र,

– रोहन मुजूमदार

राजकीय नेतेमंडळी व त्यांचे कार्यकर्ते मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून मतदारांना नमस्कार करीत त्यांच्याशी संवाद साधत आहेत. तर जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांना घाम गाळावा लागत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील मतदानासाठी जवळपास एक महिना शिल्लक असला तरी आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. अलिकडच्या प्रत्येकच निवडणुकीत प्रचाराची पातळी घसरत चालली आहे. मात्र, जिल्ह्यात अद्याप पातळी घसरली नसली तरी आगामी काही दिवसात ती घसरेल अशी शक्‍यता राजकीय तज्ञांकडून वर्तवली जात आहे.

पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (दि. 23 एप्रिल) तर मावळ आणि शिरूरसाठी सोमवार (दि. 29 एप्रिल) मतदान होणार आहे. म्हणजेच जवळपास महिनाभराचा अवधी उमेदवारांना प्रचारला मिळाला आहे. त्यामुळे अद्याप पाहिजे तेवढे वातावरण तापले नसले तरी प्रचाराला वेग आला नसला तरी विविध राजकीय पक्षाचे नेते, उमेदवार, कार्यकर्ते मेळावे, प्रचार यात्रा आदींमध्ये सहभागी झालेले दिसून येत आहेत.

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान जवळ येऊन ठेपले आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात असलेल्या नेतेमंडळींची धावपळ सुरू झाली आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यावेळी सूर्यही आग ओकणार असल्याने प्रचाराच्या वेळाही बदलणार आहेत. त्यात सकाळी सातवाजेपासून सुरू होणाऱ्या प्रचारफेऱ्या दुपारी 1 वाजेपर्यंत चालतील. त्यानंतर दुपारच्यावेळी कार्यकर्त्यांच्या बैठका आणि मेळावे घेऊन पुन्हा सायंकाळी 5 नंतर प्रचार यात्रेला प्रारंभ, तर सायंकाळी जाहीर सभा किंवा वॉर्डामधील नुक्कड सभा रात्री 10 पर्यंत चालतील असा कयास लावण्यात येत आहे.

आचारसंहितेमुळे सभा, स्कूटर मिरवणूक, पदयात्रा रात्री 10 वाजताच्या आत संपवाव्या लागतात. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचे नियोजन, कार्यकर्त्यांची व्यवस्थाही करावी लागतेच. सकाळी 7 ते रात्री 1 वाजतापर्यंत कार्यकर्त्यांचे मेळावे, प्रचारसभा, बैठका असा एक कलमी कार्यक्रमच सर्वच राजकीय पक्षांचा असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, पक्षाचा स्टार प्रचारकाच्या सभेसाठी गर्दी जमविण्यासाठी कार्यकर्त्यांनीही आतापासून “फिल्डिंग’ लाऊन ठेवली आहे. तसेच उमेदवाराच्या प्रचारात कोणतीही कमतरता भासणार नाही यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींची यादी पक्ष कार्यलय, कार्यकर्त्यांच्या व्हॉटस्‌ऍप ग्रुपवर फिरत असल्याने प्रचारासोबत तयारीही “हायटेक’ झाली आहे.

त्यामुळे कार्यकर्तेही खुश
नेतेमंडळींबरोबर कार्यकर्त्यांचा दिवसही भल्या सकाळीच सुरू होतो. दिवसभर कार्यकर्त्यांना ताजेतवाने ठेवण्यासाठी नेतेमंडळींनी त्यांची संपूर्ण बडदास्त ठेवली आहे. सर्वच प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी संबंधित भागात किंवा कार्यालयांमध्ये दुपारच्या विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळच्या न्याहरीपासून रात्रीच्या जेवणापर्यंत तर, फिरण्यासाठी गाड्यांचीही व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे कार्यकर्तेही खुश आहेत.

राजकीय धुळवडीला चढला रंग
मत मागण्यासाठी का होईना नेते दारापर्यंत येत आहेत ना यातही समाधान मानणारे अनेक नागरिक दिसून येतात. त्याबाबतच्या चर्चाही ते अगदी कौतुकाने करताना दिसत आहेत. अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांचा दिवसही भल्या सकाळी सुरू होत असल्याने राजकीय धुळवड सुरू झाली आहे. तर मतदानाचा दिवस जसा जवळ येणार आहे, तसतसे स्टार प्रचारकांच्या प्रचार सभांनी संपूर्ण वातावरण राजकीय होऊन जाणार आहे यात कोणाचेही दुमत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)