प्रचाराची टार्गेट्‌स (अग्रलेख)

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया सुरू असतानाच देशात प्रचारानेही गती घेतली आहे आणि या प्रचारातील विविध पक्षांची टार्गेट्‌सही आता समोर येऊ लागली आहेत.गेल्या काही दिवसांत विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी केलेली विधाने पाहता आगामी काळातील राजकीय हमरीतुमरीचे संकेत लक्षात येतात. कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचे टार्गेट अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत. तर सत्ताधारी भाजपकडून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि महाराष्ट्रात शरद पवार यांनाच टार्गेट केले जाईल हे उघड आहे. त्याशिवाय त्या त्या राज्यांप्रमाणे तेथील स्थानिक प्रभावशाली नेत्यांनाही प्रचाराच्या टीकेचे लक्ष्य केले जाईल.

पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू, बिहारमध्ये लालूप्रसाद आणि दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनाच टार्गेट केले जाईल. तरीही या निवडणुकीत सर्वात जास्त हल्ला सत्ताधारी पक्षाचे प्रमुख नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच केला जाईल. कारण 2014 ची निवडणूक मोदी यांनी एकहाती भाजपला जिंकून दिली असल्याने मोदी यांना तसा चमत्कार पुन्हा करता येऊ नये यासाठी कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी कंबर कसली नसती तरच नवल. मोदी आपल्या प्रचाराच्या भाषणांमध्ये ज्या गोष्टींचे भांडवल करू शकतात अशा सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्याविरोधात वातावरण निर्माण करणे यालाच विरोधी पक्षांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे चौकीदार आणि छप्पन इंच छाती हे दोन विषय प्रचारामध्ये गाजणार हे उघड आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हवाई हल्ला करून जो बदला घेतला त्याचे भांडवल भाजप करणार आणि त्याचा निवडणूक प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनवणार हे गृहीत असल्यानेच विरोधकांची रणनीती त्याप्रमाणेच असणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी “चौकीदार चोर है’ अशी प्रचाराची मोहीम उघडली होती. यावेळी पुन्हा तसेच होणार याची कल्पना असल्यानेच भाजपने “मैं भी चौकीदार’ ही प्रचाराची रणनीती आखली. देशातील प्रत्येक माणूस “मैं भी चौकीदार’ असे म्हणू लागला तर “चौकीदार चोर है’ असा प्रचार राहुल यांना करता येणार नाही अशी अटकळ भाजपने बांधली आहे. पण तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मैं भी चौकीदार’ या मोहिमेवर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. मोदी जनतेचे नव्हे तर अनिल अंबानी आणि नीरव मोदीचे चौकीदार असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. म्हणजेच आगामी प्रचारातही याच विषयावर रान उठवले जाणार आहे हे निश्‍चित.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर याच विषयातून निशाणा साधला आहे. मोदी यांना देशाची गुप्त माहिती नीट ठेवता येत नाही ते देशाचं रक्षण कसे करणार? असा प्रश्‍न उपस्थित करत शरद पवार यांनीही चौकीदार चोर है हाच मुद्दा रेटला आहे. देशाचे संरक्षणमंत्रिपद भूषवलेल्या पवार यांना हवाई हल्ल्यासारख्या विषयाचा निवडणुकीत फायदा होऊ शकतो याची कल्पना असल्यानेच त्यांनी 56 इंचाची छातीचा विषयही रेटला आहे. भाजपाने 56 इंचाच्या छातीचा दावा केला आणि पाकिस्तानच्या तावडीतून विंग कमांडर अभिनंदन यांना सोडवण्यात आले तसे कुलभूषण जाधवला का सोडण्यात आले नाही? तेव्हा 56 इंच छाती कुठे गेली? असा प्रश्‍न विचारून पवार यांनी आणखी एक मुद्दा समोर आणला आहे. दुसरीकडे भाजपने राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनाच लक्ष्य करताना वैयक्‍तिक अपप्रचारावरच भर दिला आहे.

उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी यांचा प्रचार कॉंग्रेससाठी परिणामकारक आणि भाजपसाठी हानिकारक ठरू शकतो याची कल्पना असल्यानेच भाजपला वैयक्‍तिक अपप्रचाराचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळेच प्रियंका यांचे पती रॉबर्ट यांचा कथित भ्रष्टाचारच भाजपकडून टार्गेट केला जात आहे. त्याशिवाय राहुल आणि सोनिया यांच्याशी संबंधित नॅशनल हेरॉल्डचा विषयही पेटवून भाजप आपली चौकीदाराची रणनीती पुढे रेटेल अशी शक्‍यता आहे. आगामी काळात सभा गाजवण्यासाठी आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी वाटेल ते आरोप आणि प्रत्यारोप केले जातील. प्रचाराची टार्गेट्‌स आणि विषय ठरले असल्यानेच प्रचाराचा धुराळा जोरात उडणार आहे. निवडणुुकीच्या पहिल्याच टप्प्यात प्रचाराचे हे सर्व मुद्दे आक्रमकपणे रेटले जात असताना रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केलेले विधान सर्वच राजकीय पक्षांनी लक्षात घ्यायला हवे. देशातील बेरोजगारीच्या प्रश्‍नाकडे साफ दुर्लक्ष झाले असून ही चिंताजनक बाब आहे, असे राजन यांनी म्हटले आहे. नोटबंदीसारख्या अर्थकारणाला नुकसानकारक ठरलेल्या योजनांच्या संबंधात सरकारने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सुचवले आहे.

पीएफ अकाउंट वाढले म्हणजे रोजगार वाढला असे मानून आपल्याला आत्मसंतुष्ट राहता येणार नाही. रोजगार निर्मितीचे आकडे मोजण्यासाठी अधिक सुधारित पद्धत आपल्याला अवलंबावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले आहे. राजन यांनी जो विषय समोर आणला आहे तोच अत्यंत गांभीर्याने प्रचाराचा भाग बनण्याची गरज आहे. त्याशिवाय लोकांच्या रोजच्या जीवनमरणाचा भाग बनलेले विषयच प्रचारात ठामपणे पुढे येण्याची गरच आहे. वैयक्‍तिक टीका प्रतिटीका आणि आरोप प्रत्यारोप याने फक्त सभांमध्ये जोरदार टाळ्या मिळतील. बाकी काहीच साध्य होणार नाही हे सर्वच राजकीय पक्षांनी समजून घेण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)