निवडणूक आणि घोषणाबाजी

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय वातावरण एव्हाना चांगलेच तापले आहे. प्रचाराच्या भाऊगर्दीत तरुणाईचा जोश मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. नेतेमंडळींच्या सभा निवडणुकीच्या वातावरणात अधिकच रंग भरण्याचे काम करीत आहेत. सभांमध्ये एकमेकांवर होणारी चिखलफेक कार्यकर्त्यांच्या उत्साहाला अधिकच बळ देणारी ठरत आहे.

निवडणुकांत ज्याप्रमाणे धडाडीचे कार्यकतें महत्त्वाचे ठरतात. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांकडून होणारी घोषणाबाजी सुद्धा पक्षात व उमेदवारांत नवचैतन्य निर्माण करणारी ठरत असते. पक्षाचा अजेंडा घराघरात पोहोचविण्यासाठी व कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण करण्यासाठी या घोषणा अतिशय महत्त्वाच्या ठरत असतात.

घोषणाबाबत सांगायचे झाल्यास 1965 साली तत्कालीन पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्रींनी भारत-पाक युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर जय जवान, जय किसान’ ही घोषणा दिली होती. या घोषणेने देशभरात प्रसिद्धी मिळविली होती. पुढे राष्ट्रीय घोषवाक्‍य म्हणूनही ही घोषणा चर्चेत राहिली

1971 च्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाओ देश बचाओ ही कॉंग्रेसची अधिकृत घोषणा जाहीर केली. या घोषणेने कॉंग्रेसला विक्रमी 352 जागा मिळवून देत बहुमतात जिंकूनही आणले. पुढे 1977 ला इंदिरा गांधींच्या गरिबी हटाओ’ला विरोधकांनी इंदिरा हटाओ, देश बचाओ’ने प्रत्युत्तर दिले होते.

नव्वदीच्या दशकात रिक्षांतून कर्णे लावून दिली जाणारी ताई माई आक्‍का…. ही घोषणा जनमानसात अतिशय प्रभावी ठरली होती. पुढे बदलत्या काळानुसार प्रचारतंत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाला. सोशल मीडियाने मोठ्या प्रमाणात प्रचारयंत्रणेचा ताबा घेतला. मात्र तरीही घोषणाबाजीचे महत्त्व त्यात अद्यापही अबाधित राहिले आहे.

1995 च्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाची ताई माई आक्‍का विचार करा पक्‍का, आणि पंजावर मारा शिक्‍का ही घोषणा घराघरात पोहोचली होती. त्याचप्रमाणे त्याचकाळात शिवसेनेची अरे आवाज कोणाचा? शिवसेनेचा! या घोषणेने तमाम शिवसैनिकांत जणू विजेचा संचार आणला होता. स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या सभांत तर या घोषणेने अवघा शिवाजी पार्क दुमदुमून जात असे. पुढे कोण आला रे कोण आला? शिवसेनेचा वाघ आला! ही घोषणाही तितकीच लोकप्रिय ठरली.

पुढे वेळेप्रमाणे अनेक घोषणाही बदलत गेल्या. अनेक घोषणांनी सर्वसामान्यांना चांगलीच भुरळ घातली होती. 2007 मध्ये उत्तर प्रदेशात मायावतींनी हाथी नहीं गणेश है, ब्रह्मा विष्णु महेश है ही घोषणा दिली. या घोषणेने अल्पावधीतच उत्तर प्रदेशातील जनतेच्या मनाचा ताबाही घेतला. आणि त्या निवडणुकीत मायावती सरकार बहुमतात निवडूनही आले.
2004 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांना भाजपने पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून घोषित केले. त्यावेळी अबकी बारी अटल बिहारी’ हा नारा भाजपने दिला. त्याचवेळी कॉंग्रेस पक्षाने ‘कॉंग्रेस का हाथ, आम आदमी के साथ’ हा नारा दिला. त्या निवडणुकीत कॉंग्रेसचे घोषवाक्‍य प्रभावी ठरले आणि कॉंग्रेस सत्तेत आली.

2014 ची निवडणूक मात्र भारतीय राजकारणाला कलाटणी देणारी ठरली. या निवडणुकीतील घोषणाही देशभरात अतिशय लोकप्रिय ठरल्या. त्यातही भारतीय जनता पक्षाची अबकी बार मोदी सरकार ही घराघरांत पोहोचली. त्याच जोडीला अच्छे दिन आने वाले हैं आणि सबका साथ सबका विकास या घोषणांनीही चांगलीच लोकप्रियता मिळवली. त्याच जोरावर पुढे एन डी ए सरकार सत्तेतही आले. याच निवडणुकीत कॉंग्रेस का हाथ, आम आदमी के साथ’ ही कॉंग्रेसची घोषणा कायम राहिली. याच काळात दिल्लीत आप पक्षाने ‘मै हूँ आम आदमी, मुझे चाहीये स्वराज,’ आणि इस बार चलेगी झाडू’ या घोषणांनी विधानसभा निवडणुकांत भव्यदिव्य यश प्राप्त केले.

आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढू लागला आहे. भाजप प्रतिनिधित्व करणाऱ्या एनडीए ने फिरसे एकबार मोदी सरकार या घोषणेला उचलून धरले आहे. तर कॉंग्रेस आणि घटकपक्षांनी पुन्हा गरिबी हटाओ… ला केंद्रस्थानी ठेवून घोषणांना वाट मोकळी करून दिली आहे. आता या घोषणा कोणाला सत्तेच्या सिंहासनावर बसविणार आणि कोणाच्या स्वप्नांचा चुराडा करणार हे लवकरच समजेल. तूर्तास तरी आव्वाज कुणाचा….. याचे खात्रीशीर उत्तर मिळणे कठीणच म्हणावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)