शरद पवारांवर नाथाभाऊंचे शरसंधान

मराठा समाजाच्या आंदोलनात फूट पाडण्याचा केला होता आरोप

नगर – सकल मराठा समाजाच्या आंदोलनात सरकार व काही लोक फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. त्यावर पवारांनी विस्तृत खुलासा करावा, जेणेकरून आम्हालाही आमची भूमिका मांडता येईल, अशी टीका भाजपचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ओबीसी फाउंडेशन इंडियाच्या वतीने आयोजित गुणगौरव सोहळ्यासाठी माजी महसूलमंत्री खडसे शहरातील सहकार सभागृह येथे आले होते. यावेळी कार्यक्रमानंतर उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात वेगवेगळ्या पुढे येत असलेल्या भूमिकांकडे खडसे यांचे लक्ष वेधले, याबाबत बोलताना खडसे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी राज्यातील सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. मात्र, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता न्यायाहक्काचे आरक्षण मराठा समाजाला मिळावे, ही भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे. सरकारही त्या दृष्टीकोनातून सकारात्मक प्रयत्न करीत आहे. अहवाल येईपर्यंत वाट पाहवी लागेल, असे खडसे म्हणाले.

नुकत्याच पार पडलेल्या जळगाव व सांगली महापालिकांच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. दोन्ही ठिकाणचा विजय भाजपचा आहे. असे खडसे म्हणाले. जळगाव मनपातील विजयासंदर्भात बोलताना खडसे म्हणाले, तेथे भाजपाची आघाडी सुरेश जैन व शिवसेनेसोबत व्हावी, अशी काही जणांची निवडणुकीपूर्वीच इच्छा होती. मात्र, आपण निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, स्वबळावर निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला युती वा आघाडी केली असती, तर मिळालेल्या विजयात सहकारी पक्ष सामील झाले असते. मात्र, आपल्या सूचनेबरहुकूम जळगावमध्ये स्वबळावर निवडणूक पक्षाने लढवली आणि त्यातून मिळालेला विजय हा भाजपाचा ठरला 2014 प्रमाणेच 2019 मध्ये भाजपाला घवघवीत यश मिळेल, असा विश्‍वास खडसे यांनी यावेळी व्यक्‍त केला.

तत्पूर्वी ओबीसी फाउंडेशनच्या वतीने सहकार सभागृहात आयोजित स्पर्धा परीक्षांच्या गुणगौरव कार्यक्रमात खडसे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्‍त करताना नाथाभाऊ यांनी मंत्रिपदावरून काढल्याची मनातील खदखद पुन्हा एकवार जाहीरपणे व्यक्‍त केली. खडसे यांच्या आधी शिवसेनेचे संघटक गोविंद घोळवे व प्रकाश शेंडगे यांनी आपल्या मनोगतातून खडसेंवर झालेल्या अन्यायाकडे लक्ष वेधले होते. स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नाथाभाऊंनी अधिकारी झाल्यानंतरही समाजाचे उत्तरदायित्व जपण्याचा सल्ला दिला. नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही, यासाठी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी कायम असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.

तसेच जिल्हास्तरावर ओबीसी समूहातील विद्यार्थ्यांच्या साठी 200 विद्यार्थी क्षमतेचे वस्तीग्रह उभारण्याची आपण मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी केली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. स्पर्धा परीक्षेत एससी व एनटी समूहातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या साठी ज्या सोयी सुविधा मिळतात ,त्याच धर्तीवर ओबीसी विद्यार्थ्यांच्या साठी मार्गदर्शन केंद्र जिल्हास्तरावर निर्मित करण्यात यावे. यासाठी आपण आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी या कार्यक्रमाचे आयोजक गणेश लिपणे, आदिनाथ महाराज शास्त्री, वंदना पोटे, नाथा घुले, स्वाती मोराळे आदी उपस्थित होते.

न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगतोय नाथाभाऊ

कार्यक्रमाच्या अखेरीस अध्यक्षीय मनोगत व्यक्त करीत असताना नाथाभाऊ म्हणाले, न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा नाथाभाऊ भोगतोय. मात्र, सत्ता व मंत्रीपदापेक्षा समाज महत्त्वाचा आहे. समाजासाठी मी बोलत राहणार आहे. ओबीसी समूहाच्या यासंदर्भात महाराष्ट्रात सर्वप्रथम स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनीच निर्भयपणे भूमिका मांडली, असे सांगून ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणातील एकट्याला जरी धक्का लागला तर जाब विचारण्यासाठी सर्वात अग्रभागी मी असेल. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)