विज्ञानविश्‍व : ग्लोबल वॉर्मिंगचा पहिला इशारा…

-डॉ. मेघश्री दळवी

गेली काही वर्षे आपण बदलत्या हवामानाचा तडाखा सतत सोसतो आहोत. अलीकडील अमेरिकेतील आर्क्‍टिकलाही लाजवेल इतकी गोठवणारी थंडी असो की प्रचंड उष्णतेने होरपळणारी पिकं असोत, अत्यंत टोकाच्या हवामानाचे अनुभव जगभरात येत आहेत.

यामागे अर्थातच आहे हवेतील कार्बन डायऑक्‍साइडचं वाढतं प्रमाण, ग्रीनहाऊस परिणाम आणि ग्लोबल वॉर्मिंग. आज हे परिणाम आपण पाहतो आहोत, त्याचं भाकीत पहिल्यांदा केलं होतं ते वॉलेस स्मिथ ब्रोकर या अमेरिकन संशोधकाने.

हवामानातील बदल. आपण ग्लोबल वॉर्मिंगच्या भयंकर उंबरठ्यावर आहोत का? त्रेचाळीस वर्षांपूर्वी ब्रोकर यांनी अतिशय महत्त्वाच्या शोधनिबंधात ग्लोबल वॉर्मिंगचा पहिल्यांदा इशारा दिला होता. हा शब्द देखील त्यांचाच. पण वॉर्मिंगचा अर्थ केवळ तापमानातली वाढ असा न घेता, या वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या. दूरगामी परिणामांकडे त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.

वॉलेस स्मिथ ब्रोकर हे महासागरातल्या प्रवाहांचे अभ्यासक. उत्तरेकडून येणाऱ्या थंड प्रवाहांचा प्रभाव केवळ महासागरांवर नव्हे तर पूर्ण जगाच्या तापमानाच्या आणि पावसाच्या कालचक्रावर पडतो असा निष्कर्ष त्यांनी पहिल्यांदा 1975 मध्ये काढला होता. या थंड प्रवाहांवर आणि पर्यायाने या कालचक्रावर ग्लोबल वॉर्मिंगचा काय परिणाम होऊ शकतो याविषयीचं त्यांचं मॉडेल अत्यंत अचूक होतं असं आज खेदाने म्हणावं लागतं आहे. उत्तरेच्या थंड प्रवाहांमुळे महासागरात वेगवेगळ्या प्रवाहांचं एक जाळं तयार होतं, ओशन कन्वेयर बेल्टचा योग्य तोल राहिला नाही, तर पूर्ण जगाच्या हवामानावर भयानक परिणाम होतील हा धोका त्यांनी दाखवून दिला होता.

जागतिक तापमानात एक अंशाची जरी वाढ झाली, तरी ध्रुव प्रदेशातले हिमनग वितळतील आणि त्या पाण्यामुळे सागरांची पातळी वाढेल. हा वितळलेला बर्फ आपण कधीही पुन्हा गोठवू शकणार नाही, हा बदल कधीही उलटवता येणार नाही. त्यामुळे ओशन कन्वेयर बेल्टचा समतोल एकदा का ढासळला, तर आपली पृथ्वी आपल्या हातातून गेलीच समजा. अशा कडक शब्दांत त्यांनी दिलेला इशारा धक्‍कादायक होता, पण तितकाच खरा होता.

संशोधकांनी आणि राजकीय नेत्यांनी त्याची योग्य ती दखल घेतली. पण या समस्येवर उपाय शोधण्याला आणि ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्याला म्हणावा तितका वेग आपण अजूनही घेतलेला नाही. अनेक परिषदा, करार, राजकीय हट्ट, सर्व देशांनी आपापला मुद्दा लावून धरणे यातच आपण अडकलो आहोत, अशी ब्रोकर याची खंत होती.

या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात यासाठीच क्‍लायमेट इंजिनिअरिंगवर पहिला परिसंवाद अमेरिकेत आयोजित केला होता. हवामानातले बदल आटोक्‍यात आणण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड यावर क्‍लायमेट इंजिनिअरिंगचा भर असतो. या परिसंवादात सत्त्याऐंशी वर्षांच्या ब्रोकर यांनी व्हिडीओ लिंकवरून भाग घेतला.

अजूनही वेळ गेलेली नाही, दर दिवशी एक टन कार्बन डायऑक्‍साइड आपल्याला कमी करायचा आहे. पृथ्वीभोवती सौर कवच उभारून किंवा वातावरणात सल्फर डायऑक्‍साइड फवारून तापमान आपल्याला खाली आणायचं आहे. या शब्दांत त्यांनी कळकळीने आवाहन केलं, ते शेवटचंच ठरलं. 18 फेब्रुवारीला वॉलेस स्मिथ ब्रोकर हे जग सोडून गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)