कलंदर : आधीच उल्हास…

-उत्तम पिंगळे

परवाच प्राध्यापक मराठमोळ्यांकडे गेलो त्यांना गेल्या गेल्याच विचारले की साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटक म्हणून नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण साहित्यिक मंडळाने माघारी घेतले यावर आपले काय मत आहे?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्राध्यापक हसून म्हणाले की, हे बघा आजवर साहित्य संमेलन आणि वाद हे नेहमी जोडी जोडीनं आलेले आहेत. कोणतेही संमेलन वादातीत झाले असे म्हणणे अयोग्यच होईल. पण या संमेलनाचे वैशिष्ट्य्‌ होते की अरुणाताईंनी थेट निवड झाली होती. निवडणूक घेतली गेली नाही. त्यामुळे उत्साहाचे वातावरण होते.

खरे तर कित्येकदा चांगले साहित्यिक केवळ निवडणुकीची धावपळ नको म्हणून अध्यक्षपदासाठी भाग घेत नव्हते. मंडळाने सर्वांनुमते ज्येष्ठ साहित्यिक निवडावा हा चांगला पायंडा पडला होता. आता असे घडणे म्हणजे साहित्य महामंडळातील जबाबदार व्यक्तींना पोच नाही, असेच दिसून येते तसे नसते तर हे घडलेच नसते.

आता प्रथमतः नयनतारा यांची विचारसरणी मंडळास माहीत होती की नाही? कारण मागे पुरस्कार वापस करण्यामध्ये त्या आघाडीवर होत्या तसेच सरकारच्या चुकीच्या निर्णयाविरोधातही उभ्या होत्या. अगदी मग आणिबाणी असो किंवा जातीय ध्रुवीकरण.अशावेळी महामंडळाने नीट विचार करणे आवश्‍यक होते.आता मंडळ आयोजकांवर खापर फोडत आहे की त्यांनी ते रद्द केले. या आमंत्रणास एक स्थानिक संघटना व प्रादेशिक पक्ष यांचा विरोध होता.त्याने संमेलन उधळण्याची धमकी दिली होती नंतर राजकीय पक्षानी ती मागे घेतली.

आजकाल राजकारणात साहित्य अभावानेच दिसते कारण असे साहित्यप्रेमी नेते आता अत्यल्प आहेत; पण संमेलन व साहित्य यात मात्र राजकारण पूर्णपणे घुसले आहे असे दिसून येते. नयनतारा यांचे विचार सरकार विरोधात होते कारण नुकतेच त्यांनी वक्‍तव्य केले आहे की या देशात काय खावे, कोणते कपडे घालावे, कुणाबरोबर लग्न करावे यातही हस्तक्षेप होत आहे. बरं आता म्हणत आहेत की त्या इंग्रजी साहित्यकार आहेत मग हे निमंत्रण देताना माहीत नव्हते का?

आता याचे अनेक परिणाम होणार आहेत खरं तर आपल्या भाषेत दरवर्षीचे साहित्य संमेलन व नाट्य संमेलन घेतले जाते हे इतर भाषिकांना तर खरे अप्रूप आहे. आता निमंत्रण रद्द केल्याने त्याला भाषिक व प्रादेशिक अशी किनार मिळणार आहे कारण अमराठी भाषिकाला बोलवून नंतर निमंत्रण रद्द केल्याने इतर भाषिक निश्‍चित दुखावतील याचा परिणाम राज्याबाहेर साहित्य संमेलन आयोजक करणाऱ्यांवर होणार आहे. बडोदा, बेळगाव व इंदूर येथे पूर्वी साहित्य संमेलन घेतले गेले.

यापूढे तेथील आयोजकांवर स्थानिक लोकांचा व सरकारचाही दबाव राहील की असे मराठी संमेलन येथे कशाला हवे? उलटपक्षी अमराठी उद्‌घाटक बोलवून आपण आपल्या भाषेची समृद्धता त्यांना पटवून देऊ शकलो असतो ती संधी गेली.

खरं तर वाचन संस्कृती कमी होत असताना वर्षातून एकदा वाचकांना व मराठी भाषिकांना जागृत करणारे व्यासपीठ म्हणून संमेलनाकडे पाहीले जाते. यावेळी विना निवडणूक अध्यक्ष निवड झाल्याने खरे खरे वाचक व भाषा प्रेमी आनंदीत झाले होते.

अशावेळी महामंडळ व आयोजक यांच्यामध्ये ताळमेळ नसणे तसेच आमंत्रण रद्द केल्यावर मग महामंडळाने सांगणे की तो निर्णय आयोजकांचा आहे हे स्विकारण्यासारखे निश्‍चितच नाही. नयनतारांना आमंत्रित करून मंडळाने चूक केली असल्यास त्यांचे आमंत्रण रद्द करून घोडचूक केली आहे हे मात्र निश्‍चित!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)