कलंदर : हल्कासा झटका जोर से लगे।

-उत्तम पिंगळे

कालच प्रा. मराठमोळ्यांच्या घरी निवडणूक निकालांची प्रतिक्रिया ऐकण्यास गेलो. ते विविध बातम्या वाचत होते तसेच टीव्हीवरील चर्चाही ऐकत होते. मी म्हणालो की, सरकारने विविध चांगले उपक्रम केलेत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचे नांव उंचावले आहे. विविध वैज्ञानिक क्षेत्रात कित्येक नवीन शिखरे सर केलेली आहेत. असे असतांना अलीकडच्या निवडणुकीत कोणत्याही राज्यात त्यांना स्थान मिळू नये, यात म्हणजे आश्चर्य वाटणे सहाजिक आहे म्हणून आपल्याकडे आलो आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते म्हणाले, आपल्याकडे राजकारण फारच विचित्र असे आहे. तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले म्हणून पूर्ण देश तुमच्या पाठिशी उभा राहील असे नाहीं. राजकारणात असे कित्येक प्रवाह असतात, जे आपापले मार्ग भ्रमण करीत असतात. वर्ष 2014 ला पूर्णपणे विरोधी असे तेही एकाच पक्षाचे सरकार आले. अर्थात त्यावेळी त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा तसेच त्यांच्या मित्रपक्षाचा सहभाग नाकारता येत नाही. नव्याचे नऊ दिवस प्रमाणे सर्वत्र आनंदी वातावरण राहिले. नंतरच्या पोटनिवडणुकांत सत्ताधारी पक्षाचेच वर्चस्व राहिले. महाराष्ट्रातही अगदी तसेच झाले. युती असूनही त्यातील एकाच पक्षाला जवळजवळ सत्तेपर्यंत लोकांनी नेऊन ठेवले. सर्वत्र विजयी घोडदौड चालू असतानाच काही ठिकाणी अगदी अनाकलनीय युतीही झाली (जम्मू-काश्‍मीरमध्ये पीडीपी).

केवळ सत्ता मिळवण्यासाठी गोव्यामध्येही दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असूनही सत्तेसाठी दावा करून सत्ता मिळवली. तेथे अजूनही अस्थैर्याचेच वातावरण आहे. सत्ता हाती आल्यावर वरिष्ठ नेत्यांना डावलले गेले. त्यांना कुठेही स्थान दिले गेले नाही तसेच विजय रथ जोरदारपणे धावू लागला. असे असूनही मूळ वादाच्या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांकडून मौनच पाळले गेले. चार वर्षांत लक्षही घातले गेले नाही त्यामुळे सहकारी पक्षही नाराज झाले. सहकारी पक्षांचा योग्य मान राखला गेला नाही. त्यामुळे कित्येक चांगले निर्णय झाले असले तरी शेवटी तोंडघशी पडलेच.

आता या पराजयाने काही चांगल्या गोष्टीही घडल्या त्यांना आपण इष्टापत्ती म्हणू शकतो. म्हणजे सरकार दरबारातील नेते, अध्यक्षांना आलेली मग्रुरी कमी होईल. नेत्यांना व सहकारी पक्षांनाही मान दिला जाईल. कदाचित आगामी निवडणुकीसाठी सहकारी पक्षांना थोडे झुकते मापही दिले जाईल. अजून मध्यावधी निवडणुकांना थोडा अवधी आहे त्यामुळे आताचे डॅमेज कंट्रोल करणे सहज शक्‍य आहे. पण असे करण्यासाठी सत्ताधाऱ्यांची मनापासून इच्छा हवी, पाहू आता काय होते ते. ज्या इव्हीएमवर गदारोळ होत होता तो आता नाहीसा होईल.

देश टेक्‍नॉलॉजीकडे जात असताना, पेपरलेस व्यवहार होत असताना सर्वच विरोधक पुन्हा मतपत्रिकेवर जाण्यास आंदोलन करण्याच्या तयारीत होते. ते आता थंड होईल.

उर्जित पटेलांना गव्हर्नर म्हणून नेमताच विरोधकांनी गुजराती म्हणून विरोध दर्शवला पण त्यांनी राजीनामा दिल्यावर तेच विरोधक सरकारला धारेवर धरत आहेत.राजकारणात असेच चालू असते या पराभवाने सर्वांना पुन्हा विचार करावयास लावले आहे. सध्या तरी सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने “धीरे का झटका जोर से लगे। असे म्हणण्यापेक्षा “हल्का सा झटका जोर से लगे,’ असे म्हणावे लागेल अशीच परिस्थिती आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)