अग्रलेख: नसलेली कुस्ती समाप्त

तुझे माझे जमेना अन्‌ तुझ्यावाचून करमेना अशी शिवसेना- भारतीय जनता पार्टीची स्थिती असल्याचे गेल्या पाच वर्षांच्या राजकारणात पाहायला मिळाले. त्यांनी तसे दाखवले म्हणून ते पाहायला मिळाले असेही म्हणता येऊ शकते. त्याला कारण या दोन पक्षांचा व त्यांच्या सध्याच्या आघाडीच्या नेत्यांचा राजकारणाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन व त्यांच्याकडून खेळल्या गेलेल्या अथवा जाणाऱ्या नवनवीन खेळी. याचा अंदाज विरोधकांसह बहुतेक राजकीय पंडितांना आलाच नाही. त्यामुळे अनेकांचे आडाखे चुकले. पूर्वीच्या बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्यात असलेल्या लाजवाब अंडरस्टॅंडिंगचे किस्से सांगण्यात आणि आज बाळासाहेब असते तर अन्‌ आज महाजन असते तर वगैरे स्टोऱ्या मांडण्यातच अनेकांनी धन्यता मानली. बाळासाहेब ठाकरे यांची शैली रोखठोक होती. ते चटकन चिडायचे व आपला संताप जाहीरपणे व्यक्‍तही करायचे. त्यांच्या मनात एक आणि ओठात एक असे कधीही नव्हते, हे त्यांच्या सहवासात आलेल्या जवळपास प्रत्येकानेच सांगितले आहे. त्यामुळे बाळासाहेब चिडले की चुकणारा चटकन स्वत:ला सावरत दुरुस्ती करायचा.

बाळासाहेब राजकारणात असले तरी सत्तेच्या वर्तुळात नव्हते. त्यामुळे आपल्या पक्षाचे सरकार असले तरी त्यांना तटस्थपणे सरकारच्या कामगिरीचे विश्‍लेषण आणि मूल्यमापन करता येत होते. त्यातून छुपा प्रहार करण्याची सवय नसल्याने ते खुलेआम एखाद्याचे श्राद्ध घालून मोकळे व्हायचे. त्यांना सत्तेचा अथवा पदाचा लोभ आणि आकांक्षाही नसल्यामुळे ते जे काही करायचे अथवा बोलायचे ते कोणताही मध्यस्थाची गरज न भासता थेट त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचायचे. काही वेळा त्यांचा राग हाताबाहेर गेलाच की दिल्लीहून प्रमोद महाजन यांची रवानगी करण्यात यायची व सगळे शांत व्हायचे. त्याला कारण महाजनांना बाळासाहेबांचा माहीत असलेला स्वभाव हे जरी असले तरी बाळासाहेबांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची योग्यता आणि समर्पकता हेही तेवढेच महत्त्वाचे होते. अर्थात तोही काळ होता. आता असे म्हणायचे कारण म्हणजे त्यावेळी सेना- भाजप युतीत निर्णयकर्त्यांच्या पहिल्या रांगेत बसणारी सर्व मंडळी रांग सोडून कधीच निघून गेली आहेत. आता निर्णय घेणारे आणि त्यांची अंमलबजावणी करणारे सगळे राजकारणात नवखे नसले तरी या युतीच्या पटलावर तसे नवखेच.

शिवसेनेचे विद्यमान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह बहुतेकांना अगोदर आपला स्वत:चा जम बसावायचा होता. भाजपमधील बऱ्याच जणांना महाजन- मुंडे गेल्यानंतर निर्माण झालेली पोकळी अगोदर व्यापायची होती व नंतर हातपाय पसरत स्वत:ची स्पेस वाढवायची होती. अडीच दशकांपासून असलेली युती होतीच. मात्र, अगोदर होता तो आपला स्वार्थ. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत जे काही म्हटले गेले की किंवा केले गेले त्याकडे या दृष्टिकोनातून पाहायला जायला हवे. उद्धव ठाकरे यांच्यापुरतेच तूर्त बोलू. जे काही वाद त्यांच्याकडून अथवा त्यांच्या प्रवक्‍त्यांकडून रंगले ते सत्तेत भागीदारीसाठी नव्हतेच कधी. ती भागीदारी होतीच व ती संपवायची नाही याची खुणगाठही त्यांनी बांधून ठेवली होती. वाद होते ते सत्ता मिळाल्यानंतर मिळणाऱ्या सर्वोच्च पदाबाबत. आपली प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर उमटवण्यात माध्यमांनी कितीही हातभार लावला असला तरी आपली ताकद राज्यातच आहे व त्यामुळे मुख्यमंत्री पद हेच आपले सर्वोच्च पद असल्याची कल्पना सेनेच्या नेतृत्वाला होती. त्यामुळे त्यांच्या सगळ्या मोहिमा, चाली, डरकाळ्या या मुद्द्यालाच केंद्रस्थानी ठेवत आखल्या गेल्या. त्यात सगळ्यांत पहिले त्यांचा संघर्ष झाला तो स्वकीयांशी. पक्षातलेही आणि घरातलेही. एकदा हा मार्ग निष्कंटक झाल्यावर होता प्रश्‍न मित्रपक्षापर्यंत हा संदेश देण्याचा. मात्र, तेव्हा मोदी लाटेने मित्राचे स्फुरलेले बाहू पाहून आपल्याला हवी ती स्पेस मिळवण्यात सेना नेतृत्वाला अपयश आले. बाहेर मित्रपक्षावर कितीही तोफा झाडल्या तरी याला सोडायचे नाही, अन्यथा आपलेच बरे काही सुटेल याची ठाम खात्री त्यांना व त्यांच्या सल्लागारांना असल्यामुळे एकीकडे आम्हीच मोठे भाऊ असा आव आणत सातत्याने दुय्यम भूमिकेत साईड हिरोपेक्षाही नगण्य रोल साकारत जनतेचा कैवार घेत असल्याचे भासवण्याचे नित्यकर्म केले गेले.

भाजपमध्ये केंद्रीय नेतृत्वातच प्रचंड उलथापालथ झाली होती व जे संसथापक होते, त्यांनाच मार्गदर्शक करण्यात आले होते आणि राज्यात किमान गेल्या विधानसभेच्या वेळेला तरी अशी स्थिती होती की, अर्धा डझन नेत्यांना आता आपणच मुख्यमंत्री होणार अशी स्वप्ने पडत होती. अर्थात, दिल्लीतल्या नेत्यांप्रमाणेच या स्वप्नाळू नेत्यांना केंद्राच्या पटलावर स्थापित झालेल्या गुजरातमधील जोडीचा व त्यांच्या ताकदीचा अंदाज आला नव्हता. राज्यात जर सर्वोच्च पदावर जायचे असेल तर सेनेला सोबत घ्यावेच लागेल हा विचार त्यांच्या मनात पक्‍का होता, पण जे काही तेल ओतण्याचे वा सेनेला डिवचण्याचे अथवा चिथावण्याचे काम केले गेले ते केवळ स्वत:ची स्पेस निर्माण करण्यासाठीच. थोडक्‍यात, आम्ही दोघे भाऊ आणि मिळून सगळे खाऊ हा विचार तेव्हाही पक्‍का होता व नंतरही पक्‍काच होता. जे काही फटाके विविध निवडणुकांच्या काळात फोडले गेले ते नाट्य समजून घेण्यास विरोधक आणि मतदारही कमी पडले. खुद्द उद्धव ठाकरेंनीच काल सांगितलेय.

आमच्या मुख्यमंत्र्यांसोबत गुप्तचर्चा होत होत्या. तर मुख्यमंत्र्यांनीही आपण उद्धव ठाकरे यांचे सल्ले घेतच होतो याची कबुली दिली आहे. नगरपालिका आणि महापालिकांच्या वेळी झालेली चिखलफेक ही युतीच्या राजकारणातील नव्या शिलेदारांच्या नव्या शैलीचा भाग होता, जो बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीशी पूर्णपणे भिन्न होता. अपेक्षेप्रमाणे विरोधक नसलेले दोन मित्र म्हणण्यापेक्षा स्पर्धक एकत्र आलेले आहेत. हिंदुत्व, राष्ट्रीयत्व, शेतकरी, गोरगरिबांचे कल्याण या मुद्द्यांवर आम्ही एकत्र आलो असल्याचे सांगण्यात आले आहे. तेच जर खरे असेल तर गेल्या पाच वर्षांत तुम्ही काय विभक्‍त होतात का, आणि तसे जर नव्हते तर या काळात या मुद्द्यांना हात का घातला गेला नाही? निवडणुकांच्या वेळी मूळ मुद्दे बाजूला पडावेत आणि विरोधकांची जागाही आपणच लाटावी याकरताच ही नुरा कुस्ती खेळली गेली का, हे या मंडळींनी आता स्वच्छपणे सांगितले पाहिजे. पण ते तसे करणार नाही. कारण त्यांनी तसे केले तर त्यांना कोणी राजकारणी म्हणणारही नाही. त्यामुळे शिवसेना- भाजपची अखेर युती, शिक्‍कामोर्तब हे बातम्यांचे शीर्षक म्हणून ठिक आहे. पण कोणाला किती स्पेस वाढून मिळाली आहे व नक्‍की कोणत्या देवाणघेवाणीवर डिल फायनल झाली आहे हा प्रश्‍न अजूनही अनुत्तरीतच आहे. त्याचे उत्तर कदाचित लोकसभा आणि विधानसभा वेगवेगळ्या झाल्या तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर समोर येईंल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)