अग्रलेख – या चुकांना क्षमा नाहीच !

भारतीयांसाठी क्रिकेट हा धर्मच मानला जातो. प्रत्येक भारतीयाच्या नसानसात हा खेळ भिनला आहे, असे आपण नेहमीच म्हणत असतो. जेव्हा आपले खेळाडू विजयाचे शिखर सर करतात तेव्हा ते हत्तीवरून साखर वाटायला मागेपुढे पाहात नाहीत. पण पराभव झाला तर तेच नैराश्‍येपोटी जीवही गमावितात. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्‍वचषक स्पर्धेत भारतास संभाव्य विजेते मानले जात होते. साखळी गटातील कामगिरी पाहता या संघाची त्याच दिशेने वाटचाल सुरू असल्याचे जाणवत होते. सरोद वादनाची मैफल रंगात असताना तार तुटावी आणि मैफिलीचा बेरंग व्हावा असेच काहीसे उपांत्य फेरीत दिसून आले. न्यूझीलंडच्या तुलनेत भारताचे पारडे जड होते. भारताने यापूर्वी विश्‍वचषक जिंकला होता. न्यूझीलंडला एकदाही त्यावर आपले नाव कोरता आलेले नाही.

इंग्लंडमधील विश्‍वचषकाच्या साखळी गटात भारतास फक्‍त इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. याउलट न्यूझीलंडला पाकिस्तान व ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली होती. या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांची कामगिरी अतिशय खराब झाली होती. हे लक्षात घेता न्यूझीलंडविरुद्ध भारत सहज विजय मिळविणार अशी खात्री होती. मात्र, संघातील अकरा खेळाडूंची निवड करण्यापासूनच झालेल्या चुका भारताच्या पराभवास कारणीभूत ठरल्या. फलंदाजीची बाजू बळकट करण्यासाठी दिनेश कार्तिकला संघात स्थान देण्यात आले. मुळात या स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड झाली तेव्हापासूनच कार्तिकच्या निवडीवरून खूप उहापोह झाला होता.

कार्तिक हा विश्‍वचषक स्पर्धेच्या योग्यतेचा खेळाडू नाही. त्याची योग्यता आयपीएल व राष्ट्रीय स्पर्धांपुरतीच मर्यादित मानली जाते. मयांक अग्रवाल, ऋषभ पंत हे त्याच्यापेक्षा उत्तम खेळाडू मानले जातात. त्याच्याजागी केदार जाधव याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान दिले असते ते योग्य ठरले असते. केदारने पहिला विश्‍वचषक असूनही त्याचे दडपण न घेता या स्पर्धेत मधल्या फळीत उपयुक्‍त खेळ केला आहे. त्यामध्ये त्याने एक अर्धशतकही टोलविले होते. त्याचप्रमाणे एक बाजू खंबीरपणे सांभाळण्याचे कौशल्य आपल्याकडे आहे हे त्याने या स्पर्धेत दोन-तीन वेळा सिद्ध केले आहे. तसेच बदली गोलंदाज म्हणूनही अनेक वेळा त्याने भारताच्या विजयास हातभार लावला आहे.

कार्तिक याला साखळी सामन्यात संधी मिळाली होती. मात्र, त्याने सपशेल निराशा केली होती. अनेक जणांनी टीका करूनही आपल्याला संधी मिळाली आहे तर या संधीचे सोने करणे त्याच्या हातात होते. तथापि, त्याने पुन्हा बेजबाबदारपणे आपली विकेट फेकली. रवींद्र जडेजा याला भारतीय संघात स्थान देण्यात आल्यानंतर भारताच्या काही माजी खेळाडूंनी त्याच्यावर व निवड समितीवर तोंडसुख घेतले होते. त्यास त्याने उत्तर देताना टीकाकारांनी संघात असलेल्या खेळाडूंबद्दल आदर ठेवण्याचा सल्लाही दिला होता. तसेच आपली निवड का झाली याचे उत्तर मैदानावरील कामगिरीद्वारेच दाखवीन असेही त्याने म्हटले होते. उपांत्य सामन्यात त्याने आपला गुरू महेंद्रसिंग धोनी याच्या साथीत अविस्मरणीय खेळी केली व आपल्या टीकाकारांची तोंडे बंद केली. संघात स्थान मिळाल्यानंतर कशी चमक दाखवायची असते याचा परिपाठ त्याने घालून दिला.

रोहित शर्माने या स्पर्धेत पाच शतके टोलवित विश्‍वचषक स्पर्धेत सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम केला. तसेच त्याने या स्पर्धेत अनेक विक्रम मोडीत काढले. उपांत्य फेरीत त्याच्याकडून मोठी अपेक्षा होती. मात्र, ज्याप्रकारे तो बाद झाला, ते पाहता त्याने या स्पर्धेत केलेल्या विक्रमी कामगिरीवर पाणी फिरले गेले. न्यूझीलंडचे गोलंदाज यष्टीबाहेर मारा करीत फलंदाजास यष्टीमागे झेल देण्यास प्रवृत्त करतात हे माहीत असूनही त्याने यष्टीबाहेर जाणाऱ्या चेडूंवर फटका मारण्याचा आततायी प्रयत्न केला व आपली विकेट फेकली. त्याच्या एका चुकीचा फटका संघास खूपच महाग पडला. लोकेश राहुलनेही तशीच चूक केली. शिखर धवन याला पर्यायी सलामीवीर म्हणून राहुलकडे मोठ्या आशेने पाहिले जात होते. त्याने साखळी सामन्यात शतक करीत आपण धवनच्या जागी योग्य खेळाडू आहोत हे दाखवून दिले होते. मात्र, त्यालाही यष्टीबाहेर जाणाऱ्या चेडूंवर खेळण्याचा मोह टाळता आला नाही व त्याने आपल्या पायावर धोंडा मारून घेतला.

कर्णधार विराट कोहली याच्यासह पहिल्या फळीतील फलंदाजांनी संयमी खेळ करण्याची गरज होती; परंतु त्यांनी केलेल्या चुकांपासून पंत व हार्दिक पांड्या यांनीही बोध घेतला नाही. ज्यावेळी खेळपट्टीवर टिच्चून खेळ करण्याची आवश्‍यकता होती, त्याचवेळी त्यांनी अक्षम्य चुका केल्या. कोहली यानेही कर्णधार म्हणून जबाबदारीने खेळ करायला पाहिजे होता. तोदेखील केवळ एक धाव काढून बाद झाला.

सामना गमाविल्यानंतर खेळपट्टी किंवा स्पर्धेच्या स्वरूपावर टीका करणे म्हणजे “नाचता येईना अंगण वाकडे’ या म्हणीप्रमाणेच आहे. धोनी हा बाद झाला त्यावरून बरीच उलटसुलट चर्चा होत आहे. तो ज्या चेडूंवर बाद झाला, त्यावेळी पॉवरप्लेच्या नियमाचे उल्लंघन झाले होते अशी चर्चा केली जात आहे. जर नियमाचे उल्लंघन न्यूझीलंडकडून झाले होते तर त्याचवेळी धोनी याने पंचांकडे त्याबाबत आक्षेप घेण्याची गरज होती. पंचांकडे दाद मागण्याबाबत धोनी याच्याकडे तिसरा डोळा आहे असे नेहमीच म्हटले जाते.

क्षेत्ररक्षणाच्या मर्यादेपेक्षा एक क्षेत्ररक्षक जास्त उभा आहे हे त्याने वेळीच पंचांच्या निदर्शनास आणून दिले असते तर भारतास एक नोबॉल व एक अतिरिक्‍त धाव मिळाली असती तसेच फ्रीहीटही मिळाली असती. मात्र, भारताच्या नशिबात ते नव्हते आणि धोनी याची विकेट गेली. पाठोपाठ सामनाही गेला. या स्पर्धेसाठी विविध देशांमधून हजारो भारतीय चाहते इंग्लंडला गेले होते. जरी शेवटपर्यंत सामना रंगतदार झाला तरी आपल्या संघाचा पराभव त्यांना अपेक्षित नसतो. हा पराभव पचविण्याची ताकद त्यांच्याकडे नसते. कारण विश्‍वचषक स्पर्धा ही चार वर्षांतून एकदाच येते. या पराभवाची कारणमीमांसा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून केली जाईलच. काही खेळाडूंना संघातून डच्चूही दिला जाईल. पुढच्या विश्‍वचषक स्पर्धेसाठी आतापासूनच संघबांधणी करण्याबाबत नियोजन केलेही जाईल. मात्र, उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचे सल कायमच राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)