अग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा

जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील सर्वांच्यांच भावना तीव्र आहेत. “पाकिस्तानच्या घरात घुसून बदला घ्या,’ अशी थेट मागणी समाजाच्या सर्वच थरातून केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी भारतीय लष्कराला संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. लवकरच दहशतवाद्यांना शिक्षा केली जाईल असेही ते म्हणाले. देशातील नागरिकांची भावना कितीही तीव्र असल्या तरी सरकारला किंवा संरक्षण दलाला कोणताही निर्णय घाईघाईने घेता येणार नाही. त्यामुळेच बदला घेण्यास वेळ लागला तरी चालेल, पण काश्‍मीरच्या भूमीवरील दहशतवादाचा हा प्रश्‍न कायमचा सोडवला जावा एवढीच अपेक्षा व्यक्त करावी लागेल.

लष्कराने उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर 2016 मध्ये “सर्जिकल स्ट्राईक’ केले होते, तेव्हा पाकपुरस्कृत दहशतवादाला चाप बसेल, असे वाटत होते. पण तसे झाले नाही, हेच पुलवामा हल्ल्यानंतर समोर आले आहे. म्हणूनच आता तात्पुरती मलमपट्टी न करता एकदाच हा विषय संपवून टाकण्याच्या दृष्टीने रणनीती आखणे गरज आहे. याबाबत पंजाबमधील खलिस्तानी चळवळीच्या दहशतवादाचे उदाहरण लक्षात घ्यायला हवे. ऐंशी-नव्वदच्या दशकात भारतात पंजाबमधील हा दहशतवाद पेटला होता. दररोज गोळीबार आणि हत्याकांडे सुरू होती. पण एका विशिष्ट काळानंतर हा दहशतवाद संपला आणि पंजाब पूर्णपणे शांत झाला. तेव्हा पोलिस, लष्कर आणि राजकारणी यांनी संयुक्त रणनीती आखून दहशतवाद संपवला होता. दहशतवादी संघटनांना जेव्हा स्थानिक पाठिंबा आणि सहानुभूती थांबली, तेव्हा एखादी जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे दहशतवादला पूर्णविराम मिळाला होता. खरे तर तेव्हाही पाकिस्तानचा खलिस्तान चळवळीला पाठिंबा होता. पण या चळवळीतील फोलपणा लक्षात आल्यानंतर वाट चुकलेले अनेकजण मार्गावर आले; आणि दहशतवाद संपला.

काश्‍मीरमध्येही काही वेगळी परिस्थिती नाही. स्थानिक नागरिकांचा पाठिंबा मिळत असल्यानेच दहशतवादी मुक्तपणे वावरत आहेत. दहशतवाद्यांना आश्रय दिला जात आहे. दहशतवादी संघटनांमध्ये भरती होणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे. पुलवामा येथे हल्ला करणारा स्थानिक तरुणच होता. पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन आलेल्या एखाद्या दहशतवाद्याने हे कृत्य केले नव्हते. स्थानिक काश्‍मीरी तरुणांची माथी भडकावणारे जे घटक खोऱ्यात कार्यरत आहेत त्यांना प्रथम संपवण्याची रणनीती आखावी लागेल. कारण भारताविरोधात मत तयार करुन तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे काम हाफीज सईद आणि मौलाद अझर यांच्यासारखे दहशतवादी नेते कायम करीत आहेत. त्याला बळी पडणारे काश्‍मीरी तरुण आपल्याच देशाविरोधात लढून आपल्याच लोकांना मारीत आहेत किंवा स्वत: मरत आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर अफगाण युद्धातील दहशतवादी अब्दुल रशीद गाझी हासुध्दा सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे. तीही या संदर्भात महत्वाची आहे. अब्दुल हा जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्‍या मौलाना मसूद अझहरचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो.

सुरक्षा दलांनी गेल्या काही महिन्यांमध्ये मसूद अझहरच्या पुतण्या आणि भाच्याचा चकमकीत खात्मा केला होता. या दोघांच्या मृत्यूनंतर मसूदने त्याचा विश्‍वासू साथीदार अब्दुल रशीदला जम्मू-काश्‍मीरमध्ये पाठवले. सध्या अब्दुल हा जम्मू-काश्‍मीरमध्येच असल्याची माहितीदेखील गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. अब्दुल रशीद गाझी हा जैशच्या दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळावरील प्रमुख देखील होता. पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये हे तळ होते. जम्मू- काश्‍मीरमधील तरुणांना प्रशिक्षणासाठी पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये नेणे अशक्‍य झाल्यानेच गाझीला जम्मू- काश्‍मीरमध्ये पाठवण्याचा निर्णय मसूदने घेतला होता; आणि त्याचा हा कट सफल झाला असेच दुर्दैवाने म्हणावे लागते. म्हणूनच पाकिस्तान व पाकिस्तानच्या आश्रयाला असणाऱ्या संघटना यांच्यावर मोठ्या कारवाईचे नियोजन सुरू असतानाच काश्‍मीर खोऱ्यातील भरकटलेल्या तरुणांना प्रवाहात आणण्यासाठीही योजना आखण्याची गरज आहे.

स्थानिकांच्या मदतीनेच दहशतवादी संघटना जर दहशतवादी कारवाया करीत असतील, तर त्यांना स्थानिक तरुणांची ही रसद मिळणारच नाही याची दक्षता आता घ्यावीच लागेल. याआधीच्या “सर्जिकल स्ट्राईक’चे जनक ले. ज. राजेंद्र निंभोरकर म्हणतात की, काश्‍मिरात दहशतवाद्यांना दहशत माजवण्याची संधी मिळत आहे. यात नेमकी चूक कुणाची झाली, याचा शोध घेतानाच दहशतवाद्यांना एक तर आपल्या बाजूने करावे लागेल किंवा बंदुकीचे उत्तर बंदुकीने द्यावे लागेल. “दहशतवाद्यांना संधी देणारे हुडकून काढा,’ हाच त्यांच्या विधानाचा अर्थ आहे. सरकारने दावा केल्याप्रमाणे मागील काही दिवसात अनेक दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळाले असले तरी अजूनही दहशतवादी तिथे आहेत. खोऱ्यात किमान 10 दहशतवादी संघटना कार्यरत असाव्यात असा अंदाज आहे.

स्थानिकांच्या मदतीनेच त्यांनी हातपाय पसरले आहेत. पुलवामा हल्ल्यातील आत्मघातकी अतिरेकी आदिल हा काश्‍मीरमधील ज्या एका छोटया गावातील रहिवासी आहे, त्या गावात मोठया संख्येने दहशतवादी आहेत. गुप्तचर यंत्रणांनी अशा गावांवर लक्ष केंद्रित करणे आवश्‍यक आहे. दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्कराकडे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी ते पर्याय वापरतानाच स्थानिक मदत बंद करण्यासाठी उपायही योजावे लागणार आहेत. “सर्जिकल स्ट्राईक’वेळी अशीच एक कारवाई करण्यात आली होती. पण त्याने फक्‍त काही काळ जरब बसली. म्हणूनच आता सीमेपीलकडील व देशांतर्गत दहशतवाद संपवण्यासाठी योजना यशस्वीपणे अंमलात आणली तरच काश्‍मिरच्या दहशतवादाची समस्या कायमस्वरूपी सुटू शकेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)