पाकिस्तानचे “पडलो तरी नाक वर..’ (अग्रलेख)

भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील दहशतवादी अड्ड्यांवर केलेलल्या कारवाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने बिनडोकपणे प्रत्युत्तर देणे अपेक्षितच होते. त्याप्रमाणे पाकिस्तानी लष्कराने नियंत्रणरेषेवर गोळीबार सुरू करून नेहमीप्रमाणे शस्त्रसंधीचा भंग केला. या गोळीबाराला भारतीय लष्कराने जशास तसे उत्तर देत पाकिस्तानी लष्कराच्या चौक्‍या उद्‌ध्वस्त केल्या आहेत. या घटनेच्या पाठोपाठच बुधवारी सकाळी पाकिस्तानी हवाई दलाची विमाने भारतीय हद्दीत घुसल्याची बातमीही आली. पाकिस्तानची ही प्रतिक्रिया अपेक्षितच असली, तरी त्याचे वर्णन “पडलो तरी नाक वर’ याच शब्दांत करावे लागेल. कारण भारताने जी हवाई कारवाई केली होती, ती पाकिस्तानच्या आशीर्वादाने पोसलेल्या दहशतवादी तळांवर केली होती.

पाकिस्तानने जर पूर्वीच ही कारवाई केली असती, तर भारताला ही कारवाई करण्याची गरज नव्हती, हे भारताने स्पष्ट केले होते. पण ते लक्षात न घेता पाकिस्तानी विमानांनी केलेला हवाई हद्दीचा भंग हा निव्वळ बालिशपणा आहे. कारण भारतीय हद्दीत कोणतेही दहशतवादी तळ नाहीत किंवा भारत कोणत्याही दहशतवादी संघटनेला पाठीशी घालत नाही, हे जगाने मान्य केलेले सत्य आहे. तरीही पाकिस्तानी विमाने भारतीय हद्दीत घुसत असतील तर त्यांना निष्पाप नागरिकांनाच लक्ष्य करायचे होते, असेच म्हणावे लागते. कोणतेही धोरण किंवा समजूतदारपणाचा अभाव असलेल्या पाकिस्तानकडून अशीच प्रतिक्रिया येणार हे गृहीत असले, तरी आता राजनैतिक आणि लष्करी पातळीवर पाकिस्तानचे नाक कायमचे ठेचण्याची वेळ आली आहे आणि ती संधी भारताने सोडता कामा नये. पाकिस्तानने सातत्याने भारताविरोधात छुपे युद्ध पुकारले आहे. त्यासाठी दहशतवादी हल्ल्यांचा वापर नेहमीच केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताने अनेक पुरावे देऊनही पाकिस्तानने दहशतवादी तळांवर कोणतीच कारवाई न केल्याने भारताला दोनवेळा सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवाद्यांना धडा शिकवावा लागला होता. अशी परिस्थिती असताना पाकिस्तानने थेट भारतीय हद्दीत विमाने घुसवली असतील, तर तो एक जागतिक अपराध ठरणार आहे आणि म्हणूनच जागतिक पातळीवर प्रत्येक व्यासपीठावर भारताने पाकिस्तानचा हा नापाक चेहरा जगासमोर आणण्याची गरज आहे. येत्या काळात भारताला अशा अनेक संधी मिळणार आहेत आणि त्या प्रत्येक संधीचा फायदा भारताने पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी केला पाहिजे. चीनच्या दौऱ्यावर गेलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्याची चांगली सुरुवात केलीही आहे. “जगातील कोणत्याच देशांनी दहशतवादाला सहन करू नये.

दहशतवादाला समूळ गाडण्यासाठी इतर देशांनी भारतासारखी धडक कारवाई करावी. दहशतवादावर निर्णायक कारवाई करण्याची वेळ आहे’, असे ठाम वक्‍तव्य सुषमा स्वराज यांनी चीनमध्ये सुरू असलेल्या भारत-चीन-रशिया या तीन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत केले. “हा लष्करी हल्ला नव्हता, पाकिस्तानच्या लष्कराला आम्ही लक्ष्य केले नव्हते. जैश-ए-मोहम्मदकडून आमच्यावर होणारा संभाव्य हल्ला टाळण्यासाठी दहशतवाद्यांवर केलेली ही कारवाई आहे. संयुक्‍त राष्ट्रांचे नियम पाळून हा हल्ला केला आहे’, असेही स्वराज यांनी स्पष्ट केले. म्हणजेच पाकिस्तानने दिलेली प्रतिक्रिया किती चुकीची आहे, हेच त्यांनी दाखवून दिले. पाकिस्तानच्या या बालिशपणामुळे आता चीनलाही पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहणे शक्‍य होणार नाही. दुसरीकडे पाकिस्तान सरकारने दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी, असे अमेरिकेकडून पाकिस्तानला सांगण्यात आले आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होईल अशा कोणत्याही कारवाईला प्रोत्साहन देऊ नये, असे अमेरिकेने पाकिस्तानला बजावले आहे.

जगातील ऑस्ट्रेलिया, इस्रायल यांच्यासह अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे. त्या देशांसमोरही भारताने पाकिस्तानचा बुरखा फाडण्याचे काम करायला हवे. पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर अशी कोंडी करण्याचे आपले प्रयत्न सुरू असताना ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) या फक्‍त इस्लामबहुल देशांच्या वार्षिक अधिवेशनासाठी भारताला तब्बल 50 वर्षांनी निमंत्रण दिले गेले आहे, ही आणखी एक लक्षणीय बाब आहे. या संघटनेवर पाकिस्तानचा प्रभाव आहे. त्यामुळे या परिषदेचे सदस्यत्व आतापर्यंत भारताला मिळालेले नाही. या परिषदेच्या बैठकीत पाकिस्तानकडून सातत्याने भारत सरकारच्या काश्‍मीरविषयक धोरणाविरोधात सूर लावला जातो. आता या परिषदेत भारताला निमंत्रण मिळाल्याने, भारताने आपले धोरण मांडतानाच पाकिस्तानचा दहशतवादी चेहराही इस्लामिक देशांसमोर आणायला हवा. या परिषदेत भारताला आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळू नये, म्हणून पाकिस्तानचे प्रयत्न सुरू असले, तरी ते हाणून पाडून भारताने पाकिस्तानला जगासमोर उघडे पाडण्याची गरज आहे.

भारताकडे पाकिस्तानविरोधात ढीगभर पुरावे आहेत. ते पाकिस्तानला मान्य नसले तरी जगासमोर हे पुरावे सादर करण्याची चांगली संधी भारताला मिळाली आहे. भारताच्या बालाकोट कारवाईनंतर पाकिस्तानने कोणतीही टोकाची प्रतिक्रिया दिली तर ती राजनैतिकदृष्ट्या पाकिस्तानची चूकच ठरणार आहे. कारण भारताविरोधात अशी कोणतीही कारवाई करण्याचे कारणच पाकिस्तानकडे नाही. पण पाकिस्तानी जनतेला खूश करण्यासाठी पाकिस्तान बालिशपणा करीत आहे. म्हणूनच पाकची राजकीय पातळीवर कोंडी करतानाच त्यांना लष्करी पातळीवर शिक्षा देण्याचे कामही सुरू ठेवायला हवे. बुधवारी सकाळी पाकिस्तानची जी विमाने भारतीय हद्दीत घुसली होती त्यापैकी एक विमान पाडण्यात भारतीय हवाई दलाला यश आले आहे. त्यामुळे आपली क्षमता काय आहे, याचे वास्तव लक्षात घेत पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा विचार करायला हवा. तरीही पाकिस्तानला समज येणार नसेल तर आणखी एक धक्‍का देण्याची भारताची तयारी आहे, हे पाकिस्तानने समजून घेण्याची गरज आहे. “पडलो तरी नाक वर’ ही भूमिका पाकिस्तानला परवडणारी नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)