रामदेवबाबांची नाराजी (अग्रलेख)

योगगुरू रामदेव बाबा भाजप सरकारवर खूष नाहीत हे त्यांच्या अलिकडच्या काळातील तुटक वक्तव्यांवरून स्पष्ट दिसत होतेच पण त्यांची भाजप सरकारवरील नाराजी अलिकडेच भारतरत्न या विषयावरून ठळकपणे समोर आली आहे. गेल्या 70 वर्षांत भारताने एकाही साधु संन्याशाला भारतरत्न या किताबाने का गौरवले नाही असा सवाल करीत त्यांनी मोदी सरकारवरील आपली नाराजी उघड केली आहे.

ज्यांना भारतरत्न हा किताब मिळाला आहे त्यांच्या कर्तुत्वाविषयी आपल्याला आदरच आहे, पण जर ख्रिश्‍चन मिशनरी असलेल्या मदर तेरेसांना भारतरत्न मिळू शकतो तर या देशाच्या उभारणीत आणि सामाजिक जागृतीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या साधु-संताना किंवा संन्याशाला आजवर एकही भारतरत्न का मिळू शकले नाही असा त्यांचा सवाल आहे.

मदर तेरेसांवरही आपला आक्षेप नाही त्यांच्या विषयी आपल्यालाही आदरच आहे असेही त्यांनी स्पष्ट करताना भारतातील भगव्या वस्त्रधारी समाजधुरीणांचाही योग्य तो सन्मान सरकारी पातळीवर व्हायला हवा होता अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांनी व्यक्त केलेले मत अगदीच अनाठायी आहे असे म्हणता येत नाही. खुद्द रामदेवबाबा यंदा भारतरत्नच्या अपेक्षेत होते असे त्यांच्या वक्तव्यावरून दिसते आहे त्यांची ही इच्छा पुर्ण झाली नाही म्हणून त्यांच्या तोंडून ही नाराजी बाहेर पडली असावी.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रामदेवबाबांचे राजकारण सोडले तर त्यांचे सामाजिक कार्य आणि हिंदु संस्कृतीच्या प्रसाराचे काम मोठेच आहे हे मान्य करावे लागेल. त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात भारतीय योगसाधनेचे धडे दिले. योगाचा गहन विषय त्यांनी सोपा करून सामान्यांपर्यंत पोहचवला, आणि प्राचीन भारतीय वैद्यकीय उपचार प्रणालीचा प्रसार करताना त्याचे पतंजली नावाने नैसर्गिक भारतीय उत्पादनांचे मोठे ब्रॅंडिग केले. आज त्यांचा पतंजली उद्योग समुह वार्षिक दहा हजार कोटी रूपयांच्या उलाढालीचा समुह बनला आहे. यातून मिळणारा पैसा पुन्हा समाजाच्या कामालाच वापरला जाणार आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

ऐहिक सुखापासून संन्याशाने दूर राहिले पाहिजे आणि साधनसंपत्तीचा त्याने हव्यास धरता कामा नये या धारणेतून त्यांच्यावर टीका करणारेही कमी नाहीत. पण त्यांनी प्राचीन भारतीय आयुर्वेदिक औषधी आणि कसदार जीवनावश्‍यक वस्तू पुर्ण व्यावसायिक धोरण राबवून आणि व्यवस्थापनाचे उत्कृष्ट कौशल्य दाखवून लोकांपर्यंत पोहचवण्याचा केलेला प्रयत्न वायफळ किंवा स्वार्थी म्हणता येणार नाही. नैसर्गिक आणि आरोग्यदायी भारतीय जीवन पद्धतीच्या प्रसाराचा त्यांनी केलेला उदंड यशस्वी प्रयोग कौतुकाला पात्र आहे. त्या अर्थाने त्यांचे कार्य भारतरत्नच्या तोडीचे आहे हे मान्य पण त्यांच्या या कामाची कदर केंद्रात हिंदुत्ववादी भूमिकेतून कार्यरत असलेल्या मोदी सरकारने का केली नाही याचे आश्‍चर्य वाटल्याखेरीज राहात नाही.

वास्तविक ज्या काही शक्तींनी मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या विरोधात देशात मोठी वातावरण निर्मीती केली होती त्यात रामदेवबाबांचाही वाटा मोठा आहे. मोदींच्या नेतृत्वाचा जाहीर पुरस्कार करून त्यांना पंतप्रधान करण्यात रामदेवबाबांनी मोठे योगदान दिले आहे. मोदींसारखा माणूस देशाच्या पंतप्रधानपदावर आला तर देशाचे चित्र बदलू शकते असे ठाम प्रतिपादनही त्यांनी अनेक वेळा केले होते.

युपीए सरकारचा भ्रष्टाचार आणि काळा पैसा या विषयावरून रामदेवबाबांनी साऱ्या देशात मोठे रान माजवले होते. अनेक ठिकाणी त्यांनी त्या अनुषंगाने आंदोलनात्मक कार्यक्रमही घेतले होते. दिल्लीत रामलिला मैदानावर त्यांनी यासाठीच धरणे आंदोलनही केले होते. त्याचा प्रत्यक्ष लाभ भाजपला आणि पर्यायाने मोदी यांना झाला होता. त्या पार्श्‍वभूमीवर मोदी सरकारने मात्र रामदेवबाबांकडे गेल्या पाच वर्षात साफ दुर्लक्षच केलेले दिसून आले. त्यांना मंत्रीपद किंवा अन्य कोणत्याही पदाची अपेक्षा नव्हती. निदानपक्षी भारतरत्न पुरस्कारचे तरी ते मानकरी ठरायला हवे होते पण मोदींच्या काळात तेही झाले नाही.

यंदा एकाचवेळी तीन जणांना भारतरत्न जाहीर झाले. त्या सन्मानासाठी निवड झालेल्या व्यक्ती योग्यच होत्या पण त्या यादीत आणखी एक नाव रामदेवबाबांच्या रूपाने जोडले गेले असते तर काय बिघडले असते असे त्यांच्या समर्थकांना वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे नाराज झालेल्या बाबांची नाराजी आता उघडपणे बाहेर पडताना दिसून येत आहे. यंदाच्या निवडणुकीत आपण मोदींचे किंवा भाजपचे समर्थन करणार नाही असेही त्यांनी जाहीर केले आहे.

आपण राजकारणापासून दूरच राहायचे ठरवले असल्याने आपण तसा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी जाहीर केले असले तरी त्यांच्याकडून मोदींच्या विषयी उघडपणे नाराजी व्यक्त होत राहिली तर त्याचा मोदींना फटका बसल्याशिवाय राहणार नाही हेही तितकेच खरे आहे. बाबांचा संप्रदाय मोठा आहे. त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे.

रामदेवबाबांचा वक्तव्यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव असतो. बाबांच्या तोंडून मोदी सरकारविषयीची नाराजी अशीच व्यक्त होत राहिली तर त्याची मोठी राजकीय किंमत मोदींना चुकावावी लागू शकते. या पार्श्‍वभूमीवर बाबांना शांत करण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाला आपले कौशल्य पणाला लावावे लागणार आहे.

ही नाराजी आता कोणत्या उपायाने दूर करता येईल हा भाजपपुढील प्रश्‍न असणार आहे. पुढील तीन महिन्यात त्यांना भारतरत्न घोषित करणे आता शक्‍य नाही. बाबांना पैसा आणि सत्तास्थानाचे प्रलोभन दाखवण्याचाही काही उपयोग नाही. मग बाबा कशाने शांत होतील याचे उत्तर बाबाच देऊ शकतील.

1 COMMENT

  1. वरील अग्रलेख वाचण्यात आला गेल्या ७० वर्षात एकाही साधू संताला भारत रत्न हा पुरस्कार देण्यात आला नाही हे खरे असले तरी ज्यांना हा पुरस्कार देण्यात आला व देण्यात येतो त्यांच्या आचार विचार राहणी विदवत्ताअशा सर्वांगीण गुणाने परिपूर्ण असणाऱ्या किती व्यक्ती आज समाजात पाहावयास मिळतील ? त्यातही समाजास मनापासून खर्या अर्थाने ह्यांच्यापैकी आदर असणाऱ्या व्यक्ती ह्या बोटावर मोजण्याइतपत्च पाहावयास मिळतात कारण अशा व्यक्तींनी समाजप्रभोदन घडवून आणले आहे म्हणून समाज आजही त्यांचा आदर करतो आपल्या देशात शेकडो वर्षे अगोदर अनेक संत होऊन गेलेत कबीर,कमाल,सूरदास,नरसी मेहेता,साजन कसाई ,लतीबाशा,दादू पिंजारी,मीराबाई,शेखमहंमद,कान्होपात्रा,गोरा कुंभार,जगमित्र नागा,नरहरी सोनार,सावंता माळी,सेना नाव्ही,माणकोजी बोधाला,चोखामेळा,सोयराबाई,बांका,निर्मला,कर्ममेळा,कानोहोबा पाठक,सच्चीदानंद बाबा,चांगले केशवदास,बहिरा पिसा,भागू महारीण,वत्सरा,गोंधदा,ज्ञानेश्वर,तुकाराम,एकनाथ,रामदासस्वामी,ह्या समस्त संतानाअशी अनेक नावे सांगता येतील आपला समाज ह्यांना ईश्वर मानतो त्यांनी कृतीने घालून दिलेल्या आचार विचाराने संपूर्ण समाज एकसंघ पाहावयास मिळतो हे गुण,आदर्श आजच्या भारत रत्नांपैकी किती जनांनमध्ये आपणास पाहावयास मिळेल?आता रामदेव बाबा ह्यांना यॊग्यगुरु हि जी पदवी देण्यात आली अथवा त्यांनी लावून घेतली हि लावली नसती तर व्यवसायिक म्हणून त्यांच्या नावाचा विचार झाला असता असे वाटते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)