अग्रलेख : अपेक्षित खोडा

पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्‍याला पुन्हा एकदा चीनच्या कृपाशिर्वादाने अभय मिळाले आहे. पाकच्या पदराखाली लपलेला मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी करण्यासाठी भारताने जंग जंग पछाडले आहे. मात्र त्यात अद्याप भारताला यश मिळाले नाही व त्याचे सगळ्यांत प्रबळ कारण चीन हा पाकिस्तानचा सर्वकालीन मित्र! “चीनला आम्ही कोरा धनादेश स्वाक्षरी करून दिला आहे’, अशा आशयाची वक्तव्ये पाकचे सत्ताधारी करत असतात. वास्तविक “कटोरा घेउन फिरणारा देश’ अशीच पाकची प्रतिमा आहे.

मात्र बोलताना ते मोठेपणाचा आव आणतात. अशा या पाकला व पर्यायाने मसूद अझहरला वाचवण्याचा व भारताच्या संदर्भात बोलायचे झाले तर, त्याच्या विरोधातील कारवाईत चीन खोडा घालण्याचा प्रयत्न का करतो, याची काही कारणे आहेत. चीनला पाक अथवा मसूदचा उमाळा आहे, असे नाही. पहिले कारण म्हणजे चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरीडॉर अर्थात सीपीईसी व त्यासाठी पाकमध्ये चीन करत असलेली प्रचंड गुंतवणूक. गेल्या काही दशकांत आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा झाल्यानंतर चीनची मुलभूत वृत्ती पुन्हा उफाळून आली आहे. विस्तारवादी धोरण हा त्यांचा स्वभाव आहे.

“माझे ते माझेच पण तुझे तेही माझेच,’ ही त्या देशाची नीती राहीली आहे. त्याला अनुसरूनच तेथील सत्ताधाऱ्यांची पावले पडत आली आहेत. त्यामुळे भारतासह कोणाही शेजारी देशाशी त्यांचे विश्‍वासाचे संबंध नाहीत. कट्टर शत्रुत्व म्हणावे अशातला मामला नसला तरी शेजारी साप असला तर आपण गाफील राहून चालत नाही. तसा प्रकार चीनच्या सर्वच शेजारी राष्ट्रांच्या बाबतीत होतो. शीतयुध्दाच्या काळात परस्परांना शह देण्याचे खेळ अमेरिका-रशियाकडून खेळले जायचे. जगातल्या प्रमुख राष्ट्रांची या दोन देशांच्या “गुडबुक अथवा बॅडबुक’मध्ये विभागणी झाली होती. मात्र नंतर रशियाचा शक्‍तीपात झाला.

आर्थिक आणि एकूणच सगळ्याच आघाड्यांवर या देशाने आपला प्रभाव गमावला असला, तरी अद्याप तो पुन्हा अमेरिकेला आव्हान देऊ शकेल, अशा स्थितीत आलेला नाही. जगाच्या द्विध्रुवीय रचनेत रशियाच्या पीछेहाटीमुळे जी पोकळी निर्माण झाली होती, ती चीनने अगदी वेगाने भरून काढली. हा देश अमेरिकेला आव्हान देऊ शकेल, इतक्‍या ताकदीचा तर झालाच पण त्यांच्या डोळ्यात डोळे घालूनही पाहू लागला.

बदलत्या जगाचे हे चित्र अनिच्छेने का असेना स्वीकारणे अमेरिकेला क्रमप्राप्त होते. रशियाचा प्रभाव कमी करण्यात अफगाणिस्तानात त्यांनी ज्या खेळ्या केल्या, जो वैध-अवैध गोष्टींचा पुरवठा केला, त्यामुळे रशियाला तेथून काढता पाय घ्यायला भाग पाडण्यात अमेरिका यशस्वी ठरली, हे जरी खरे असले तरी त्यामुळे अफगाणिस्तानात कायम स्वरूपी पटवलेली आग, पाकिस्तानला विनाकारण दिले गेलेले बळ हे अमेरिकेच्या रशियाविरुध्दच्या प्रयोगाचेच फळ.

अफगाणमधील राजकीय अस्थैर्य, तेथील दहशतवाद हा कुठेतरी अमेरिकेच्या पापांचाच परिपाक होता व ते निस्तरण्यासाठी त्यांनी पाकला मदत करत आणखी घोडचुका करण्यातच धन्यता मानली. अमेरिकेकडून खोऱ्याने पैसा ओढणाऱ्या पाकने त्यांच्या चारित्र्याला साजेसे कृत्य केले. जो दहशतवाद संपवण्यासाठी अमेरिका त्यांना मदत करत होती, तोच दहशतवाद पाकिस्तानातच बाळसे धरत होता. याची प्रचिती अमेरिकेला त्यांच्या भूमीत झालेल्या “वर्ल्ड ट्रेड सेंटर’वरील हल्ल्याच्या रूपाने फार उशीरा आली. ज्या ओसामा बीन लादेनने जगभरात वास्तव्यास असलेल्या अमेरिकनांना ठरवून लक्ष्य केले होते, त्या लादेनला पाकिस्ताननेच आपल्या छत्रछायेखाली सुरक्षीत लपवून ठेवले होते. त्यांचा हा बुरखा फाटला. पाकचा खरा चेहरा त्याअगोदरच जगासमोर येत गेला.

जागतिक राजकारणाची नवी परिभाषा आणि शक्तीसंतुलन राखण्याच्या दृष्टीने अमेरिकेने त्यानंतर हालचाली सुरू केल्या. जॉर्ज बुश (दुसरे) यांच्या काळात खऱ्या अर्थाने त्या विरोधात पावले उचलली गेली. बुश जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते व कोडोंलीझा राईस त्यांच्या मंत्रिमंडळात सहकारी होत्या, तेव्हा चीनच्या वाढत्या दादागीरीची व त्यामुळे आशियात व विशेषत: दक्षिण आशियात काहीतरी पावले उचलण्याच्या दिशेने त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.

या सगळ्यात त्यांचे भारताखेरीज अन्यत्र लक्ष जाणे केवळ अशक्‍य होते. जगातली सगळ्यांत मोठी लोकशाही, शांत आणि संयमी देश, संगणकाच्या युगात भरारी घेणारा व सगळी बलस्थाने असूनही संयमाने वागणारा देश म्हणून अमेरिकेने भारताशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासण्याचा प्रयत्न केला. नागरी अणुऊर्जा सहकार्य करार हे त्याचेच फलित. मनमोहन सिंग यांच्यासारख्या भारतातील तत्कालीन पंतप्रधानांनीही भविष्याचा वेध घेत ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी व उच्च तंत्रज्ञानावर असलेले अनावश्‍यक निर्बंध उठवले जाण्यासाठी या संधीचा लाभ घेतला. त्यांनी सरकार पणाला लावत अमेरिकेसोबतचा अणुकरार तडीस नेला.

अगोदरच्या अटलबिहारी वाजपेयी सरकारने दिलेला पास व डॉ. मनमोहन सिंग सरकारने साधलेला गोल यामुळे साधारण 2000 पर्यंत जे अवघडलेपण भारत अमेरिका संबंधांत होते, ते हळूहळू लोप पावत गेले. हा सगळा जो घटनाक्रम आहे, त्या अनुशंगाने विचार करता, चीनच्या मसूद अझहरला व पर्यायाने पाकिस्तानला पाठीशी घालण्याच्या कृतीचा अर्थ लक्षात येतो. भारताने पाकिस्तानसोबतच्या भांडणात गुंतून राहणे, दहशतवादी हल्ल्यांच्या विवंचनेतच राहणे हे चीनच्या दृष्टीने भारताचा प्रभाव रोखण्यासाठी कुठेतरी गरजेचे झाले आहे. भारताच्या सर्वच शेजारी राष्ट्रांना कर्जाच्या सापळ्यात अडकवल्यानंतर भारताला थोपवण्याचा त्यांचा हेतू सफल होतो.

सीपीईसी हा चीनच्या दृष्टीने संवेदनशील विषय आहे. तेथे त्यांनी प्रचंड गुंतवणूक केली आहे. ती फलद्रुप व्हायची असेल तर पाक व तेथील असंतुष्ट आत्म्यांना गोंजारण्याशिवाय आज त्यांच्यापुढे दुसरा मार्ग नाही. जे अफगाणिस्तानच्या संदर्भात अमेरिकेचे झाले तेच आता चीनचेही होते आहे. कारण पाक उपकारकर्त्या अमेरिकेवरच उलटला, त्याचे चीनला विस्मरण झाले असावे; अथवा आता त्यांचीच कोंडी झाली असावी. दहशतवाद हा मानवतेचा शत्रु असतो. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यात हजारो निरपराध नागरिकांचे बळी देउन त्याचे मूल्य चुकवावे लागल्यावर अमेरिकेला याची जाणीव झाली. ती चीनलाही होईल. तोपर्यंत अझहरसारख्या मानवतेच्या शत्रुंना शिक्षा देण्याच्या प्रयत्नांत ते खोडा घालतच राहतील.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)