विविधा : शांताराम नांदगावकर

-माधव विद्वांस

बालगीत, भावगीत, भक्‍तिगीत, लोकनाट्यगीत, लावणी, प्रेमगीत असे अनेक प्रकार आपल्या गीतांमधून हाताळणारे कै. शांताराम नांदगावकर यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म कणकवली येथे 19 ऑक्‍टोबर 1936 रोजी झाला. लहानपणीच ते कुटुंबीयांसमवेत मुंबईत आले. दादरच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले.

“प्रथम तुला वंदितो’ हे गीत गणेशोत्सवादरम्यान कानावर पडतेच. यमन रागातील हे अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेले व अनुराधा पौडवाल व पं. वसंतराव देशपांडे यांनी गायलेले द्वंद्वगीत खूपच लोकप्रिय झाले. या गाण्यामुळेच त्यांचे चित्रपटसृष्टीतील स्थान भक्‍कम झाले. “बिलांची नागीण निघाली’ हे उत्तरा केळकर यांच्या आवाजातील नांदगावकरांचे गीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय झाले. वरातीमध्ये बेंजोवरही हे गाणे वाजवले जाऊ लागले. त्यांच्या या गाण्याच्या भरपूर कॅसेटस्‌ खपल्या. संगीतकार अच्युत ठाकूर यांनी “तूच माझी मैना’ या लोकनाट्याच्या चाली तयार केल्या होत्या, त्याप्रमाणे अर्ध्या तासाच्या आत त्यांनी गीते लिहून दिली. अतिशय जलदगतीने त्यांची शब्दरचना होत असे.

नांदगावकरांनी अनेक विषय हाताळले अगदी क्रिकेटवरही त्यांनी गाणे लिहिले आणि हे गाणे स्वतः सुनील गावस्कर यांनी गायले आहे. “या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, जीवन म्हणजे क्रिकेट राजा’या गाण्यामध्ये त्यांनी क्रिकेटमधील यष्टी, झेल, फटके तसेच मैदानावरचे वातावरणही खुबीने मांडले आहे. “ससा तो ससा की कापूस जसा’ हे बालगीतही त्यांनी लिहिले, त्याला संगीताचा साज दिला अरुण पौडवाल व आवाज दिला उषा मंगेशकर यांनी. दोन बोक्‍यांच्या भांडणांची गोष्ट त्यांनी “दोन बोक्‍यांनी आणला हो चोरून लोण्याचा गोळा’ या बालगीतामधून सांगितली.

किशोरकुमार यांचेकडून “गंमत जंमत’साठी सचिन पिळगावकर यांनी एक मराठी गाणे गाऊन घ्यायचे ठरविले. पण त्यातील “ळ’ उच्चार करता येत नाही म्हणून किशोरदांनी जमणार नाही असे सांगितल्यावर नांदगावकरांनी, “प्रिये जगू कसा तुझ्याविना मी राणी गं’ अशी त्यांना अडचण येणार नाही अशा पद्धतीने शब्दरचना केली. अशी ही बनवाबनवी या चित्रपटातील “हृदयी वसंत फुलताना…’ हे नांदगावकरांचे गाणे अरुण पौडवाल यांनी एक गायिका आणि तीन गायक यांच्याकडून गाऊन घेतले.

नांदगावकर लावणी मध्येही मागे नव्हते “फटाकडी’ चित्रपटासाठी त्यांनी “कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ हे गीत दिले व बाळ पळसुले यांनी दिलेल्या संगीताला आशाताईंनी आपल्या आवाजाचा साज चढविला. 1985 मध्ये ते शिवसेनेच्या तिकिटावर विधानपरिषदेवर निवडून गेले होते. 1995 ते 1999 दरम्यान ते राज्य नाट्य सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. उतारवयात ते मधुमेह व अल्झायमराने आजारी होते. 11 जुलै 2009 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)