विविधा : रामभाऊ म्हाळगी

-माधव विद्वांस

संसदपटू रामभाऊ म्हाळगी यांची आज जयंती. त्यांचा जन्म 9 जुलै 1921 रोजी पुणे येथे झाला. त्यांनी एलएल.बी आणि एम.ए पदव्या प्राप्त केल्या होत्या. कार्यकर्त्यांत आणि सभागृहात ते “रामभाऊ’ याच नावाने ओळखले जात असत.

अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे त्यांचे जीवन होते. राजकारणात असून सत्तेची अभिलाषा त्यांनी कधीही बाळगली नाही. ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्या लोकांना आपण काय केले हे कळले पाहिजे म्हणून विधानसभेतील केलेल्या कामाचा अहवाल देणारे ते पहिले आमदार होते.

पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथमच जनसंघाची पताका फडकावणारी राम- कृष्णाची जोडी होती, ती आणीबाणीमध्ये फुटली (कृष्णराव भेगडे व रामभाऊ म्हाळगी). कृष्णराव भेगडे कॉंग्रेसमध्ये गेले परंतु रामभाऊ अखेरपर्यंत जनसंघ, जनता पक्ष व शेवटी भाजपात राहिले. पुण्यातून कायम विधानसभा व नंतर ठाण्यातून दोनवेळा लोकसभेवर ते निवडून गेले. अनेक विषयावर ते मुद्देसूद चर्चा करीत. साधे राहणीमान व नवीन उप्रकमाची शैली यामुळे ते राजकारणात आघाडीवर राहिले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे एक संस्थापक, तसेच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष होते.जनता पार्टीचे खासदार म्हणून 1977 साली व 1980 साली ते ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे आणि रामभाऊ नाईक यांच्या रूपाने ठाणे जिल्ह्याला रामभाऊ नावाचे तीन खासदार मिळाले. एकदा रामभाऊ विधानसभेत बोलण्यास उभे राहिले, एका महत्त्वाचे विषयावर ते बोलत होते. सभागृहात टाचणी पडली तरी आवाज होईल एवढी शांतता होती. सर्वजण लक्षपूर्वक ऐकत होते.

तेवढ्यात सभापतींनी त्यांना सूचित केले की तुमची वेळ संपली आहे. पण विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मृणाल गोरे यांनी सभापतींना सांगितले, माझा वेळ त्यांना द्या. वास्तविक रामभाऊ व मृणालताई विरोधी विचारांचे, परंतु मृणालताई म्हणाल्या माझाही विषय हाच आहे व तो विषय रामभाऊंना मांडू द्या. विधानसभेत त्यावेळी सत्ताधारी विरोधकांचे नीट ऐकून घेत असत. बोटावर मोजण्याएवढे विरोधक असूनही अभ्यासपूर्ण मुद्देसूद मांडणीमुळे सर्व सभासद त्यांचे भाषण ऐकून घेत असत. 6 मार्च 1982 रोजी त्यांचे मुंबई येथे निधन झाले.

आज त्यांच्या नावाने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी चालविली जाते. मराठा समाज सामाजिक-शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याची माहिती गोळा करण्याचे काम ज्या पाच संस्थांवर सोपविण्यात आले होते त्यात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा समावेश होता. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी त्यांच्या स्मरणार्थ 1982 मध्ये स्थापन झाली. या संस्थेमार्फत सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)