स्मरण सप्तसुरांचे शिलेदार : स्नेहल भाटकर

-अमेय गुप्ते

1941 ते 1950 मराठी भावगीतांचा सुवर्णकाळ. याच सुमारास स्नेहल भाटकर यांच्यासारखा अलौकिक प्रतिभेचा अप्रकाशित तारा उदयाला आला व भावगीताच्या नभांगणात अढळ झाला. स्नेहल भाटकर यांचे खरे नाव वासुदेव गंगाराम भाटकर असून, दि. 17 जुलै 1919 रोजी मुंबईतील प्रभादेवीतील पालखीवाडीत त्यांचा जन्म झाला.

त्यांचे बालपण मुंबईतील दादर परिसरात गेले. बालपणी आकस्मित त्यांचे पितृछत्र हरपल्याने त्यांच्या आईने नगरपालिकेच्या शाळेत नोकरी केली. या शाळेत सुप्रसिद्ध गायक विष्णुपंत पागनीस संगीत शिक्षक होते. बालपणापासून त्यांच्या आईने केलेले संगीत संस्काराचा नकळत परिणाम होऊन त्यांना संगीताची गोडी लागली. दादर येथील श्रीकृष्ण विद्यालयात त्यांनी काही दिवस शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले.

तसेच त्याकाळी असलेल्या विश्‍वंभर प्रासादिक मंडळीद्वारे अनेक भजनांचे कार्यक्रम चालत असत. या मंडळीत ते सहभागी झाले. त्यामुळे ते भजनीबुवा झाले व त्यांना भाटकरबुवा या नावाने लोक ओळखू लागले. दि.16 जून 1939 रोजी ते हार्मोनियम वादक म्हणून एच.एम.व्ही. या कंपनीत रूजू झाले. येथे त्यांनी आपल्या प्रतिभेने संगीत दिग्दर्शक बनण्यापर्यंत मजल मारली. या कॅसेट कंपनीमधील प्रवेशामुळे भाटकरबुवांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने वळण मिळाले. चित्रपटमहर्षी बाबूराव पेंटर (मिस्त्री) यांची निर्मिती असलेल्या “रुक्‍मिणी स्वयंवर’ या चित्रपटाद्वारे त्यांना संगीत दिग्दर्शक बनण्याची प्रथम संधी मिळाली. सुरुवातीस प्रथम बी. वासुदेव या नावाने त्यांनी गीतांना स्वरसाज चढवला.

कलकत्याच्या न्यू थिएटर्सचे केदार शर्मांना “कालिया’ या चित्रपटाच्या ध्वनिमुद्रणासाठी मदत केली. शर्मांनी पुन्हा भाटकरांना “नीलकमल’ या हिंदी चित्रपटासाठी बोलावले. या चित्रपटाला त्यांनी स्नेहल भाटकर या नावाने संगीत दिले व त्या दिवसापासून संगीत क्षेत्राच्या नाभांगणात स्नेहल भाटकर नावाचा तारा अढळ झाला. स्नेहलता हे त्यांच्या मुलीचे नाव. या नावातील “स्नेहल’ हा शब्द घेऊन दिग्दर्शक केदार शर्मा यांनी भाटकरबुवांचे “स्नेहल भाटकर’ असे बारसे केले.

“हमारी याद आयेगी’ चित्रपटामधील “कभी तनहाइयों में यूं हमारी याद आयेगी’ हे भाटकरबुवांचे सर्वाधिक गाजलेले गीत. वारियाने कुंडल हाले, काय तुझे उपकार, कांदा मुळा भाजी, तुजसाठी शंकरा, तुझ्या कांतिसम रक्‍त पताका, यासारखी अनेक मराठी गीतांना त्यांनी स्वरसाज चढवला होता. भाटकरांनी एकूण 27 हिंदी चित्रपट, 10 मराठी नाटके, 12 मराठी चित्रपटांना संगीत देऊन आपलं स्थान चित्रपटसृष्टीत अढळ केलं. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील “शिवायन’ या संगीत कार्यक्रमाचे यांनी सुमारे 80 प्रयोग केले. मुंबई दूरदर्शनवरील “मेरे घर आना’ व “जिंदगी’ या मालिका संगीतबद्ध केल्या.

त्यांच्या संगीतक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल सूरसिंगार पुरस्कार, कंठसंगीत पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार असे अनेक पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले. घरात ते “आण्णा’ या नावाने परिचित होते. माझे व त्यांचे जवळचे संबंध होते. दि.29 मे 2007 रोजी वयाच्या 87 व्या वर्षी मुंबईत भाटकर यांचे निधन झाले. रमेश भाटकर हे त्यांचे चिरंजीव. त्यांचे आण्णांच्या जन्मशताब्दी वर्षात निधन व्हावे हे दुर्दैव! स्नेहल भाटकर यांच्यासारख्या सप्तसुरांच्या शिलेदारास जन्मशताब्दीनिमित्त वंदन.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)