अग्रलेख : पुन्हा मुंबईचा खोळंबा!

गेले दोन-तीन दिवस जोरदार पडत असलेल्या पावसाने पुन्हा मुंबई तुंबल्याच्या बातम्या आल्या आहेत. अनेक ठिकाणी इमारतींमध्ये आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणच्या भिंती आणि इमारतीही कोसळल्याच्या बातम्या आल्या आहेत. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीची पुरती वाट लागली असून पाण्याखाली गेलेल्या लोहमार्गांमुळे लोकल वाहतूक पुरती ठप्प झाली आहे. दर पावसाळ्यातच मुंबईची ही दशा होते.

दरवेळी मुंबई महापालिकेचा कारभार आणि पर्यायाने शिवसेनेवर जोरदार टीका होते. मागच्या पावसाळ्यात तर भाजपनेही या विषयावरून मुंबई महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका करून विरोधकांच्या सुरात सूर मिळवला होता. यंदा विधानसभा निवडणुकीचे वातावरण असल्याने आणि भाजप व शिवसेनेचे पुन्हा सूत जुळल्याने भाजपने मुंबई महापालिकेच्या कारभारावर ओरड केली नाही. पण आज विधानसभेत पुन्हा विरोधकांनी तुंबलेल्या मुंबईवरून महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. ही महापालिकाच बरखास्त करण्याची मागणी विरोधकांनी विधिमंडळात केली आहे. दर पावसाळ्यात शिवसेनेला या टीकेला तोंड द्यावे लागते. महापालिकेच्याही पावसाळी कामांचे वाभाडे निघते पण मूळ समस्या तशीच राहते. पावसाळ्यात मुंबई तुंबणे हा काही नवीन प्रकार नाही. पण त्यावरील राजकारण मात्र संपत नाही.

वास्तविक दर पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यावर काहीच उपाय असू शकत नाही काय, याचा परिणामकारक विचार महापालिका आणि राज्य सरकारने करायला हवा. आता मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या बरोबरीने भाजपचेही नगरसेवक निवडून आले असून या दोन पक्षांची युती तेथे सत्ताधारी आहे. त्यामुळे तुंबलेल्या मुंबईबद्दल एकट्या शिवसेनेला नव्हे तर भाजपलाही जबाबदार धरले पाहिजे. राज्यात भाजपची सत्ता असताना मुंबई महापालिकेच्या उपाययोजनांना त्यांची साथ का मिळू नये, असाही प्रश्‍न आहे. भाजपच्या नेत्यांनीही गप्प बसून शिवसेनेची गंमत पाहायला आवडत असावे असे वरकरणी तरी दिसते आहे. अन्यथा पावसाळी कामांमध्ये राज्य सरकारने समरस होऊन त्यांना कधी मदत केल्याचे ऐकायला मिळाले नाही. मुंबईचा पसारा प्रचंड आहे. लोकांनी इंच इंच जागा व्यापली आहे.

पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाण्यास मार्गच उरला नाही. भुयारी गटारांची तितकी क्षमता नाही आणि मुंबईतले नदी आणि नाल्यांच्या पात्रातही जागोजागी अडथळे आहेत. त्यामुळे पाणी तुंबणे हा अपेक्षित प्रकार असल्याचा युक्‍तिवाद महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून केला जातो. त्यात काही प्रमाणात तथ्य आहे. तथापि पावसाळा सेट झाला की इतकेच पाणी लगेच कसे वाहून जाते? पावसामुळे सुरुवातीलाच कसा शहराचा खोळंबा होतो? असे प्रश्‍न निर्माण होतात. त्याचे साधे उत्तर असे की पावसाळा सेट झाला की पडणाऱ्या पाण्याची तोपर्यंत वाट मोकळी होते व त्या मार्गाने पाण्याचा वेगाने निचरा होतो. पण हा निचरा सुरुवातीपासूनच करण्यासाठी नालेसफाई वगैरे कामे परिणामकारकपणे व्हायला हवीत ही साधी मागणी आपल्याला पूर्ण करता येत नाही काय? हा यातला मुख्य प्रश्‍न आहे.

मुंबई तुंबल्यानंतर होणाऱ्या टीकेला उत्तरे देताना शाब्दिक कसरती करण्यात जेवढी अक्‍कलहुशारी दाखवली जाते तितकी अक्‍कलहुशारी पावसाळी पाणी तुंबणार नाही यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमध्ये दाखवली जाणे अपेक्षित आहे. आजच कोणी तरी एका शिवसेना नेत्याने म्हटले आहे की, मुंबईचे काय घेऊन बसलात, तिकडे रशियातही पूर आला आहे. आता असल्या प्रकारच्या युक्‍तिवादाने आधीच हवालदिल झालेला मुंबईकर संतापणे स्वाभाविक आहे. जर समस्या आहे तर ती सरळ पद्धतीने मान्य करायला राजकारण्यांना लाज का वाटायला हवी? कालपरवा मुंबईच्या महापौरांनीही म्हणे मुंबई तुंबल्याचा इन्कार केला आहे. त्यावरूनही मुंबईकरांनी संताप व्यक्‍त केला आहे. मग कोणीतरी तुंबलेल्या मुंबईवर गाणी, कविता करतो आणि मग त्यावरून महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणखी चिडचिड करते.

दर पावसाळ्यातला हा एपिसोड आहे. काल चौथ्या दिवशीही पावसाने मुंबई आणि ठाण्याला झोडपून काढले आहे. तेथील कार्यालये आणि शाळांनाही सुट्टी देण्यात आली असून पुढील दोन दिवसही मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मालाडमध्ये भिंत कोसळून 18 जण दगावले आहेत. अन्यत्रही छोट्या-मोठ्या दुर्घटना घडल्याच्या बातम्या आल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेतर्फे आपत्ती व्यवस्थापन कक्षही स्थापन केला जातो. काल मुख्यमंत्री या आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन आले. त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना सावधगिरीच्या सूचना केल्या आहेत. महिनाभराचा पाऊस तीन-चार दिवसांत पडल्याने ही सारी परिस्थिती उद्‌भवल्याचे सांगण्यात येत आहे. काही प्रमाणात तेही खरे असले तरी महापालिकेने केलेल्या कथित पावसाळी उपाययोजनांची पूर्ण वासलात लागली आहे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य रनवे सुद्धा कालच्या पावसामुळे क्षतिग्रस्त झाला आहे.

काल रात्री तेथे एक विमान धावपट्टीवर उतरताना ओव्हरशुट झाल्याने मुख्य रनवे दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आल्याने तब्बल 55 विमाने रद्द झाली. या विमानतळावरील दुय्यम रनवेच्या आधारे थोडी विमान वाहतूक तेथून सुरू ठेवण्यात आली आहे. पण मुख्य रनवे दुरुस्तीसाठी 48 तासांचा अवधी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. अपवादात्मक स्थितीत अतिवृष्टीमुळे होणारा खोळंबा अटळ असतो हे जरी खरे मानले तरी पूर्ण पावसाळाभर रस्ते आणि रेल्वे वाहतूक खोळंबून राहणे हे या आंतरराष्ट्रीय शहराला शोभादायक नाही. स्कायवॉक, सीलिंक, मेट्रो अशा उपाययोजनांतून मुंबईकरांचे जीवन सुकर करण्याचा प्रयत्न तेथे गेल्या काही वर्षांपासून झाला आहे. एमएमआरडीए सारखी मोठी यंत्रणा तेथे कार्यरत आहे. त्या यंत्रणेची साथ पावसाळी पाणी तुंबण्याच्या प्रकारावरही घेणे महत्त्वाचे आहे.

परंपरागत पावसाळी कामे काढून आणि त्यातही चिरीमीरीचा धंदा करून भागणार नाही. एमएमआरडीए, महापालिका आणि राज्य सरकार यांनी संघटितपणे आणि परस्पर समन्वयाने मुंबईकरांचा दर पावसाळ्यात होणारा हा खोळंबा टाळला पाहिजे. तुंबणाऱ्या मुंबईबद्दल दर पावसाळ्यात एकट्या शिवसेनेला झोडपून राज्य सरकारला आपली जबाबदारी टाळता येणार नाही हेही तितकेच खरे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)