प्रासंगिक : बोलू बोलीचे बोल !

-अविनाश गोडबोले

संयुक्‍त राष्ट्रांनी सन 2019 हे वर्ष स्थानिक भाषा वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्यांचा हा निर्णय अत्यंत मोलाचा आहे. सर्व जगभर स्थनिक बोलीभाषांना एक महत्त्वाचे स्थान असते. त्या प्रदेशाची ती सांस्कृतिक ओळख असते आणि त्या शैलीच्या बोलीने तिची ओळख घट्ट होत असते. यातील बहुतांशी बोलीभाषा काळाच्या ओघात, इंग्रजीचा प्रभाव व जागतिकीकरणाच्या वावटळीत लुप्त होत आहेत.

अलीकडच्या काळात बोलीभाषा लुप्त होण्याचा वेग अधिकच वाढला आहे. जगभरात सुमारे 6700 बोलीभाषा आहेत पण त्यातील 40 टक्के भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचा एक अहवाल संयुक्‍त राष्ट्रांपुढे मांडण्यात आला होता. त्यामुळे यातले गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक भाषा जपण्याच्या इराद्याने संयुक्‍त राष्ट्रांनी हे वर्ष “स्थानिक भाषा वर्ष’ म्हणून पाळायचे ठरवले आहे.

आपल्या देशातही दर 12 कोसांवर भाषांची शैली बदलते असे सांगितले जाते. महाराष्ट्रातही अनेक बोली बोलल्या जातात. मूळ मराठीचीही वेगवेगळ्या प्रकारची शैली वेगवेगळ्या प्रांतात ऐकायला मिळते. बेळगाव-कोल्हापूरकडचे मराठी, सोलापूरकडील मराठी आणि पुणेरी मराठी यातला फरक आपल्याला सहज ओळखू येतो.

नुसत्या उच्चारातील हेलातून आपण हा माणूस कोणत्या भागातील असावा, हे सहज ओळखू शकतो. त्याखेरीज मराठीला जवळच्या; पण पूर्ण वेगळ्या अशाही काही बोली महाराष्ट्रात आहेत. त्यात अहिराणी, सामवेदी, तावडी, आगरी, दालदी कोकणी मुस्लीम बोली, चित्पावनी अशा अनेक बोलीभाषा आहेत. या भाषांच्या बोली जपण्याचा किंबहुना त्यांचे वेगळेपण लोकांच्या मनावर ठसवण्याचा एक स्तुत्य उपक्रम या वर्षाच्या निमित्ताने “बाईट्‌स ऑफ इंडिया’ या संस्थेने केला आहे. त्यांनी महाराष्ट्रांत बोलल्या जाणाऱ्या तब्बल 20 बोलींच्या वैशिष्ट्यांचे व्हिडीओ प्रकाशित केले आहेत. यात त्या-त्या भाषा शैलीतील काव्य, गीत रचना, पारंपरिक बोलीचे वैशिष्ट्यपूर्ण नमुने आपल्याला सहजी उपलब्ध झाले आहेत.

नामवंत व्यक्‍तीच्या किंवा लेखकांच्या सहकार्याने त्यांनी हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम केला आहे. “मराठी राजभाषा दिना’निमित्त या संस्थेने हा उपक्रम राबवला. त्यात प्रभाकर देसले (अहिराणी), मधु पांढरे (तावडी), सर्वेश तरे (आगरी), डॉ निधी पटवर्धन (दालदी मुस्लीम कोकणी बोली), रश्‍मी कशेळकर (मालवणी), अक्षय वाटवे (घाटी), प्रसाद कुमठेकर (उदगिरी), डॉ. प्रतिमा इंगोले आणि विठ्ठल वाघ (वऱ्हाडी बोली) यांनी माहिती दिली आहे. झाडी बोली आणि गोंडी बोली या दोन वैशिष्ट्यपूर्ण बोलींची माहिती डॉ. सुमिता कोंडबत्तुनवार यांनी दिली आहे. शिवाय कोल्हापुरी, सातारी, सोलापुरी, मराठवाडी आणि बेळगावी या शैलींच्या बोलींचीही अत्यंत समर्पक अशी माहिती दिली आहे.

या साऱ्या शैलीदार बोली आता हळूहळू लुप्त होऊ लागल्या आहेत. वर्ष 1903 मध्ये जॉर्ज ग्रिअर्सनने भारताचे पहिले भाषिक सर्वेक्षण केले होते. वर्ष 1961 मध्ये पुन्हा भारतीय बोलीभाषांचे सर्वेक्षण झाले. सुरुवातीच्या सर्वेक्षणात 13 लाख लोक तिलोरी-कुणबी भाषा बोलत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पण वर्ष 1961 च्या सर्वेक्षणात मात्र केवळ तीन लोकच ही भाषा बोलू शकत असल्याचे नमूद करण्यात आले होते. म्हणजेच स्थानिक बोलीभाषा लुप्त होण्यास त्या काळापासूनच प्रारंभ झाला होता. या पार्श्‍वभूमीवर या बोली जपण्याचा कसोशीचा प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुकच करावे लागेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)