कलंदर : पाणबोंब व पाणबॉम्ब

-उत्तम पिंगळे

राज्यात पावसाचे थैमान चालू असतानाच मी प्राध्यापक विसरभोळ्यांकडे गेलो. मला म्हणाले, किती विरोधाभास आहे ते पाहा. विदर्भ, मराठवाड्यात कित्येक ठिकाणी पाऊस नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत, तर कोकणात नेमकी उलटी परिस्थिती आहे. पावसाने धरणे फुटू लागली आहेत.

आज स्वातंत्र्योत्तर सत्तर वर्षांत आपण हरितक्रांती धोरण अवलंबले पण अजूनही विदर्भ, मराठवाडा यांस पाणी नियमित पुरवू शकलो नाही. पर्जन्यमान कमी जास्त होत आहे ते आपल्या हातात नाही. म्हणजे तसे आपल्याच हातात आहे. आपण जे प्रदूषण, वृक्षतोड, जंगलतोड व डोंगरसपाटी चालविली आहे त्याचाही परिणाम पावसावर होत आहे हे निश्‍चित. पण आहे त्या पाण्याचे आपण व्यवस्थापन करीत आहोत का? आपल्याला त्याचे काही सोयरसुतक आहे असे वाटत नाही. निवडणुका आल्या की आपण पाणी व रस्ते या मूलभूत प्रश्‍नांना आपल्या आश्‍वासनात व जाहीरनाम्यात स्थान देऊन आपण काहीतरी करणार आहोत, हे दाखवतो.

विदर्भ, मराठवाड्यात पर्जन्यमान कमी असले तरी असलेल्या पाण्याचा व्यवस्थितपणे वापर करणे शक्‍य नाही का? एवढे तंत्रज्ञान पुढे गेले असताना नदी जोडणी प्रकल्पाचा पाठपुरावा राज्याने करून अशा दुष्काळग्रस्त भागासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्‍यक आहे. कोकणात भरपूर पाऊस पडतो अशावेळी ते पाणी उचलून वर आणणे विज्ञानाला अशक्‍य नाही; पण प्रचंड खर्चिक आहे. त्यात काही संशोधन करता येणार नाही का? माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नदी जोडणी प्रकल्प पुन्हा उकरून काढला होता; परंतु नंतर पुन्हा तो थंड पडला आहे.

आता मागील रविवारच्या “मन की बात’ मध्ये सध्याच्या प्रधानमंत्र्यांनी पिण्याच्या पाण्याचा व एकंदरीत पाणी व्यवस्थापनाच्या प्रश्‍नास हात घातलेला दिसत आहे. खरोखरच पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन पद्धतशीरपणे केले तर मराठवाड्याच्या दुष्काळी भागासाठी आपण कायमस्वरूपी पाणी देऊ शकतो. कधी कधी मला प्रश्‍न पडतो की, या नेत्यांना कायमस्वरूपी तोडगा नको आहे की काय? काहीतरी प्रश्‍न असल्याशिवाय मते मिळत नाही तसा पूर्वग्रह दिसत आहे. पण प्रश्‍न कायमचे मिटवले तरीही मते मिळू शकतात हे कोणी ध्यानात घेत नाहीत. अशा प्रदेशांमध्ये सतत पाण्यासाठी बोंबाबोंब चालू आहे.

आता कोकणाकडे पाहा. प्रचंड पाणी वाहून जात आहे. आजमितीस पडलेल्या पावसाने धरणांची पातळी खूपच वाढली आहे. चिपळुणातील तिवरे येथील धरणही फुटले. प्रशासनास पूर्वकल्पना देऊनही कोणतीही कारवाई झाली नाही. आता नुकताच धरणांचा रिपोर्ट आला आहे. 1352 तपासलेल्या धरणांपैकी 297 धरणांच्या बाबतीत दुरुस्ती लायक त्रुटी आढळून आलेल्या आहेत. मग वाट कशाची पाहतोय आपण? उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी असताना अशा त्रुटी सर्वत्र दुरुस्त करणे आवश्‍यक होते. तसे झाले असते तर धरण फुटीचा प्रसंग टाळता आला असता.

आता धरणे भरली असल्याने तसे काम करणेही कठीण जाणार आहे. पाऊस पडत असल्याने पाणी सोडणे आवश्‍यक आहे नाहीतर या धरणांवर दाब वाढू लागेल. असे आपले पाण्याचे व्यवस्थापन आहे. आणखी किती “तिवरे’ आपण पाहणार आहोत. व्यवस्थापन शून्यतेने सर्व धोकादायक धरणा शेजारील गावे वसाहती या पाण्याच्या बॉम्बशेजारी वसल्या आहेत असे चित्र दिसते. एकीकडे पाण्यासाठी ओरड (पाणबोंब) तर दुसरीकडे पाण्याचा पाणबॉम्ब असे दृश्‍य आजतरी दिसत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)