विज्ञानविश्‍व : पुनर्भेटीचा आनंद

-डॉ. मेघश्री दळवी

“अपोलो 11′ मधल्या अंतराळवीरांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं त्याला येत्या 20 जुलैला 50 वर्षं पूर्ण होत आहे. “अपोलो 11′ मोहीम गाजली, पण एकूणच अपोलो मालिकेत 17 यानं चंद्राकडे पाठवण्यात आली होती आणि त्यातून 14 अंतराळवीरांनी प्रवास केलेला होता. त्यातले काही अंतराळवीर आज आपल्यात नसले, तरी बाकीच्यांनी ही सुवर्णजयंती अगदी आगळ्या प्रकारे साजरी करायची ठरवली.

न्यूयॉर्कमधल्या एक्‍सप्लोरर क्‍लबचा वार्षिक सोहळा 16 मार्चला पार पडला. या समारंभात अपोलो मिशनमधले 8 अंतराळवीर उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांबरोबर छान गप्पा मारल्या आणि आपल्या साहसी अंतराळ मोहिमांमधल्या गमतीजमती सांगितल्या. अपोलो 11 मधले बझ अल्ड्रिन आणि मायकल कॉलिन्स, अपोलो 7 मधले वॉल्टर कनिंगहॅम, अपोलो 9 मधले रस्टी श्‍विकर्ट, अपोलो 13 चे फ्रेड हेझ, अपोलो 15 चे अल वोर्डन, अपोलो 16 चे चार्ली ड्यूक आणि अपोलो 17 मधले हॅरिसन श्‍मिट असे दिग्गज अंतराळवीर पाहून उपस्थित मंडळी खरोखरच भारावून गेलेली होती.

अशा सोहोळ्यात साधारणपणे काळा सूट परिधान करण्याचा प्रघात असतो. बझ अल्ड्रिननी मात्र राखाडी सूट आणि त्याच्यावर रॉकेट्‌सचं डिझाईन अशा मजेदार कपड्यात लक्ष वेधून घेतले. एकोणनव्वद वर्षांच्या बझ अल्ड्रिननी आपल्या धमाकेदार बोलण्याने ती संध्याकाळ गाजवली.

यावेळी बझ अल्ड्रिन आणि मायकल कॉलिन्सनी “अपोलो 11’चा एक किस्सा सांगितला. मायकल कॉलिन्स अंतराळयानातून चंद्राभोवती फेरी घालत होते, तर ईगल या मॉड्यूलमधून नील आर्मस्ट्रॉंग आणि बझ अल्ड्रिन प्रत्यक्ष चांद्रभूमीवर उतरले होते. चंद्रावरचे नमुने गोळा करून झाल्यावर परत यायची वेळ झाली. उतरताना सर्किट ब्रेकरचा जो दांडा बाहेर खेचला होता, तोच परत आत ढकलून ईगल सुरू करायचे होते. पण को-पायलटच्या जागेवर जाऊन बसताना अल्ड्रिन बघतात तर काय, तो दांडा चक्‍क तुटून खाली पडलेला होता! पण नेमक्‍या अशा आणीबाणीच्या वेळेसाठीच या आद्य चांद्रप्रवाशांची तयारी करून घेतलेली होती.

अल्ड्रिननी आयत्या वेळी तिथे एक पेन घुसवून त्या सर्किट ब्रेकरचं बटन दाबले आणि ईगल सुरू केले. कॉलिन्स यानात वाट बघत होते. ईगल परत आल्यावर त्यांनी हा किस्सा ऐकला मात्र, त्यांना एकदम धस्स झालं. सर्किट ब्रेकरचा दांडा तुटल्याने ईगल सुरू झाले नसते तर? आर्मस्ट्रॉंग आणि अल्ड्रिन यानात परत येऊ शकले नसते तर? आपल्याला एकट्याला दु:खद अंतकरणाने अपोलो 11 परत आणावे लागले असते ही कल्पनाही त्यांना सहन होत नव्हती.

इतर अंतराळवीरांनीही तऱ्हेतऱ्हेचे किस्से सांगत, आपला अनुभव सर्वांसमोर मांडत, अशा गप्पांमधून पुनर्भेटीचा आनंद साजरा केला. अपोलो 17 मोहिमेनंतर, म्हणजे डिसेंबर 1972 नंतर नासाने पुन्हा अंतराळवीरांना चंद्रावर पाठवलेले नाही. त्यामागे तांत्रिक अडचणी नव्हत्या तर आर्थिक आणि राजकीय कारणे होती. मात्र आता इतर देश आणि अनेक खासगी कंपन्या त्या दिशेने प्रयत्न करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)