विविधा : अशोक कामटे

-माधव विद्वांस

मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस कमिशनर पैलवान अशोक कामटे यांची आज जयंती. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1965 रोजी झाला. ते एक कर्तव्य कठोर पोलीस अधिकारी होते आणि त्यांना मुंबईचे रक्षण करताना वीरगती मिळाली. पण फार थोड्या लोकांना माहिती आहे की ते उत्कृष्ट पैलवानही होते. जेथे मुरारबाजीसारखा वाघ छ. शिवरायांना पुरंदरावर मिळाला त्या पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या चांबळी गावचे हे सुपुत्र.

या गावात कुस्तीची परंपरा आहे. कामटे यांचे वडील कर्नल होते व ते कुस्तीच्या खेळातूनच लष्करात भरती झाले होते. तर आजोबा पोलीस अधिकारी होते. अशोक कामटे यांनी अनेक नामांकित पैलवानांना अस्मान दाखविले होते. कोडाईकनालच्या इंटरनॅशनल स्कूलमधून कामटे यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले, तर पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार महाविद्यालयात झाले. त्यांना आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्तीही मिळाली होती.

मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयातून त्यांनी पदवी प्राप्त केली, तर दिल्लीच्या सेंट स्टीफन महाविद्यालयात एमए पूर्ण केले.त्यांना कॅम्प रायझिंग सन मधून आंतराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली व ते 1982 मध्ये उत्तीर्ण झाले. पेरू येथे जालेल्या ज्युनिअर पॉवर लिफ्टींग स्पर्धेत 1978 मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.

अशोक कामटे हे पोलीस दलामध्ये बॉडी बिल्डर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी बंधकांना दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठीचे विशेष प्रशिक्षण घेतले होते. मुंबई हल्ल्याच्या वेळी ते मुंबईच्या पूर्व विभागात ड्युटीवर होते. त्यामुळे त्यांना कामा हॉस्पिटल कारवाईसाठी इमारतींमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते.

कामटे हे 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून भंडारा, सातारा, ठाणे ग्रामीण येथे काम केले. वर्ष 1999 ते 2000 या कालावधीत युएनमिशन बोस्निया येथे प्रतिनियुक्‍तीवर होते. वर्ष 2000 मधे डेपुटी कमिशनर पोलीस मुंबई म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर कोल्हापूर सांगली आणि सोलापूर येथे जिल्हा पोलीस प्रमुख पदावर नेमणूक झाली. त्यांनी वर्ष 2008 मधे अतिरिक्‍त पोलीस आयुक्‍त म्हणून मुंबई येथे कार्यभार स्वीकारला आणि पाचच महिन्यात 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आले.

त्यांच्या पत्नी विनिता कामटे (सहलेखिका विनिता देशमुख) यांनी “टु द लास्ट बुलेट’ या पुस्तकात त्यांच्या आठवणी लिहिल्या आहेत. अखेरचा प्रवास या प्रकरणात अशोक कामटे यांच्या अंतिम यात्रेचे अत्यंत हृदयद्रावक वर्णन केले आहे.

विनीता कामटे लिहितात-माझे सासरे तर दु:खाने पूर्ण कोलमडले होते. पण तेही एक लष्करी अधिकारी होते. अखेरच्या क्षणी त्यांच्या मनातला सैनिक जागा झाला आणि अखेरची मानवंदना चालू असताना त्यांनीही खाडकन सॅल्यूट ठोकत वीरमरण प्राप्त केलेल्या आपल्या पुत्राला अखेरची सलामी दिली. तो जसा जगला तसच त्याला बघणं मला आवडेल.
अशा कर्तव्य दक्ष अशोकास 2009 मध्ये त्यांना मरणोत्तर अशोक चक्र’ देऊन सन्मानित करण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)