कलंदर : चिन्ह… छिन्नविछिन्न

-उत्तम पिंगळे

घटनेनुसार भारतात संसदीय पद्धतीची लोकशाही राबवली जाते. संसद ही राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा मिळून तयार होत असते. विविध पक्ष लोकशाही मार्गाने निवडणुका लढवीत असतात. सर्वसामान्य जनता त्यांना मतदान करत असते.

पूर्वी जनता सुशिक्षित नसल्यामुळे आपल्या उमेदवाराचे नाव वाचता येत नसे. त्यामुळे प्रत्येक पक्षाला एक एक चिन्ह दिले जाई. चिन्हामुळे लोकांना लक्षात राही की कोणता उमेदवार त्यांचा आहे. विविध पक्ष निवडणूक आयोगाकडून चिन्हे मागून घेत. त्या चिंन्हांमध्येही काही अर्थ होता. जसे पूर्वी कॉंग्रेसचे गाय वासरू असे चिन्ह होते. म्हणजे गाय जशी वासराची काळजी घेते तसे सरकार तुमची काळजी घेईल.

जनता पक्षाचे नांगरधारी शेतकरी असे चिन्ह होते. जे शेतकरी व कष्टकरी वर्गास समर्पित होते. मग पक्ष सोयीस्करपणे त्यांच्या चिन्हांचा चांगला अर्थ लोकांना सांगत होते. आता सर्वच पक्ष व्यवहारी बनत चाललेले असल्यामुळे पूर्वीचा अर्थ राहिला बाजूला. आता काय होत आहे ते पाहा –

चिन्हवाल्या पक्षांची बोलविली सभा,
आयोग होता सभापती मधोमध उभा.
आयोग म्हणाला, आयोग म्हणाला,
पक्षांनो, घटना नाही भिन्न, घटना नाही भिन्न!
तुम्हां – सर्व पक्षांना एक एक चिन्ह,
या चिन्हाचे कराल काय?
माया म्हणाली, अश्‍शा अश्‍शा,
“हत्तीने’ मी भरीन “मतपेट्या’
“डावा’ म्हणाला, बंद करीन, संप करीन मीही माझ्या “विळ्याने’,
असेच करीन, असेच करीन,
“युवा’ म्हणाला, खुशीत येईन तेव्हा,
“हात’ हलवीत राहीन.
“दीदी’ म्हणाली, नाही ग बाई,
“हाता’ सारखे माझे मुळीच नाही,
खूप खूप रागवीन तेव्हा,
“रोपटे’ फुगवीन, “रोपटे’ फुगवीन.
“मुफ्ती’ म्हणाली, पडेल सत्ता
तेव्हा “दौत टाकेचा’ मलाच मक्‍ता
“काका’ म्हणाले, कधी वर, कधी बुडी,
घड्याळासंगे मी सोडीन पुडी.
“भाई’ म्हणाला, “कमळ’ म्हणजे
दहा हात, दहा हात
पोहत राहीन प्रवाहात,
पोहत राहीन प्रवाहात.
“मुलायम’ म्हणाले, माझे काय?
तुझे काय? हा हा हा!
“सायकल’ म्हणजे नसलेला पाय.
“लालबा’ म्हणाला, कंदील फुलवून धरीन, मी धरीन, अवकाळ्यात “चारा’ मी शोधीन.
आयोग म्हणाला, छान छान छान!
घटनेच्या देणगीचा ठेवा मान.
आपुल्या चिन्हाचा उपयोग करा.
नाही तर काय होईल?
“जनताच तुम्हाला सोडून जाईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)