कलंदर : मतदार राजा व कार्यकर्ते

-उत्तम पिंगळे

(पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर सरांकडे गेलो)

मी : नमस्कार सर, परवाच तुम्ही मला मतदान करा व मतदान आपले कसे कर्तव्य आहे, ते नीट समजावून सांगितले होते.
विसरभोळे : होय, बरोबर आहे. पण आज लगोलग येथे कसे आलात?

मी : नाही, पहिल्या टप्प्यातील मतदान एकंदरीत शांततेने पार पडले; पण आपण ऐकले की एकंदरीत सर्वच ठीकठाक असले तरी बिहारात फक्‍त पन्नास टक्‍केच मतदान झाले.
विसरभोळे : बरोबर आहे. बंगालात टक्‍केवारी खूप जास्त आहे व आंध्रातील ठीक आहे.

मी : पण आपण जर पूर्वीचा उत्तर प्रदेश व बिहारचा विचार केला म्हणजेच आताचे उत्तरांचल, यूपी, बिहार व झारखंड तर तेथे लोकसभेच्या सुमारे एकशे चाळीस जागा आहेत म्हणजेच एकूण लोकसभेच्या पंचवीस टक्‍क्‍यांपेक्षा थोडे जास्त. अशा वेळी येथे जेमतेम पन्नास टक्‍के मतदान होणे हे चांगले लक्षण नाही.
विसरभोळे : तुम्ही म्हणता ते बरोबर आहे; पण काय आहे आता बाहेर एक तर मरणाचा उकाडा आहे. अशा वेळी तुम्ही पाहता की शहरी व मध्यमवर्ग बाहेर पडत नाही. खेडोपाडी त्या मानाने जास्त मतदान होते.

मी : म्हणजे जो जास्त शिकलेला व सुजाण आहे तोच या मतदानात भाग घेत नाही.
विसरभोळे : तसे नक्की म्हणू शकत नाही. कारण खेड्यांमध्ये सुजाण नागरिक नाहीत असं थोडंच आहे? पण निवडणूक प्रक्रिया अधिक सुटसुटीत कशी होईल याचा आपण विचार करू शकतो.

मी : म्हणजे ?

विसरभोळे : म्हणजे असे बघा मतदान एकच दिवस न ठेवता सलग दोन दिवस किंवा एक दिवस आड मतदान ठेवावे. पुढे एक वा दोन दिवस काही ठिकाणी मतदान केंद्रे चालू ठेवावीत. म्हणजे ज्यांना प्रत्यक्ष त्या तारखेला मतदान करता येणार नाही ते या केंद्रात मतदान करू शकतात. अशी केंद्रे म्हणजे एटीएमसारखी वोटिंग बुथ असावीत किंवा आहेत ती बॅंक एटीएम त्या कालावधी करता वोटिंग बूथ म्हणूनही कार्य करू शकतील अशी सुविधा असावी. एक तर तेथे सीसीटीव्ही असल्यामुळे कोण मतदान करत आहे ते समजते तसेच आधार लिंक असल्यामुळे एक व्यक्‍ती एकदाच मतदान करू शकेल. वाटल्यास अतिरिक्‍त अशी स्टेशने, बॅंका, विमा कंपन्या, विमानतळे, बाजार, सिनेमा व नाट्यगृहे व मोठमोठे मॉल अशा ठिकाणी लावू शकतात. अशाने टक्‍केवारी निश्‍चित वाढेल.

मी ः हो, टेक्‍नॉलॉजीचा आपण पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे.

विसरभोळे ः आता कसे आहे की मतदान सुरू झाले की उमेदवार, कार्यकर्ते, मतदार कम कार्यकर्ते यांच्या मनात एक धाकधूक असते की आता मतदान किती होईल? त्यांची परिस्थिती ते “रिमझिम पाऊस पडे सारखा’ गाणे ऐकले असेल ते विडंबन करून लिहिले आहे तशी असते…
झिंगझिंग प्रचार घडे सारखा
सभांनाही पूर चढे
मतदान केंद्रे चहूकडे
गं बाई गेला मतदार कुणीकडे…
नेते भिजले भिजल्या टोळी
ओलीचिंब यादी झाली
चमकून श्रेष्ठीं डोळा फिरवी
दचकुन माझा ऊर उडे…
हाक दावती “राजा’ म्हणुनी
रोखुनी धरली दाही दिशांनी
खुणाविता मज कर उंचावुनी
नाव “निशाणा’ समजूत घडे…
जनाशयाच्या लक्ष दर्पणी
तुझेच फसवे बिंब बघुनी
हसता “राजा’ प्रचार रानी
पक्षातच तोंडघाशी पडे…

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)