विविधा : लोकनायक बापूजी अणे

-माधव विद्वांस

पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, विदर्भाच्या राजकीय, साहित्यिक आणि सांस्कृतिक जीवनातील एक श्रेष्ठ व्यक्ती लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांचे आज पुण्यस्मरण (निधन : 26 जानेवारी 1968)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बापूजींचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे 29 ऑगस्ट 1880 रोजी झाला. त्यांचे आजोबा हे विद्वान संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच संस्कृतचे संस्कार अणे यांच्यावर झाले. तत्त्वज्ञान, इतिहास, धर्म आणि साहित्य हे त्यांचे अभ्यासाचे विषय होते. वर्ष 1902 मधे त्यांनी नागपूर येथे बी. ए. ची पदवी घेतली.त्यांनी वर्ष 1907 मध्ये कोलकत्ता विद्यापीठातून एलएल.बी. झाले व यवतमाळ येथे वकिली करू लागले. त्यावेळी देशभक्‍तीचे वारे वाहू लागले होते.

लो. टिळकांचा प्रभाव त्यांच्यावर पडला व ते स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले. टिळक त्यांचे आदर्श होते. अणे यांनी टिळकांचे चरित्र संस्कृतमधून “श्रीतिलकयशोर्णव’ या पुस्तकातून ओवीबद्ध केले. यासाठी त्यांना साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन गौरवले होते. अगदी अलीकडील 20 व्या शतकातील ते एकमेव संस्कृतमध्ये रचले गेलेले चरित्र असावे. लोक अणे यांना “विदर्भाचे लोकनायक’ असे संबोधू लागले.

ते लोकमान्यांचे विश्‍वासू सहकारी होते. टिळकांच्या पश्‍चात ते महात्मा गांधींचे अनुयायी झाले. गांधीजींच्या चळवळीत त्यांनी सक्रिय भाग घेतला. बापूजींनी पुसद येथील जंगल सत्याग्रहात भाग घेतला होता. ‘बापूजी अणे अन्‌ पिवळे दोन आणे’ असे लोक त्यांना त्यावेळी म्हणायचे. कॉंग्रेसमध्ये काही मतभेद झाल्याने त्यांनी व पंडित मदनमोहन मालवीय यांनी वेगळा ‘स्वराज्य पार्टी’ नावाचा पक्ष काढला.

ब्रिटिश राजवटीत त्यांची व्हॉईसरॉयच्या सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून नेमणूक झाली. ब्रिटिशकालीन मध्य प्रदेशच्या विधान मंडळाचे ते सदस्यही होते. वर्ष 1924 मध्ये त्यांनी विदर्भ राज्याचा ठराव मंडला होता व तो मंजूरही झाला होता. सिलोनमध्ये ऑगस्ट 1943 ते जुलै 1947 या काळात ते भारताचे उच्चायुक्‍त होते. तसेच स्वतंत्र बिहारचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली होती.

वर्ष 1962 आणि 1967 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. वर्ष 1928 साली ग्वाल्हेर येथे भरलेल्या 13 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यांनी संपूर्ण आयुष्यच देशसेवेला वाहिले होते. त्यामुळे भारत सरकारकडून “पद्मविभूषण’ हा किताब देऊन त्यांना गौरविण्यात आले. विविध साप्ताहिकांमध्ये ते लेखन करीत असत.

“अक्षरमाधव’ या त्यांच्या लेखसंग्रहात त्यांनी लिहिलेले लेख व भाषणे प्रसिद्ध केली आहेत. ते पुण्याच्या वैदिक सभेचे अध्यक्षही होते. त्यांची दिनचर्या अत्यंत शिस्तबद्ध असायची संध्याकाळी नित्यनेमाने भागवत पाठंही करायचे. 26 जानेवारी 1968 साली त्यांचे निधन झाले. या महान व्यक्‍तीस अभिवादन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)