संशयकल्लोळ नको (अग्रलेख)

देशातील आगामी निवडणुकाही ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटनेच होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. सय्यद शुजा नामक एका सायबर तज्ज्ञाने दोन दिवसांपूर्वी लंडनमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन काही खळबळजनक दावे केले आहेत. त्यानंतर निवडणुका पुन्हा जुन्याच अर्थात मतपत्रिकेच्या पद्धतीने घेतल्या जाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अर्थातच संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही आठवड्यांवर आल्या असताना असा प्रकार होणे म्हणजे एकूणच भारतीय निवडणूकप्रणाली विषयीच संशय आणि संभ्रम निर्माण करणारे आहे. हा प्रकार गेल्या चार-साडेचार वर्षात पुन:पुन्हा डोके वर काढतो आहे, त्याला एकदाच आणि कायमचे मोडीत काढणे आवश्‍यक आहे. केवळ निवडणूक आयोगाचे हे काम नाही. तसे जर झाले नाही, तर होणारे सत्तांतर व मतदारांनी दिलेला जनादेश याला काहीच अर्थ आणि महत्त्व राहात नाही. ज्याला महत्त्व राहात नाही, ते मानण्याची वृत्तीही राहात नाही. जेव्हा असे होते, तेव्हा अराजकसदृश स्थिती निर्माण व्हायला फार वेळ लागत नाही व “बळी तो कान पिळी’ या न्यायाने बलवान हा आपसुकच सगळी प्रक्रिया अव्हेरून मग लोकशाहीच्या छाताडावर बसायला मोकळा होतो.

सय्यद शुजा हे एक निमित्त. मात्र त्याचे टायमिंग चांगलेच जुळून आले आहे. आता सार्वत्रिक निवडणुकांचा शंखनाद कोणत्याही क्षणी होण्याची वेळ आली असताना त्याने भामट्यासारखी एक पत्रकार परिषद लंडनला घेतली. शुजा हा भारतीयच आहे. सायबरतज्ज्ञ असून ईव्हीएम डिझाइन करणाऱ्या टीमचा सदस्य असल्याचा दावा त्याने केला आहे. मात्र, भारताच्या ज्या कंपनीत आपण होतो व जिवाला धोका असल्यामुळे देश सोडल्याचे तो म्हणतोय. त्या कंपनीने तो आमचा कर्मचारी नव्हता असे स्पष्ट केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निवडणूक आयोगाने त्याच्या विरोधात तक्रारही केली आहे. शुजा फ्रॉड आहे का, त्याने आताच हे सगळे का सांगितले, त्याचा बोलविता धनी कोण, हे राजकीय कारस्थान आहे का, असे अनेक प्रश्‍न आहेत व ते योग्यही आहेत. मात्र, हे सगळे मान्य करूनही त्याने जे मुद्दे उपस्थित केले आहेत तेही कमी महत्त्वाचे नाहीत. किंबहुना तेच सर्वात महत्त्वाचे आहेत. कारण ते विश्‍वासार्हतेशी निगडीत आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल अगोदरच निर्धारित करण्यात आले होते. त्यात भारतीय जनता पार्टीला एका खासगी बलाढ्य दूरसंचार कंपनीने मदत केल्याचा शुजाचा पहिला व सगळ्यांत खळबळजनक दावा आहे. केवळ इतकेच नव्हे, तर ईव्हीएम हॅक होऊ शकते, याची इतरही प्रमुख राजकीय पक्षांना कल्पना आहे. त्यातल्या बहुतेक पक्षांनी आपल्याशी यासंदर्भात संपर्कही साधला होता, असेही शुजाने म्हटले आहे. या मदतीसाठी संपर्क साधणाऱ्या पक्षांत इतरांना चारित्र्याचे प्रमाणपत्र बहाल करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांचा समावेश होता.

विशेष बाब म्हणजे 2014 च्या राजकीय भूकंप निर्माण करणाऱ्या निकालानंतर देशभरात ज्या ज्या निवडणुकांचे निकाल लागलेत त्या त्या निकालांनंतर त्याबद्दल संशय घेणारे व ईव्हीएमलाच गुन्हेगार ठरवण्यात जे पक्ष आघाडीवर होते, अशा सगळ्याच पक्षांनी शुजाशी संपर्क साधला होता. शुजाचा दावा खरा असेल तर या पक्षांचे प्रामाणिकपणाचे मुखवटे त्यावेळी कुठे होते? 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी देशातील वातावरण खरेच ढवळून निघाले होते. अगोदरच्या सरकारच्या विरोधात भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप झाले होते व सरकारमधील काही व्यक्‍तींना तुरुंगाची हवाही खावी लागली.

भ्रष्टाचाराच्या विरोधात रणशिंग फुंकणारे असंख्य कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक यांच्या मनात एकप्रकारची चीड निर्माण झाली होती. दिललीत प्रदीर्घ काळ आंदोलन चालले व त्यातून देशभरात परिवर्तनाचा संदेशही गेला. मतदारांत असलेल्या संतापाच्या या लाटेवर अचूक स्वार होत एक पक्ष सत्तेवर आला. हे वास्तव आहे. त्यावेळेचे वातावरण तसेच होते. हे तेव्हा सत्तेत असणाऱ्यांनीही कधी नाकारले नाही. मात्र त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर व एका विशिष्ट पक्षाच्या विजयानंतर आरोपीच्या पिंजऱ्यात जर कोणाला उभे करण्यात आले असेल तर ते ईव्हीएमला. एक व्यक्ती वा पक्षाची सातत्याने सरशी होत असेल तर कुसळ शोधले जाते असे म्हणतात. तसे ते होत गेले असेच या आरोपबाजीतून स्पष्ट होते. निकाल आपल्याला अथवा आपल्या पक्षाला अनुकूल असे लागले तेव्हा ईव्हीएमकडे बोट दाखवण्याचे धारिष्ट्य कोणी केले नाही.

गोष्टी जेव्हा आपल्या मनासारख्या होत नाहीत, तेव्हा खरेतर आत्मपरीक्षण करण्याची व स्वत:त सुधारणा करण्याची तीच वेळ आणि संधी असते. तेवढी प्रगल्भता नसल्यामुळे दिशाभूल करत ईव्हीएमचाच पाया ठिसूळ करण्यात धन्यता मानली गेली. वास्तविक ईव्हीएम मशीन अथवा निवडणुका आणि त्या घेणारा आयोग हे काही कोण्या एका पक्षाची जहागिरी नाहीत. कोणत्याही संस्थेतली एखादी अथवा काही व्यक्ती संशयास्पद असू शकू शकतात. मात्र, त्यामुळे संपूर्ण संस्था अरोपी होऊ शकत नाही, व्हायला नको. आज विरोधात असताना आपण बेछूट आरोप करत असू. मात्र, उद्या याच यंत्रणेच्या माध्यमातून आपण निवडून येत सत्ताधारी होऊ तेव्हा आपल्या विजयावर प्रश्‍नचिन्ह नसेल का, याचे साधे भान याक्षणी राखले गेले नाही.

शुजाच्या आरोपांबाबतच बोलायचे झाले तर 2014 च्या वेळी घोटाळा करण्यात आल्याचा जर त्याचा दावा असेल तर त्यावेळी विरोधी पक्ष यंत्रणेचा दुरूपयोग करू शकला व सत्ताधाऱ्यांनाच त्याची हवाही लागली नाही, हेही मान्य करावे लागेल जे पूर्णत: अशक्‍य कोटीतलेच आहे. जेव्हा लोकशाहीचा आणि घटनात्मक यंत्रणेच्या विश्‍वासार्हतेचा मुद्दा उपस्थित असतो तेव्हा कोणत्याही किंतु-परंतुना स्थान असायला नको.

आपल्या ईव्हीएम मशीनमध्ये अशी यंत्रणा आहे की, त्याचा वायरलेस संचार यंत्रणेशी संपर्कच होऊ शकत नाही, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.त्यांचा हा मुद्दा किंवा आता मुख्य निवडणूक आयुक्‍त म्हणतात त्याप्रमाणे आम्ही देशाला पुन्हा मतपत्रिकांच्या जमान्यात मागे घेऊन जाणार नाही या बाबी एकतर स्वीकारल्या जाव्यात किंवा मशीनमध्ये छेडछाड करून दाखवण्याचे आयोगाचे आव्हान तरी स्वीकारले जावे. अन्यथा हेही नाही व तेही नाही जर केले गेले तर संशयकल्लोळ कायम राहणार. तो कोणत्याही आगामी सरकारच्या विश्‍वासार्हतेला पोषक असणार नाही.

1 COMMENT

  1. वरील अग्रलेख वाचण्यात आला मी आपणास २६ जानेवारी २०१९ रोजी पीडीएफ द्वारे ह्या विषया बाबत तीन पानी पत्र पाठविले आहे त्यात ह्या मशीनच्या तांत्रिक मुद्या बाबत शंका उपस्थित केल्या आहेत त्याचे निरसन ह्या विषयातील जे दोन्ही बाजूकडील तज्द्य मंडळी आहेत त्यांनीच स्पष्टीकरण देणे व ते सुद्धा न्यायालयात पुरावे देऊन मांडणे महत्वाचे ठरते माझयासारख्य अथवा इतर राजकीय मंडळींच्या मताला काडीचीही किंमत राहत नाही व ह्या मशीनच्या विश्वाहार्ते बाबत न्यायालयाचं अंतिम निर्णय घेऊ शकतो व त्यांनी दिलेला अंतिम निर्णयच हा ग्राह्य धरण्यात येईल त्यासाठी निवडणूक आयुक्त ह्यांचे म्हणणे सुद्धा विश्वासपात्र ठरत नाही माझे वरील तीन पानी पत्र मी पुण्यातील समस्त वृत्तपत्राना पाठविले आहे ह्या मागील मुख्य उद्देश आपण सर्वानी एकत्र येउन न्यायालयाच्या मार्फतच हा प्रश्न नेहमीसाठी सोडविणे यॊग्य ठरेल हे शिवधनुष्य पेलण्याची ताकद पुण्यातील समस्त वृत्तपत्रांमध्ये आहे का ? नसल्यास वृत्तपत्रांच्या विश्वासार्हतेबाबत सुद्धा वाचकांच्या मनात शंका उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येईल का ?आज परिस्थिती अशी आहे कि आपल्या लोकशाहीला कोणीच वाली राहिलेला नाही पत्रकारिता हा चवथा स्तंभ सुद्धा जर कुचकामी ठरला तर आपल्या लोकशाहीला कोणातच अर्थ राहणार नाही व हा संशयकाल्लोळ व त्याचे बीज एकदा रुजले कि त्याचे परिणाम समस्त जनतेलाच नेहमीसाठी वेगवेगळ्या रुपात भोगावे लागणार आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)