संडे स्पेशल : स्वप्नवत प्रवास… (भाग-2)

संग्रहित छायाचित्र..

-अश्‍विनी जगताप-घाडगे

ट्रीपला व्यवस्थित सुरुवात झाली होती. अजून स्वतःला चिमटा घेत हे सगळं खरं होत असल्याची खात्री करून मी मनातल्या मनात नाचत होते. त्यातच कधी साखर झोप लागली ते कळलेच नाही. मनालीत एकच दिवस मुक्काम असल्याने त्या दिवशी आम्ही जेवढं शक्‍य आहे तेवढं मनाली बघायचं ठरवलेलं. सकाळी लवकरच उठून, सर्व आवरून बाहेर पडलो. इथे जवळपास प्रत्येक घराच्या अथवा हॉटेलच्या अंगणात एखादं तरी सफरचंद किंवा पेरूचं झाड लावलेलं होतं.

ज्याला भरभरून फळं लागलेली. हॉटेल मधून ब्रेकफास्ट करून आम्ही हॉटेलच्या बाजूलाच असलेली नग्गर हवेली पाहायला गेलो. कोरीव काम केलेल्या लाकडाच्या भिंतींनी सजलेली नग्गर हवेली बघताक्षणीच मनात घर करून जाते. इथल्या सुंदर वास्तुकलेमुळे इथे बऱ्याच चित्रपटांची शूटिंग होते. त्यानंतर आम्ही पाहिलं हिडिंबा देवी मंदिर. 1553 साली बांधण्यात आलेलं हे मंदिर अतिशय सुंदर आहे. परंतु मला इथली सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे इथल्या दुकानदारांनी पाळलेले पांढरेशुभ्र ससे. इतर कुठे असतात त्यापेक्षा जास्त केसाळ, गुबगुबीत आणि संथ असे हे ससे हातात घेऊन नक्की अनुभवा.

इथून आम्ही वशिष्ठ मंदिर पाहायला गेलो आणि तिथल्या गरम पाण्याच्या कुंडात स्नान करून देवाचे दर्शन घेतले. अस म्हणतात ह्या पाण्यातल्या काही औषधी गुणधर्मांमुळे त्वचेचे बरेच विकार दूर होतात. अखेरीस तेथील काही प्रसिद्ध व्यंजनांचा आस्वाद घेऊन आमचे मनाली दर्शन पूर्ण झाले. आता थरार निर्माण करणारा बाईक प्रवास उद्यापासून सुरू होणार होता, या विचारातच मी निद्राधीन झाले.

दुसऱ्या दिवशी पहाटे 4 ला आमच्या रोमांचक प्रवासाला सुरुवात झाली. या दिवशी आम्ही साधारण 230 किमी अंतर पार करून सार्चू नावाच्या एका जागेवर मुक्काम करणार होतो. हलका हलका पाऊस असल्याने रस्ते घसरट झालेले. अंधार असल्याने आम्ही सावकाशच चाललो होतो. काही अंतर पुढे गेल्यावर एका पुलावर आम्हाला कोणीतरी पडल्यासारखं दिसलं. बाईक बाजूला लावून जवळ जाऊन पाहिलं तर तो आमचाच एक साथीदार होता. बाईक वेगात असल्याने ओल्या झालेल्या लाकडाच्या पुलावरून बाईकचं चाक घसरून त्याचा अपघात झालेला. मागूनच डॉक्‍टर सोबत आमच्या ग्रुपची कार आली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.

प्रवासाची सुरुवातच अशी धक्‍कादायक झाल्याने माझी थोडी घाबरगुंडी उडालेली, पण म्हणतात ना ‘द शो मस्ट गो ऑन’. खरंतर लडाखच्या अख्ख्या प्रवासात हा मूलमंत्र खूप कामी येतो. असो, पुढे काही अंतरावर एका चेक पोस्ट वरून पुढे जाण्यासाठी परमिट घ्यावं लागतं. ते घेऊन आम्ही लेहच्या दिशेने निघालो.

जसा जसा उजेड पडत होता, तसा तसा निसर्ग किती सुंदर असू शकतो याची जाणीव व्हायला लागली. खूप खूप उंच हिरवेगार पर्वत, त्यातून झुळझुळ वाहणारे असंख्य झरे, स्वच्छंद उडणारे पक्षी, स्वच्छ आकाश, खूप खाली असूनही तितकीच मोठी दिसणारी नदी आणि हलकं हलकं धुकं अक्षरश: स्वर्गात पोहोचल्याचा भास झाला. हळूहळू सूर्यप्रकाशामुळे उंच पर्वतांवर असलेल्या त्या बर्फाच्या चादरी चमकताना पाहून कळलं की, हिमाचल प्रदेशला देवभूमी का म्हणतात. खरंचच इतक्‍या सुंदर जागेवर राहण्याचा मोह साक्षात देवांनासुद्धा आवरला नसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)