लक्षवेधी : नेत्यांवरील चित्रपट मतदारांना भुरळ घालतील ?

-राहुल गोखले

निवडणुकीतील प्रचारासाठी प्रत्येक राजकीय पक्ष क्‍लृप्त्या योजत असतो. सोशल मीडियाचा वापर सढळ हस्ते होत आहे आणि त्यातच भर म्हणून चरित्रपट रूपेरी पडद्यावर ऐन निवडणुकीच्या काळात अवतरत आहेत. हे चित्रपट अर्थातच ऐतिहासिक चरित्रनायकांवर नाहीत तर वर्तमानातील निवडणूक-नायकांवर आहेत. चरित्रपट प्रदर्शित करण्यास कोणाचा प्रत्यवाय असण्याचे कारण नसले तरीही ते प्रदर्शित होण्याचे मुहूर्त पाहिले तर त्यामागे काही उद्देश अवश्‍य आहे अशी शंका आल्याखेरीज राहणार नाही. अर्थातच राजकीय नेते आणि चित्रपटांचे दिग्दर्शक-निर्माते या दाव्यांचे खंडन करतील आणि चित्रपट आताच प्रदर्शित होण्यामागे कोणतेही विशेष कारण नाही असा अविर्भाव आणतील. परंतु ज्या पद्धतीने हे चरित्रपट येत आहेत ते पाहता कोणालाही त्यामागील उद्देश मतदारांना भुलविणे हाच आहे याची खात्री पटेल.

विवेक ओबेरॉय नायकाची भूमिका करीत असलेला चित्रपट येत्या 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे आणि तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बेतलेला आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या चरित्रावर आधारित चित्रपट देखील येत्या एप्रिल महिन्यात दाखल होत आहे. त्या चित्रपटाचे नाव असणार आहे “माय नेम इज रागा’ पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आयुष्यावर आधारित “बाघिनी’ म्हणजे वाघीण हा बंगाली भाषेतील चित्रपट जाहीर झाला आहे आणि त्याचे काही अंश दाखविले जात आहेत.

“मोदी-जर्नी ऑफ ए कॉमन मॅन’ ही पंतप्रधान मोदी यांच्या आयुष्यावर आधारित वेब-सिरीज देखील प्रेक्षकांना येत्या एप्रिलमध्ये पाहावयास मिळेल. तेव्हा भाजप, कॉंग्रेस, तृणमूल असे पक्ष प्रत्यक्ष नसले तरीही अप्रत्यक्ष कामाला लागले आहेत असेच म्हटले पाहिजे. प्रश्‍न मोदी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांच्यावर चित्रपट यावेत का नाही हा आहेच; कारण त्यांची कारकीर्द अद्यापि संपुष्टात आलेली नाही. तेव्हा कारकिर्दीचे सम्यक आणि परिपूर्ण मूल्यांकन या चित्रपटात होणे शक्‍य नाही. सामान्यतः चरित्रपट अशाच नायकांच्या आयुष्यावर बेतावेत ज्यांच्या आयुष्यात निदान त्या क्षेत्रात काही नवीन घडण्याची शक्‍यता नाही. परंतु राजकारणात असले ठोकताळे कामी येत नसतात. तेथे सोय महत्त्वाची.

तेव्हा वर उल्लेख केलेले चरित्रपट येत आहेत यात आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. शिवाय भारतात व्यक्‍तिस्तोम आणि व्यक्‍तिपूजा हे काही नवे नाही. तेव्हा चरित्रपट येणार यात अचंबित होण्यासारखेही काही नाही. हे चरित्रपट त्या व्यक्तिच्या आयुष्याचे आणि कारकीर्द आणि कामगिरीचे निष्पक्ष मूल्यांकन करून निर्माण झाले असतील अशी अपेक्षाही ठेवणे अनाठायी. तेव्हा असल्या निकषांच्या फुटपट्टीवर या चरित्रपटांचे मूल्यमापन करणे हेही अनावश्‍यक. तथापि, हे सगळे प्रचारासाठी चालले नसून केवळ योगायोग म्हणून ते चित्रपट आता प्रदर्शित होत आहेत असा दावा करणे म्हणजे ताकाला जाऊन भांडे लपविण्यासारखे ठरेल. एरवी वर्षभरात कधीही हे चित्रपट येऊ शकले असते.

लोकसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीत एप्रिल महिन्यातच या चित्रपटांचा मारा व्हावा हा योगायोग नसून हे नियोजित आहे हे न कळण्याइतके मतदार दुधखुळे निश्चित नाहीत. तेव्हा हे चित्रपट मतदारांसमोर त्या त्या चरित्रनायकाचे उद्दात्तीकरण करण्यासाठीच योजले असावेत अशी शंका येण्यास आता तरी वाव आहे. प्रश्न अशा चित्रपटांनी खरोखरच मतदारांना आपल्या पक्षाकडे वळविता येते का हा आहे.

राजकीय सभा, सोशल मीडियावरून प्रचार हे सगळे चालूच असते आणि तरीही राजकीय पक्षांना त्यांना अपेक्षित यश मिळतेच असे नाही. त्यात चित्रपटांची भर पडली म्हणून मतदार लगेच त्या पक्षाला भरभरून मते देतील असे मानणे म्हणजे मतदारांच्या सूज्ञपणाला आणि व्यावहारिक शहाणपणाला कमी लेखण्यासारखे होईल. आजवर मतदारांना भुलविण्यासाठी राजकीय पक्षांनी अनेक क्‍लृप्त्या योजल्या आहेत. कधी सवलती देऊन, कधी लोकानुनयी घोषणा ऐन निवडणुकीत करून किंवा स्वप्ने दाखवून. परंतु जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा मतदार आपल्या राजकीय जाणिवेचे दर्शन घडवित असतात.
यापूर्वी युद्ध जिंकून देणारे राजकीय नेतृत्व म्हणून इंदिरा गांधी यांना

1971 मध्ये भरघोस मते देणाऱ्या मतदारांनी इंदिरा गांधी यांना आणीबाणीनंतर घरी बसविले होते. ज्या व्ही. पी. सिंग यांनी कॉंग्रेसविरुद्ध शड्डू ठोकले त्यांना मतदारांनी पंतप्रधान केले; पण अत्यल्प काळासाठी. वाजपेयी यांच्या काळात भाजपने इंडिया शायनिंग आणि फील गुडचे वातावरण निर्माण केले; परंतु मतदारांना तो अनुभव होत नव्हता नि त्यामळे त्यांनी भाजपला 2004 मध्ये पराभूत केले. चित्रपट काढले काय किंवा आक्रमक प्रचार केला काय; अखेर मतदार त्या सर्वातून आपला निर्णय घेत असतो नि तोही सुजाणपणे असाच आतापर्यंतचा अनुभव आहे.

याचे कारण अखेर मतदार पडद्यावर किंवा पडद्यामागे काय चालले आहे यापेक्षा आपल्या आयुष्यात या सगळ्याचा परिणाम किती हे जोखत असतो. त्याची फुटपट्टी निराळी असते आणि त्याचे मूल्यांकन वेगळे असते. ते मूल्यांकन आक्रमक भाषणांनी किंवा चरित्रपटांमधील प्रत्यक्षाहून उत्कट दाखविल्या जाणाऱ्या प्रतिमांवर अवलंबून नसते किंवा त्याने प्रभावितही होत नसते. तथापि, राजकीय पक्षांना नेहेमी सतत मतदारांच्या नजरेत राहण्याने आपण निवडून येऊ असेच वाटत असते आणि त्यासाठी पक्ष युक्‍त्या योजत असतात. येत्या एप्रिल महिन्यात जे चरित्रपट प्रदर्शित होणार आहेत त्याकडे याच दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.

चरित्रपटांनी रुपेरी पडदा येत्या काही दिवसांत दुमदुमून जाईल. कदाचित त्या चित्रपटांना प्रतिसाद देखील लाभेल. पण यापूर्वी दिग्गज राजकीय नेत्यांच्या सभांना झालेली गर्दी पण त्याचे मतदानात न झालेले रूपांतर सर्वांनी अनुभवले आहे. तेव्हा मोदी, राहुल, ममता यांच्या आयुष्यावर बेतलेले चित्रपट आल्यावर ते किती चालतात यावर निवडणुकीतील समीकरणे मांडणे धोक्‍याचे ठरेल कारण चित्रपटगृहांकडे हे चित्रपट पाहण्यासाठी पावले वळली तरी त्याचा अर्थ मतदान करताना मतदारांची बोटे मतदान यंत्रावर त्याच पक्षाच्या चिन्हाकडे वळतीलच असे सांगता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)